‘जन्म आणि मृत्यू यामध्ये एका श्वासाचे (क्षणाचे) अंतर असते’, हे अनुभवलेल्या साधिकेच्या मनावर बिंबलेले स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व !
१. विजेचा धक्का लागून वानराचे पिल्लू एका क्षणात मरणे, या प्रसंगातून ‘जगनं-मरनं एका सासाचं अंतर ।’, या कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितेचे स्मरण होणे
‘एकदा आम्ही काही साधक रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाच्या आगाशीत उभे होतो. बाहेरच्या झाडांवर वानराची नर-मादी आणि त्यांची ३ पिल्ले खेळत होती. आम्ही मारुतीचे रूप पहायला मिळाले; म्हणून वानरांना वंदन करत होतो. अकस्मात् वानराच्या एका मोठ्या पिल्लाने विजेच्या खांबावर उडी मारली. त्याला विजेचा धक्का लागला आणि ते खाली पडून गतप्राण झाले. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. तेव्हा मला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ‘जगनं-मरनं एका सासाचं अंतर ।’, म्हणजे कवयित्री बहिणाबाई म्हणतात, ‘जगणे आणि मरणे यांमध्ये केवळ एका श्वासाचे अंतर असते’, या ओवीचे स्मरण झाले. वानराच्या पिल्लाचा अकस्मात् झालेला मृत्यू पाहून ‘जन्म आणि मृत्यू यामध्ये एका श्वासाचे, म्हणजे एका क्षणाचे अंतर असते’, हे मी जवळून अनुभवले.
२. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याचे लक्षात आलेले महत्त्व
वानराच्या पिल्लाचा मृत्यू झालेला पाहून साधक भावनाशील झाले; मात्र ‘वानरांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही’, असे माझ्या लक्षात आले. देवाच्या कृपेने मानव बोलू आणि विचार करू शकतो अन् विचार व्यक्त करू शकतो; पण ‘त्याचा अतिरेक होऊन त्याचा स्वतःवर परिणाम होऊ नये’, याची काळजी घेण्यात मानव न्यून पडतो आणि स्वभावदोषांच्या आहारी जाऊन संकटात सापडतो.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीने सांगितलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने साधकांना स्वभावदोष अन् अहं यांच्या विळख्यातून मुक्त व्हायला आणि साधनेत प्रगती व्हायला साहाय्य होत आहे.
‘हे गुरुमाऊली, आज या प्रसंगातून आपण मला पुन्हा स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याविषयी सतर्क केले’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– रजनी नगरकर (वय ७१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१२.२०२३)