Drunken Judge Suspension : न्यायाधिशांनी न्यायालयाची प्रतिष्ठा राखावी ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयाकडून मद्यपी न्यायाधिशांचे निलंबन कायम  !

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : विधी आणि न्याय विभागाने न्यायाधीशपदावरून निलंबित केलेल्या मद्यपी कनिष्ठ नगर दिवाणी न्यायाधिशाचे निलंबन मुंबई उच्च न्यायालयानेही कायम ठेवले. ‘न्यायाधीश आणि न्यायालयातील अधिकारी यांनी न्यायालयाची प्रतिष्ठा राखायलाच हवी. न्यायपालिकेच्या प्रतिमेवर परिणाम होईल, असे कोणतेही कृत्य त्यांनी करू नये’, असे या वेळी न्यायालयाने नमूद केले. अनिरुद्ध पाठक असे निलंबित केलेल्या न्यायाधिशांचे नाव आहे.

नंदुरबार प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधिशांची अनिरुद्ध पाठक यांच्याविषयीचा सादर केलेल्या अहवाल न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपिठाने वरील निर्णय दिला.

विधी आणि न्याय विभागाने न्यायाधीश पदावरून निलंबित करण्याच्या विरोधात अनिरुद्ध पाठक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती; मात्र न्यायालयाने ती फेटाळली. बाजू मांडण्याची संधी न देताच निलंबन झाले असेल किंवा नियमांना डावलून निर्णय देण्यात आला असेल, तर त्यात हस्तक्षेप केला जाऊ शकतो; मात्र न्यायाधिशांच्या अशोभनीय वर्तनाला दुर्लक्षित करता येणार नाही, असे या वेळी उच्च न्यायालयाने निर्देशित केले.