‘मेटा’चा हिंदुद्वेष !
संपूर्ण जगातच सध्या ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) या तंत्रज्ञानाची चर्चा आहे. सामाजिक माध्यमेही ‘एआय’चे कोडकौतुकच करतांना आढळून येतात; मात्र या ‘एआय’ तंत्रज्ञानाचा सदुपयोग जसा सर्व प्रकारची उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी होऊ शकतो, तसाच अनेक ठिकाणी दुरुपयोगही केला जाऊ शकतो अथवा केला जात आहे. ही दुसरी बाजू सनातन हिंदु धर्म, परंपरा, देवता आणि भारतीय संस्कृती यांच्या दृष्टीने घातक ठरू शकते. ‘इन्स्टाग्राम मेटा’ने ‘एआय’ बनवला आहे, ज्याला आज्ञा दिल्यास तो विविध विषयांवरील विनोदनिर्मिती करून आपल्याला हसवू शकतो. त्याला ‘श्रीरामावर विनोद निर्मिती कर’, अशी आज्ञा दिल्यास तो प्रभु श्रीरामचंद्राविषयी अर्थविहीन, बाष्कळ आणि संगणकीय क्षेत्राशी निगडित संदर्भ वापरून प्रश्न विचारतो, उदा. ‘वनवास जीवनात प्रभु राम यांचा लॅपटॉप क्रॅश का झाला ?’ त्यानंतर स्वत:च त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल संगणकीय क्षेत्राशी निगडीत संज्ञा, संदर्भ तसेच भाषा वापरून प्रभु रामचंद्र आणि सीतामाई यांचा अवमान करणारा विनोद करतो. खाली ‘मी द्विअर्थी विनोद केला आहे’, हे सांगायला तो विसरत नाही. दुसर्या बाजूला ‘अल्लाह’बद्दल विनोद कर’, अशी आज्ञा दिल्यास मात्र तो अत्यंत साळसूदपणाचा आव आणत ‘मी दिलगीर आहे; परंतु एक उत्तरदायी एआय म्हणून मी अनादरकारक किंवा आक्षेपार्ह समजले जाणारे विनोद किंवा सामग्री सिद्ध न करणे पसंत करतो; विशेषत: जेव्हा ते धार्मिक व्यक्ती किंवा विश्वास यांबद्दल असते. संवेदनशील असणे आणि सर्व धर्म अन् श्रद्धा यांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. त्याऐवजी मी तुम्हाला विविध विषयांवर स्वच्छ, आदरणीय आणि मजेदार विनोदांची विस्तृत श्रेणी देऊ शकतो.’’ एवढ्या मोठ्या वाक्यांत अतिशय स्पष्टपणे दिलगिरी व्यक्त करत अल्लावर विनोद करायला असमर्थता दशवतो.
‘इन्स्टाग्राम मेटा’ आस्थापनाने असा ‘एआय’ बनवला आहे, जो ‘सर्वधर्मसमभावी’ असल्याचे नाटक करतो आणि हिंदु देवतांवर विनोद निर्मिती करण्यास सांगितले की, तो ती कृती करतो; मात्र इतर धर्मावर किंवा इतर धर्मीय देवतांवर विनोद बनवत नाही ! श्रीरामावर विनोद करणे, हा श्रीरामाचा अनादर नाही का ? अल्लावर विनोद चालत नाही, तर हिंदूंच्या देवतांवर विनोद कसा चालतो ? ‘एआय’ला स्वत:ची बुद्धी नाही. मानवाने जे त्यात घातले आहे, तेच तो प्रस्तुत करतो. याचा अर्थ स्पष्ट आहे, ‘मेटा’चा ‘एआय’ सिद्ध करण्यासाठी लागणार्या संगणकीय संरचनेत (सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग) आणि लिखाण (डेटा) यांत ‘श्रीरामा’वर विनोद घातला आहे अन् ‘अल्लाह’वर ‘विनोद करू शकत नाही’, असे घातले आहे.’ हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्याच्या या नवीन माध्यमाच्या विरोधात कडक कायदे करणे, तसेच तात्काळ आणि कठोर कारवाई करून दोषींना शिक्षा होणे अत्यावश्यक आहे !
– श्रीमती धनश्री देशपांडे, रामनाथी, गोवा.