Indian Spices Banned : सिंगापूर आणि हाँगकाँग येथे भारतीय आस्थापनांच्या ४ मसाल्यांवर बंदी

  • ‘एम्.डी.एच्.’ आणि ‘एव्हरेस्ट’ या नामांकित आस्थापनांच्या मसाल्यांचा समावेश

  • मसाल्यांद्वारे कर्करोग होण्याची शक्यता असल्याचा केला दावा

  • भारतातही होणार या मसाल्यांची तपासणी

नवी देहली – ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’ नेहमीच मसाले खरेदी करतांना नामांकित आस्थापनांकडून पॅकबंद मसाले खरेदी करण्याचे आवाहन करते; मात्र भारतातील २ आस्थापनांच्या ४ मसाल्यांवर सिंगापूर नंतर हाँगकाँग येथे बंदी घालण्यात आली आहे. या मसाल्यांमुळे कर्करोग होऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

१. हाँगकाँगच्या अन्न आणि पर्यावरण स्वच्छता विभागाच्या ‘सेंटर फॉर फूड सेफ्टी’च्या अहवालात म्हटले आहे की, ‘एम्.डी.एच्.’ आणि ‘एव्हरेस्ट’ या नामांकित मसाल्यांच्या उत्पादनांत ‘इथिलीन ऑक्साईड’ हे कर्करोग निर्माण करणारे कीटकनाशक अधिक प्रमाणात आढळून आले. ‘एम्.डी.एच्.’च्या मद्रास करी पावडर, सांबार मसाला मिश्र मसाला पावडर, करी पावडर मिश्रित मसाला पावडर आणि एव्हरेस्टचे ‘एव्हरेस्ट फिश करी मसाला’ या ४ मसाल्यांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. तथापि याविषयी वरील दोन्ही आस्थापनांनी कोणतेही विधान दिलेले नाही.

२. हाँगकाँग आणि सिंगापूर येथे या मसाल्यांवर बंदी घातल्यानंतर भारतातील ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ने देखील या मसाल्यांचे नमुने चाचणीसाठी गोळा केले आहेत. तसेच नेपाळनेही हे पाऊल उचलले आहे.


काय आहे ‘इथिलीन ऑक्साईड’ ?

‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या मते, ‘इथिलीन ऑक्साईड’ हा ज्वलनशील रंगहीन वायू आहे. त्याला गोड वास येतो. हे एक कीटकनाशक आणि निर्जंतुकीकरण म्हणून अगदी अल्प प्रमाणात वापरले जाते. या कीटकनाशकाचा वापर अनेक गोष्टी वाचवण्यासाठी केला जातो. या कारणास्तव तंबाखू, काही वैद्यकीय उत्पादने, सौंदर्यप्रसाधने आणि मधमाशीपालन यांमध्ये वापरल्या जाणार्‍या काही साधनांमध्येदेखील त्याचे घटक असू शकतात. ‘इथिलीन ऑक्साईड’च्या संपर्कात येण्यामुळे विविध प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. यांत ‘लिम्फोमा’, ‘ल्युकेमिया’, पोटाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग यांचा समावेश आहे.