सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त झारखंडमध्ये विविध क्षेत्रांतील घटकांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन
धनबाद (झारखंड) – सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रौप्य महोत्सवाच्या अंतर्गत झारखंडमधील विविध क्षेत्रातील लोकांसाठी नुकतेच ‘तणाव नियंत्रण’ या विषयावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांच्या माध्यमातून तणावाचे कारण आणि त्याचे परिणाम, तणावमुक्तीसाठी उपाययोजना, योग अन् आध्यात्मिक साधना यांची उपयुक्तता यांविषयीची विस्तृत माहिती देण्यासह मार्गदर्शनही करण्यात आले.
१. रांची भागात ‘द रामेश्वरम् ग्रुप’चे मुख्य व्यवस्थापक तथा ‘विश्व हिंदु परिषद, झारखंड’ प्रांतचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत रायपत यांनी त्यांच्या कर्मचार्यांसाठी ‘हॉटेल ग्रीन एकर’मध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले.
२. ‘झारखंड कमर्शियल टॅक्स बार असोसिएशन’चे उपाध्यक्ष अधिवक्ता आनंद कुमार पसारी यांनी ‘जी.एस्.टी. भवन, रांची’ येथे कार्यक्रमाचे आयोजन केले.
३. धनबादमधील सरस्वती शिशु मंदिराच्या शामडीह, तेतुलमारी तथा भूली या शाखांमध्ये शिक्षक, पालक, ११ वी आणि १२ वीचे विद्यार्थी यांसाठी व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानांचे आयोजन विद्यालयाचे अध्यक्ष आणि संयोजक श्री. फूल सिंह यांनी केले.
४. ‘हिन्दुस्तान मायलेबल्स अँड फोर्जिंग्स लिमिटेड’, ‘यामाहा शोरूम’, ‘ब्लॅक डायमंड एक्सप्लोसिव्ह प्रायव्हेट लिमिटेड’, ‘लाईफ इन्शुअरन्स कॉर्पाेरेशन ऑफ इंडिया, कतरास’ आणि ‘दैनिक जागरण, धनबाद’ वृत्तपत्र येथील कर्मचारी, तसेच ‘रांची माहेश्वरी सभे’चे सदस्य यांच्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
क्षणचित्रे
१. धनबाद क्षेत्रातील कार्यक्रमांमध्ये सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. प्रदीप खेमका यांची वंदनीय उपस्थिती होती. याचसमवेत झारखंडमधील काही कार्यक्रमांना हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली.
२. ‘एल्.आय.सी.’च्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमानंतर शाखा व्यवस्थापक श्री. राजीव तिवारी म्हणाले, ‘‘हा संपूर्ण विषय आपल्याच जीवनाशी संबंधित आहे, असे वाटते.’’
३. ‘दैनिक जागरण’चे संपादक श्री. चंदन म्हणाले, ‘‘आजच्या परिस्थितीत हा विषय अतिशय आवश्यक आहे.’’
४. सरस्वती शिशु मंदिराचे अध्यक्ष श्री. फूल सिंह म्हणाले, ‘‘हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. या भागातील ५ विद्यालयांमध्ये या कार्यक्रमांचे पुन्हा आयोजन करू.’’
५. ‘तणावमुक्ती’ हा विषय ऐकल्यानंतर अनेक लोकांनी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया शिकण्यासाठी जिज्ञासा दाखवली, तसेच अनेकांनी सनातन संस्थेचे ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिये’वर आधारित ग्रंथ खरेदी केले.