तोतया पोलीस म्हणून सायबर गुन्हेगारांकडून तरुणीची १ लाख ९५ सहस्र रुपयांची फसवणूक !
मुंबई – कांदिवली परिसरात एका तरुणीची सायबर गुन्हेगारांनी तोतया पोलीस अधिकारी होऊन लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. भाऊ बलात्काराच्या गुन्ह्यात अडकल्याचे खोटे सांगत त्यांनी तरुणीकडून १.९५ लाख रुपये उकळले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.
१. तरुणीच्या भ्रमणभाषवर अनोळखी क्रमांकावरून एक संपर्क आला होता. तिच्या वडिलांनी तो उचलला. तेव्हा समोरच्याने सांगितले की, तुमचा मुलगा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकला असून तो रडत आहे. या वेळी त्याचा आवाजही ऐकवण्यात आला.
२. तोतया पोलीस अधिकार्याने तरुणीला तिच्या भावाचे बलात्काराच्या गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी १ लाख ९५ सहस्र रुपये भरण्यास सांगितले; पण ते पोलीस अधिकारी भावाशी बोलू देत नसल्याने तिला संशय आला.
३. तोतया पोलिसांनी एका तरुणाला तिच्याशी बोलण्यास सांगितले; पण त्याचा आवाज आपल्या भावासारखा नसल्याने फसवणूक झाल्याचे समजले. तिने या प्रकरणी फसवणुकीची तक्रार प्रविष्ट केली.
संपादकीय भूमिका :अशा तोतया अधिकार्यांना पकडून आजन्म कारागृहात डांबायला हवे; कारण त्यांना मोकळीक दिल्यास ते पुन्हा असेच प्रकार करणार ! |