संपादकीय : वैज्ञानिकांना चपराक !
हिंदु धर्मग्रंथांच्या माध्यमातून अनेकदा वासुकी सापाविषयीची माहिती किंवा त्याच्याविषयीचे प्रसंग वाचनात आले. हा नाग ‘दैवी’, ‘नागांचा राजा’ म्हणून संबोधला जात असे; पण आता या संदर्भात महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. गुजरात येथील कच्छमधील उत्खननात वासुकीचे जीवाश्म (एकेकाळी पृथ्वीवर वास्तव्य करणार्या अतिप्राचीन सजीवांचे जतन केलेले अवशेष किंवा त्यांनी खडकांमध्ये सोडलेले ठसे) सापडले आहेत. त्याला ‘वासुकी इंडिकस’, असे वैज्ञानिक नाव दिले आहे. वासुकीची लांबी ५० फूट, तर वजन १ टन होते. जीवाश्म म्हणून सापडलेल्या या सापाची लांबी ११ मीटर (३६ फूट) ते १५ मीटर (४९.२२ फूट) इतकी आहे. खरेतर हे जीवाश्म वर्ष २००५ मध्येच सापडले होते; पण तेव्हा ते मगरीचे जीवाश्म असल्याचे समजून त्यावर सखोल अभ्यास झाला नव्हता. आता २७ जीवाश्मांचा अभ्यास केल्यावर ते सापाचे असल्याची नोंद झाली. वासुकी सापाचा उपयोग देव आणि दानव यांनी मिळून समुद्रमंथन करण्यासाठी दोरीच्या रूपात केला होता. भगवान शिवाने वासुकीला आपल्या गळ्यात धारण केले होते.
आतापर्यंत अनेकांना प्रश्न होते की, वासुकी खरोखर अस्तित्वात होता का ? समुद्रमंथन घडले होते का ? वासुकी हा सर्पांचा राजा होता का ? वासुकीचे जीवाश्म सापडल्याने अर्थातच आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आतापर्यंत विज्ञान आणि वैज्ञानिक समुद्रमंथनाला काल्पनिक किंवा पुराणातील एक संकल्पना मानत होते; पण अशा उत्खननामुळे आता सर्वांचीच तोंडे बंद झाली आहेत. पुराणांना थोतांड मानणार्यांना अशा घटनांमुळे एकप्रकारे चपराकच बसली आहे. ज्या अर्थी वासुकीचे जीवाश्म सापडले, त्या अर्थी समुद्रमंथन म्हणजे केवळ पुराणातील कथा नसून वास्तवात घडलेली खरीखुरी गोष्ट आहे, हे सत्यही समोर आले. ‘समुद्रमंथनातून १४ रत्ने प्राप्त झाली’, ‘समुद्रमंथनातून देवांना अमृत प्राप्त होऊन त्यांचा विजय झाला’, या घटनांचीही पुष्टी झाली. या १४ रत्नांशी संबंधित एक श्लोक हिंदु धर्मात केल्या जाणार्या विवाहविधीतील मंगलाष्टकांच्या वेळीही म्हटला जातो. वासुकीच्या सापडलेल्या जीवाश्मांच्या माध्यमातून बुद्धीवाद्यांना पुराणातील अधिकाधिक गोष्टींचा शोध लागेल, हे निश्चित ! थोडक्यात काय, तर वासुकीचे जीवाश्म सापडणे ही हिंदु धर्माच्या दृष्टीने उल्लेखनीय गोष्ट ठरली आहे. हिंदु धर्म, वेद, पुराणे यांवर विश्वास ठेवायला हवा, ही जाणीव भारतियांमध्ये यातून दृढ हाेऊ लागेल.
प्रा. मॅक्समुलर याने प्रथम हिंदु संस्कृती बुडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण हिंदु संस्कृतीचे माहात्म्य समजल्यावर त्याने स्वतःच्या चुका सुधारून ‘इंडिया व्हॉट इट कॅन टिच अस ?’ (India what it can teach us ?) हा ग्रंथ लिहिला. यातून आताच्या वैज्ञानिकांनी बोध घ्यावा ! भारतियांवर पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा, तसेच वैज्ञानिकतेचा पुष्कळ पगडा आहे. त्यामुळे पाश्चात्त्यांच्या विचारसरणीनुसारच विचार आणि कृती केली जाते. प्रत्येक वेळी चिकित्सक बुद्धीने मोजून मापून पहाण्यापेक्षा आपली संस्कृती, परंपरा यांवर विश्वास ठेवून त्यानुसार आचरण केल्यास त्यातून पारलौकिक आणि पारमार्थिक उत्कर्ष साधला जाणार आहे, हे लक्षात घ्या !
वासुकी सापाचे सापडलेले जीवाश्म म्हणजे पुराणांना थोतांड मानणार्यांना मिळालेली चपराकच ! |