विविध प्रकारच्या सेवा भावपूर्ण आणि कौशल्याने करणारे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख ! (वय : ३६ वर्षे) !
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांचा आज ३६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची आई आणि बहीण यांना श्री. निषाद यांच्यात जाणवलेले पालट अन् लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्री. निषाद देशमुख यांना ३६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा ! |
१. सौ. क्षिप्रा देशमुख (श्री. निषाद यांची आई, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. अंतर्मुखतेत वाढ होणे : ‘निषादचे बोलणे न्यून झाले आहे. ‘त्याच्यातील अंतर्मुखता वाढली आहे’, असे जाणवते. पूर्वी तो सर्वच गोष्टींविषयी मत व्यक्त करत असे आणि ‘हे असेच झाले पाहिजे’, असा त्याचा आग्रह असे. आता त्याचे तसे बोलणेही न्यून झाले आहे.
१ आ. ईश्वराकडून सोप्या भाषेत ज्ञान मिळणे : त्याचे सर्व शिक्षण इंग्रजी-हिंदी भाषेत झाले आहे. त्याला मराठी भाषा येत नव्हती. त्याला ईश्वराकडून सूक्ष्मातून ज्ञान मिळायला लागल्यावर त्याला ज्ञानात जसे शब्द मिळत होते, त्याप्रमाणे तो टंकलेखन करत असे. त्याला त्या शब्दांचे अर्थही ठाऊक नसत. तो त्याविषयी आम्हाला विचारत असे. आता त्याला ईश्वराकडून सोप्या भाषेत ज्ञान मिळते.’
२. कु. निधी देशमुख (श्री. निषाद यांची बहीण), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. स्वीकारण्याची स्थिती
२ अ १. लहान वयात मधुमेह होणे आणि त्या संदर्भातील सर्व पथ्ये पाळणे : ‘निषादला मधुमेह झाल्यावर ते त्याला सहजतेने स्वीकारता आले, तसेच त्याने त्यासंबंधी सर्व पथ्ये पाळणे चालू केले. त्याची ‘इतक्या लहान वयात माझ्या संदर्भात असे का झाले ?’, अशी चिडचिड झाली नाही. ‘मला इतकी वर्षे सर्व करता आले’, याबद्दल तो कृतज्ञ आहे.
२ अ २. शस्त्रकर्म झाले असल्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाच्या वेळी उपस्थित रहाता न आल्याचे सहजतेने स्वीकारणे : त्याला सेवा करण्याची पुष्कळ तळमळ आहे, तरीही त्रासामुळे त्याला सेवा करणे शक्य होत नसल्यास तो ती स्थितीही तेवढ्याच सहजतेने स्वीकारतो. निषादचे शस्त्रकर्म झाले असल्याने वर्ष २०२२ च्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाच्या वेळी त्याला उपस्थित रहाता आले नाही. त्याने ती स्थिती स्वीकारली.
२ आ. विविध प्रकारच्या सेवा कौशल्याने करणे
२ आ १. सर्व प्रकारच्या सेवा मनापासून करणे आणि उत्तरदायी साधकांनी निषादची प्रशंसा करणे : निषादचे मन पूर्णपणे सेवेत गुंतलेले असते. त्याला सेवेविषयी आवड-नावड नाही. तो सर्व प्रकारच्या सेवा मनापासून करतो, उदा. आश्रमातील ध्यानमंदिराची स्वच्छता करणे असो, आश्रम दाखवायची सेवा असो, अल्पाहारासाठी इडलीचे पीठ यंत्रावर दळण्याची सेवा असो किंवा भाषांतराची सेवा असो. तो सर्व प्रकारच्या सेवा मनापासून आणि कौशल्यपूर्ण करतो. उत्तरदायी साधक त्याची माझ्याकडे प्रशंसा करतात.
२ आ २.‘त्याला ईश्वराकडून ज्ञान मिळते, तर तीच सेवा करायला हवी’, असा त्याचा आग्रह नसतो.
२ आ ३. शब्दकोषाशी संबंधित सेवा देहभान हरपून करणे
२ आ ३ अ. उत्तरदायी साधकांना विचारणे : तो शब्दकोष सेवाही तेवढ्याच समर्पितभावाने करतो. त्याच्यातील कौशल्य पाहून त्याला आणखी पुढच्या स्तरावरच्या सेवा दिल्यास त्या सेवाही तो कुठलेही गार्हाणे न करता करतो. ‘या सेवा करत असतांना ज्ञानप्राप्तीच्या सेवेत काही अडचण यायला नको’, यासाठी तो उत्तरदायी साधकांना विचारून घेतो.
२ आ ३ आ. नवीन संकल्पना सुचणे आणि साधकांशी जवळीक साधून त्यांना पुढच्या टप्प्याची सेवा करायला प्रोत्साहन देणे : तो शब्दकोषाशी संबंधित सेवा करतांना त्याला प्रत्येक टप्प्याला नवीन संकल्पना किंवा नवीन उपाययोजना सुचत असे. तो त्यासंबंधी विचारांमध्ये इतका मग्न असे की, ‘दिवस आहे कि रात्र आहे’, हेही त्याच्या लक्षात येत नसे. त्याला काही सुचल्यास तो मला त्यासंबंधी सांगून ‘असे केल्याने लाभ होईल का ? असे केल्याने काय अडचणी येऊ शकतात ?’, असे सतत विचारत असे. या सेवेच्या संदर्भात समन्वय करतांना त्याने कधीही भेट न झालेल्या साधिकेशी जवळीक साधून त्यांना सेवेत सहभागी करून घेतले. ‘त्या साधिकेला या सेवेतून आनंद मिळेल’, अशा प्रकारे तो त्या साधिकेशी संवाद साधतो. तो त्या साधिकेला ‘अडचणी उत्तरदायी साधकांना सांगून त्यांचे मार्गदर्शन घेणे’, यासाठी प्रोत्साहन देतो.
२ आ ४. यज्ञ चालू असतांना सूत्रसंचालनाची सेवा उत्साहाने, पुढाकार घेऊन आणि अभ्यासपूर्ण करणे
२ आ ४ अ. देवतेशी संबंधित पुराणे आणि कथा यांचे अभ्यासपूर्ण वाचन करणे : आश्रमात यज्ञ करण्याचे नियोजन असतांना यज्ञासंबंधी माहिती सांगण्यासाठी तो आधीपासून अभ्यास करतो. तो संबंधित देवतेशी संबंधित पुराणे आणि कथा यांचे वाचन करतो. त्यातील ‘कुठली सूत्रे सांगायची ?’, याविषयी तो विचार करून त्यासंबंधी श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४१ वर्षे) यांना विचारतो.
२ आ ४ आ. सूक्ष्मातील घडामोडींविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना विचारणे, घटनांच्या ‘स्लाइड्स’ करणे आणि त्यासंबंधी समन्वयही करणे : त्याला यज्ञाविषयी सूक्ष्मातून काही लक्षात आल्यास तो सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगतो. यज्ञाच्या वेळी काही वैशिष्ट्यपूर्ण घटना घडल्यास ‘त्याच्या ‘स्लाइड्स’ करायच्या का ?’, हेही तो विचारून घेतो. तो त्याच्या ‘स्लाइड्स’ बनवतो. तो ‘कुठल्या वेळेत काय बोलणार ? तेव्हा कुठली स्लाइड पडद्यावर असेल’, याचा समन्वयही पुष्कळ उत्साहाने करतो. तो हे करतांना ‘काय अडचणी आल्या ? त्यावर काय उपाययोजना काढू शकतो ? आणखी नवीन काय करू शकतो ?’, या विचारांत असतो.
२ आ ४ इ. निषाद निवेदन करत असतांना साधकांची भावजागृती होणे आणि निषादने त्याविषयी ‘गुरुकृपेनेच सर्व होते’, असे सांगणे : अनेक साधकांनी मला सांगितले, ‘‘निषादचे निवेदन ऐकून आमची भावजागृती होते.’’ तो कागदावरील सूत्रे न वाचता, न अडखळता, सर्व सूत्रे स्मरणात असल्याप्रमाणे एका लयीत निवेदन करतो. त्याला ‘हे सर्व तो कसे काय करू शकतो ?’, असे विचारल्यावर तो ‘गुरुकृपेनेच सर्व होते’, असे सांगतो.’
( लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २८.१.२०२४)
——————
मातृ-पितृस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले !गुरुदेवा (परात्पर गुरु डॉ. आठवले), आपणच निषादला सर्वकाही शिकवले. मी नोकरी करत असल्याने मला मुलांसाठी पुष्कळ वेळ देता येत नसे. मी निषादला ‘अ, आ, इ, ई’ ही शिकवली नाही. प्रौढांना अक्षरज्ञान करण्यासाठी असलेल्या दूरदर्शनवरील ‘चौराहा’ नावाच्या कार्यक्रमात ‘अक्षरे कशी काढायची ?’, हे शिकवले जात असे. ते कार्यक्रम पाहून मुलांना अक्षरांची ओळख झाली. आम्ही मुलांना घडवले नाही. ‘गुरुदेवा, आपणच त्यांना पदोपदी मार्गदर्शन करत आहात’, याचीच आम्हाला अनुभूती येते. आपणच आम्हाला तीव्र त्रासांतही धीर दिला. आपणच आम्हाला आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर आणले. आम्ही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावर एकदाही आमच्या मनात ‘मुलांचे पुढचे आयुष्य कसे असेल ?’, अशी शंका आली नाही. आपणच मातृ-पितृ स्वरूप आहात. आम्ही मुलांना आपल्या चरणी अर्पण केले असल्याने आम्हाला त्यांची काळजी वाटत नाही.’ – सौ. क्षिप्रा देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६९ वर्षे) (२८.१.२०२४) |
|