वर्ष २०१९ मध्ये भाजपसमवेत जाण्यासाठी अजित पवार यांना माझी मान्यता होती ! – शरद पवार
मुंबई – वर्ष २०१९ मध्ये भाजपसमवेत जाण्यासाठी अजित पवार यांना माझी मान्यता होती, अशी स्वीकृती शरद पवार यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली. वर्ष २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत अजित पवार यांनी राज्यपाल भवन येथे सत्तास्थापन करण्याची शपथ घेतली होती. त्या वेळी शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर कारवाईचा दिखावा केला होता; मात्र हे सर्व स्वत:च्या पाठिंब्यानेच चालू असल्याची स्वीकृती शरद पवार यांनी या मुलाखतीमध्ये दिली.
वर्ष २०१७ मध्ये भाजपपासून शिवसेनेला दूर करून उद्धव ठाकरे यांच्यासमवेत जाण्याची आमची योजना होती. त्यामध्ये आम्ही यशस्वी झाल्याचे या वेळी शरद पवार यांनी म्हटले. सद्य:स्थितीत भाजप सोडून आमच्यासमवेत कोण परत येणार असेल, तर आम्हाला विचार करायला हरकत नाही, असे वक्तव्य करून शरद पवार यांनी अजित पवार यांना पुन्हा स्वत:समवेत घेण्याला अनुमती दर्शवली.