पाकिस्तानचे ‘ऑपरेशन डेझर्ट हॉक’ (कच्छच्या वाळवंटातील युद्ध)
२४ एप्रिल ते १ जुलै १९६५ या कालावधीत चालू केलेल्या ‘ऑपरेशन डेझर्ट हॉक’ याविषयी…
१. वर्ष १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाची नांदी
वर्ष १९४७ मध्ये झालेल्या देशाच्या फाळणीपासूनच भारत-पाकिस्तान संघर्ष चालू झाला होता. भारताचे राज्य जम्मू-काश्मीर कसेही करून स्वतःच्या कह्यात घेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हे त्याचे मूळ होते. भारत-पाकिस्तान सरहद्दीवर विशेषतः जम्मू-काश्मीरमधील युद्धबंदी रेषेवर; गोळीबार, सैनिकी घुसखोरी आणि लहान-मोठ्या लढाया करून पाकिस्तान सतत अस्थिरता ठेवत आला आहे. अशा कुरापतींचा यशस्वीरित्या प्रतिकार करून संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढणार नाही, याची खबरदारी भारतीय सैन्यदलांना घ्यावी लागत असे. त्यातच वर्ष १९६२ च्या चीन-भारत युद्धात झालेली भारताच्या संरक्षणाची हानी पहाता पाकिस्तानला जम्मू-काश्मीरला कह्यात घेण्याची ती आयती चालून आलेली संधी वाटली. ‘अमेरिकेकडून आधुनिक शस्त्रास्त्रे मिळाल्यामुळे भारतावर आपण युद्धात सहज विजय मिळवू शकू’, असा आत्मविश्वास पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष जनरल आयुब खान यांना वाटला. पाकिस्तानच्या सिंध-प्रांताला लागून असलेल्या गुजरातमधील कच्छच्या रणामध्ये ६ ते ८ मैल (अनुमाने १२ किलोमीटर) भारतीय हद्दीमध्ये २४ एप्रिल १९६५ या दिवशी पाकिस्तानने त्याचे रणगाडे घुसवून ‘ऑपरेशन डेझर्ट हॉक’चा प्रारंभ केला.
जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर वर्ष १९६४ मध्ये लालबहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान झाले. वर्ष १९६२ च्या चीन-भारत युद्धाच्या धक्क्यानंतरचे भारतीय सैन्यदलांचे सक्षमीकरण पूर्ण होण्यापूर्वीच आक्रमण करून काश्मीर खोरे कह्यात घेण्याचा पाकिस्तानचा हेतू होता. भारतीय मानसिकता आणि सैन्याची पूर्वसिद्धता यांचा अंदाज घेणे, तसेच प्रमुख युद्धभूमीपासून (जम्मू-काश्मीर, तसेच पंजाब) सैन्य आणि रणगाडे दूर पाठवण्याच्या हेतूने पाकिस्तानने कच्छच्या रणामध्ये ‘ऑपरेशन डेझर्ट हॉक’ चालू केले.
२. सरहद्दीच्या दक्षिणेला कच्छच्या रणामध्ये पाकिस्तानकडून ‘ऑपरेशन डेझर्ट हॉक’चा प्रारंभ
सिंध-गुजरात सरहद्दीवर पाकिस्तानचे ‘सिंधू-रेंजर्स’ नावाचे अर्धसैनिकी बल तैनात होते. कच्छच्या रणामधून समुद्राचे पाणी ओसरल्यानंतर जानेवारी १९६५ मध्ये त्यांनी सरहद्दीच्या दक्षिणेला भारतीय हद्दीमध्ये गस्त घालण्यास प्रारंभ केला. २४ एप्रिल १९६५ या दिवशी पाकिस्तानने एक ‘इन्फंट्री डिव्हिजन’, पॅटन रणगाड्यांच्या २ रेजिमेंट्स आणि ‘फील्ड गन्स’ यांच्या साहाय्याने कच्छच्या रणाच्या वायव्य कोपर्यावर असलेला भारताचा कांजरकोट नावाचा जुना किल्ला, विगोकोट, बिआरबेट आणि इतर ४ पोस्ट्स कह्यात घेऊन ‘ऑपरेशन डेझर्ट हॉक’चा प्रारंभ केला. पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्यासाठी भारताने कच्छच्या रणामध्ये ‘५० पॅराशूट रेजिमेंट’ त्वरित रवाना केली.
३. भारत-पाकिस्तानमधील कच्छ-सिंध सरहद्दीचा प्रश्न
वर्ष १८४३ मध्ये ब्रिटिशांनी सिंध प्रांतावर सत्ता मिळवली. त्या वेळी सरहद्दीविषयी स्पष्टता होती की, सिंधच्या दक्षिणेला असलेले कच्छचे रण हा कच्छ संस्थानचा भाग आहे. पुढे वर्ष १९४७ च्या फाळणीच्या वेळी मुसलमान बहुसंख्य प्रांत (सिंध) पाकिस्तानात गेला आणि हिंदु बहुसंख्य कच्छ (रणासह) भारतात राहिला. सरहद्द ‘डीमार्केट’ (सीमेच्या मर्यादांचे सीमांकन) करण्याची विशेष तातडी नसल्याने त्या वेळी ते काम केले गेले नाही; मात्र काही ‘बाऊंड्री पिलर्स’ (सीमेवर खांब) उभारले होते. त्याचा लाभ घेऊन पाकिस्तानने १४ जुलै १९४८ या दिवशी प्रथम उत्तरेकडील अर्ध्या रणावर हक्क सांगितला. भारताने पाकिस्तानचा हा दावा १० ऑगस्ट १९४९ या दिवशी फेटाळून लावला. एवढेच नव्हे, तर भारताने संपूर्ण रण हा कच्छ संस्थानाचा भाग असल्याचे पुरावे आणि नकाशे सादर केले. वर्ष १९५५-५६ मध्ये रणामधील गुलमंड, तलवंडी आणि छाडबेट या भागांमध्ये ‘पाकिस्तानी रेंजर्स’ (सैन्य) गस्त घालून घुसखोरी करू लागले. त्यांना भारतीय सीमारक्षक आणि सैन्य विरोध करत असे.
आधुनिक लढाऊ विमाने उतरवण्यासाठी भुज विमानतळाची सुधारणा केली. लहान विमाने उतरवण्यासाठी छाडबेट, खावडा आणि कोटडा (खावडाच्या उत्तरेला १६ किलोमीटर) येथे धावपट्ट्या बांधल्या. खार्या पाण्याचे शुद्धीकरण करून पिण्याचे पाणी बनवण्याचे संयंत्र छाडबेट येथे बसवले. दळणवळणासाठी कच्छ आणि रण यांमध्ये ७ रस्ते बनवले.
कच्छचे रण
कच्छच्या उत्तरेला सिंध सरहद्दीपर्यंतच्या अक्षांश २२० (अंश) ५५’(मिनिटे) ते २४०४३’ उत्तर आणि रेखांश ६८० (डिग्री)४५’ (मिनिटे) ते ७१०४६’ पूर्व असा २३ सहस्र ३१० चौरस किलोमीटरचा प्रदेश, या खार्या दलदलीच्या भागाला ‘रण’ म्हणतात. रणाच्या उत्तरेला पाकिस्तानचा सिंध प्रांत, रणाच्या पूर्वेला आणि दक्षिणेला राधनपूर अन् काठेवाड हे गुजरातचे जिल्हे आहेत. रणाचे २ भाग पडतात. कच्छच्या उत्तर आणि वायव्येला असलेले मोठे-रण (साधारण २५७ किलोमीटर पूर्व-पश्चिम आणि १२९ किलोमीटर उत्तर-दक्षिण असे १८ सहस्र १३० चौरस किलोमीटर) आणि कच्छच्या दक्षिण अन् नैऋत्येला असलेले लहान-रण (साधारण १२९ किलोमीटर पूर्व-पश्चिम आणि १६ ते ६४ किलोमीटर उत्तर-दक्षिण असे ४ सहस्र १४४ चौरस किलोमीटर). नैऋत्य मोसमी पावसाच्या पाण्यामुळे रणामध्ये साधारणतः जून ते ऑक्टोबर खारे तळे बनते. इतर काळात समुद्राचे पाणी ओसरल्यावर आणि खारे तळे वाळल्यानंतर शुभ्र वाळवंट असते. रणामधून पूरण नावाची नदी वहात असतांना अली-बंदरपासून कोरी-क्रीकपर्यंत पश्चिम रणामध्ये बरेच पीक येत असे. दलदलीवरील उंचवट्यांच्या (बेट) भागांत मनुष्यवस्ती आहे. तेथे वनस्पती उगवतात, रान-गाढवे, इतर जंगली जनावरे आणि अनेक प्रकारचे पक्षी रहातात. खारी दलदल आणि समुद्राचे पाणी यांमुळे बराचसा भाग ओसाड आहे. प्रमुख शहर भूजपासून खावडा गावापर्यंत ६७ किलोमीटरचा रस्ता आहे. तो रस्ता बन्नी नावाच्या खेड्यातून जातो आणि पुढे उत्तरेला पाकिस्तानमधील दिपलो नावाच्या मोठ्या गावाकडे जातो. हा ट्रॅक पुढे मोरी-बेटपर्यंत जातो. या रस्त्यावरून पावसाळ्याव्यतिरिक्त वाहने जा-ये करू शकतात. रणाच्या उत्तरेकडून, म्हणजे पाकिस्तान (सिंध)कडून रस्ते आणि दळणवळणाची साधने दक्षिण भागापेक्षा (कच्छ) अधिक सोपी आहेत.
– विंग कमांडर विनायक पु. डावरे
४. कांजरकोट भागात पाकिस्तानच्या कुरापती
जानेवारी १९६५ मध्ये पाकिस्तानी सैन्य रण भागात पुन्हा गस्त घालू लागले. ते थांबवण्यासाठी फेब्रुवारी १९६५ मध्ये भारताने भुज आणि खावडा येथे प्रत्येकी एक ब्रिगेड सैन्य पाठवले. कांजरकोटचा जुना किल्ला कच्छच्या रणाच्या वायव्य कोपर्यात १३७० मीटर सरहद्दीच्या दक्षिणेला आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला सपाट भूमी असून उत्तरेला वाळूचे उंचवटे (sand dunes) आहेत. सभोवतालच्या वाळूच्या उंचवट्यांमुळे किल्ल्यावर फक्त कोरड्या महिन्यात आक्रमणे करता येतात. जवळीकीमुळे कांजरकोटशी दळणवळणाच्या सुविधा दक्षिणेपेक्षा उत्तरेकडून, म्हणजे सिंधकडून (पाकिस्तान) अधिक सोयीच्या आहेत. ‘पाकिस्तानी रेंजर्स’ची गस्त वाढल्यामुळे भारतीय आणि पाकिस्तानी सैन्याच्या कमांडर्सची बैठक १५ फेब्रुवारी १९६५ या दिवशी झाली. कांजरकोटच्या दक्षिणेहून जाणारा सुराई ते डिंग असा ३२ किलोमीटरचा ट्रॅक पाकिस्तानने बनवला. कांजरकोटवर ताबा ठेवण्यासाठी आसपास सिंधू-रेंजर्सची फौज साधारण ६ कंपन्या राखीव म्हणून, तर हैदराबाद (सिंध) आणि छोर येथे २ बटालियन्स आणल्या होत्या. त्याविरुद्ध भारतीय बाजूला राज्य राखीव पोलिसांच्या विगोकोट आणि छाडबेट येथे प्रत्येकी २ अन् १ कंपनी करीमशाहीमध्ये, अशा एकूण ५ कंपन्या होत्या; पण कांजरकोटमधून पाकिस्तानी फौजेला हाकलण्यास त्या पुरेशा नव्हत्या.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– लेखक : विंग कमांडर विनायक पु. डावरे (निवृत्त), पुणे (२२.४.२०२४)
पुढील भाग वाचण्यासाठी क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/787380.html