मारहाण करणार्या धर्मांध समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी !
पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांची मागणी !
धुळे येथे भाविकांना मारहाण झाल्याचे प्रकरण
धुळे, २१ एप्रिल (वार्ता.) – जिल्ह्यातील देवपूर येथे १८ एप्रिल या दिवशी श्रीरामाची गाणी वाजवली; म्हणून मुसलमानांनी भाविकांवर दगडफेक केली. ५-६ भाविकांना मारहाणही केली. या प्रकरणी देवपूर पोलिसांनी एकूण ४ जणांवर गुन्हा नोंद केला. या घटनेनंतर मारहाण करणार्या समाजकंटकांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि नुराणी मशिदीजवळचे अनधिकृत अतिक्रमण त्वरित हटवावे, अशी मागण्यांचे निवेदन निवेदन हिंदुत्वनिष्ठ आणि भाजप यांच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे आणि महापालिकेचे आयुक्त श्रीमती अनिता दगडे यांना १९ एप्रिल या दिवशी देण्यात आले.
या वेळी भाजपचे महानगर सरचिटणीस श्री. ओमप्रकाश खंडेलवाल, श्री. यशवंत येवलेकर, जिल्हा प्रवक्ता श्री. श्यामकांत पाटील, भाजयुमोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. आकाश परदेशी, महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई शिरसाट, भाजयुमो महामंत्री श्री. पंकज धात्रक, भाजप सोशल मीडिया संयोजक श्री. पवनजी जाजू आदी पदाधिकारी आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की,…
१. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र पौर्णिमेला गड निवासी असणार्या श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला पायी जाणार्या भक्तांची संख्या अधिक आहे. नंदुरबार-शिरपूर तालुक्यांतून सहस्रो भाविक धुळे मार्गे सप्तशृंगी गडावर जातात.
२. काही भक्त आग्रा रस्त्यावरील देवपूर नुराणी मशिदीजवळ आले असतांना काही धर्मांध समाजकंटकांनी त्यांना अडवून मारहाण केली. या घटनेचा समाजातील सर्वच स्तरांतून तीव्र निषेध करण्यात आला.
भाजप महानगराच्या वतीने उपरोक्त घटनेचा तीव्र निषेध करत धुळे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. बाबासाहेब भामरे यांच्या सूचनेनुसार आणि महानगर भाजपचे अध्यक्ष श्री. गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे महानगरपालिकेचे माजी महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी आणि माजी उपमहापौर सौ. कल्याणीताई अंपळकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. अनधिकृत अतिक्रमणामुळे समाजकंटकांना अशा कारवाया करण्यास प्रोत्साहन मिळते आणि गुंड पसार होतात. यामुळे या परिसरातील अतिक्रमण हटवणे हा योग्य पर्याय आहे.