महाविकास आघाडीच्या काळात फडणवीस यांसह भाजपच्या ३ नेत्यांच्या अटकेचा कट ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई – महाविकास आघाडी सरकारने काही खटले प्रविष्ट करून देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि आशिष शेलार यांना अटक केली असती. वर्ष २०२४ च्या निवडणुकीपूर्वी भाजपचे आमदार फोडण्याचाही कट महाविकास आघाडीने रचला होता. महाविकास आघाडीच्या काळात केवळ देवेंद्र फडणवीस यांनाच नव्हे; तर भाजपचे नेते गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांनाही अटक करण्याच्या घडामोडी चालल्या होत्या, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ एप्रिल या दिवशी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत केले.
या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे आणि स्वत:मध्ये वाद निर्माण होण्यामागील कारण सांगतांना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना मला ‘वर्षा’ बंगल्यावर बोलावले गेले आणि १ घंटा वाट पहायला लावली. असे २ वर्षे सातत्याने होत होते. राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी मला चर्चेपासून दूर ठेवण्यात आले. माझ्याकडून नगरविकास खातेही काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. नक्षलवाद्यांकडून धमक्या आल्यानंतरही मला ‘झेड प्लस’ सुरक्षा दिली गेली नाही.’’