धर्मांतराला विरोध केल्यामुळे माझ्या मुलीची हत्या झाली ! – निरंजन हिरेमठ

  • काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या नेहा हिरेमठ हिच्या वडिलांनी व्यक्त केला संताप !

  • राज्य सरकारवर विश्‍वास नसल्याने हत्येचे अन्वेषण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी !

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – नेहा हिरेमठ हत्या प्रकरणातील आरोपी फैयाज खोंडुनाईक हा एकटाच आरोपी नसून त्याला साहाय्य करणार्‍या एकूण ८ जणांविषयी पोलिसांना स्पष्ट माहिती दिली आहे. असे असले, तरी फैयाजची अटक सोडली, तर पोलिसांनी दुसरे काहीही काम केलेले नाही, अशा शब्दांत नेहाचे वडील आणि काँग्रेसचे येथील नगरसेवक निरंजन हिरेमठ यांनी संताप व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, या प्रकरणाच्या चौकशीविषयी पोलिसांनी आमच्याकडून अधिक माहिती घेण्याचे कामही केलेले नाही. हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात यावे. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मी केंद्रशासनाकडे विनंती केली आहे. ‘माझा जीव गेला, तरी हरकत नाही. माझ्या मुलीचा जीव घेणार्‍याला शिक्षा होईलच, यासाठी मी वचनबद्ध आहे’, असे ते म्हणाले.

… अन्यथा मलाच कायदा हातात घेऊन माझ्या मुलीला न्याय द्यावा लागेल !

एका वृत्तवाहिनीशी बोलतांना ते म्हणाले की, फैयाजला कठोर शिक्षा झाली, तरच नेहाच्या आत्म्याला शांती मिळेल. माझ्या मुलीने धर्मांतराला विरोध केल्यामुळे तिची हत्या करण्यात आली आहे; परंतु माझ्या मुलीला न्याय मिळेल, याची मला निश्‍चिती नाही. पोलीस कुणाच्यातरी हातातील कळसुत्री बाहुली असल्यासारखे वागत आहेत. राज्य शासनाकडून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सीबीआयकडे चौकशी हस्तांतरित करण्यात आली नाही, तर मलाच कायदा हातात घेऊन माझ्या मुलीला न्याय द्यावा लागेल, असेही हिरेमठ म्हणाले.

संपादकीय भूमिका 

  • एखादा आघात जोपर्यंत स्वत:च्या कुटुंबापर्यंत पोचत नाही, तोपर्यंत हिंदू ‘मला काय त्याचे’, असे म्हणून बघ्याची भूमिका घेतात. बहुतांश हिंदू लव्ह जिहाद, धर्मांतर, ‘गझवा-ए-हिंद’ (भारताचे इस्लामीकरण करणे) यांसारख्या षड्यंत्रांविषयी मूकदर्शकच आहेत. काँग्रेसच्या नगरसेवकाच्या उदाहरणातून तरी सर्व हिंदूंनी जागे होण्याची आवश्यकता आहे !
  • काँग्रेसला घरचा अहेर ! स्वत:च्या पक्षावरही विश्‍वास नसणार्‍या नगरसेवकाच्या उदाहरणातून भारतीय नागरिकांची काँग्रेसविषयीची विश्‍वासार्हताच नष्ट झाली आहे, हेच स्पष्ट होते !