‘आपल्यामध्ये सेवेची तळमळ असेल, तर गुरुदेव कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्याकडून सेवा करून घेतात’, याची प्रचीती येणारे लुधियाना, पंजाब येथील श्री. प्रमोद शर्मा !
१. साधना चालू केल्यावर भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने अनेक अनुभूती येणे आणि साधना करण्याचे महत्त्व लक्षात येणे
‘वर्ष २००९ मध्ये गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने माझी साधना चालू झाली. भगवान श्रीकृष्णाने मला अनेक अनुभूती दिल्या आणि ‘माझ्या जीवनात ‘साधना करणे’ हेच एकमेव ध्येय आहे’, हे मी मनापासून स्वीकारले. मला ‘सामाजिक नातेसंबंधांना फारसे महत्त्व देऊ नये. जीवनात काही मिळवायचे राहिले नाही’, असे वाटू लागले. नंतर गुरुदेवांनी मला सूक्ष्मातून सुचवल्यानुसार मी समष्टी साधना केली आणि त्यानंतर साधनेचा पुढील टप्पा आला.
२. समाजातील व्यक्तींना कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करायला सांगणे
मी सूक्ष्मातून गुरुदेवांना विचारून समाजातील लोकांना साधना सांगू लागलो. मला एखादी व्यक्ती भेटल्यास ‘तिला साधनेविषयी सांगितले पाहिजे’, असे मला वाटत असे. तेव्हा मी त्या व्यक्तीला साधनेचे दोन मूलमंत्र ‘श्री कुलदेवतायै नमः । आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप सांगत होतो. ‘श्रीकृष्णाला योग्य वाटेल तशी साधना त्याने त्या व्यक्तीकडून करून घ्यावी’, असे वाटून मी पुढील व्यक्तीला साधनेविषयी सांगत होतो. गुरुदेवांच्या कृपेने आतापर्यंत मी अनुमाने २०० हून अधिक व्यक्तींना साधनेविषयी सांगू शकलो.
३. गुरुदेवांच्या कृपेने कोणत्याच गोष्टीची उणीव न भासणे
मला व्यष्टी साधनेपेक्षा समष्टी साधनाच अधिक आवडते. मला कधी साधनेसंबंधी काही अडचण आली किंवा काही प्रश्न आला, तर गुरुदेव मला मनातूनच उत्तर सुचवतात. मी कधीच सनातनचा आश्रम किंवा साधक यांच्या संपर्कात नव्हतो, तरीही गुरुदेवांनी मला कधीही कोणत्याच गोष्टीची उणीव भासू दिली नाही. माझ्या जीवनात निर्माण झालेल्या प्रत्येक परिस्थितीत गुरुदेवांनीच मला सांभाळले आहे आणि ‘त्या परिस्थितीत पुढे कसा मार्ग काढायचा ? कोणता निर्णय घ्यायचा ?’, हे त्यांनी मला अंतर्मनातून सुचवले. एकदा गुरुदेवांचा सत्संग लाभल्यावर ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही अगदी एकलव्यासारखी साधना करत आहात.’’ खरे सांगायचे झाले, तर माझी साधना अक्षरशः तशीच होत आहे.
४. घरोघरी जाऊन शिकवणीवर्ग घेण्याच्या निमित्ताने तेथील मुलांवर साधनेचे संस्कार करणे आणि त्यांच्या पालकांनाही साधना सांगणे
मी साधना करू लागल्यावर माझे मन मला सांगत असे, ‘युवा पिढीला सन्मार्ग दाखवला आणि त्यांच्यावर सुसंस्कार केले, तर भविष्यात रामराज्याचे स्वप्न सहजतेने पूर्ण होऊ शकते.’ त्या वेळी ‘धनार्जन करणे’ या उद्देशाच्या ऐवजी ‘केवळ माझी साधना व्हावी’, या भावाने मी घरोघरी जाऊन शिकवणीवर्ग घ्यायला आरंभ केला. तेव्हा मी लहान मुलांना अभ्यास शिकवून त्यांना साधना सांगत असे, तसेच त्यांच्या पालकांनाही साधना सांगत असे. मी काही मुलांना प्रत्येक शनिवारी ‘रामायण’ या दूरचित्रवाणीवरील मालिकेचा एकेक भाग दाखवत होतो आणि सर्व भाग दाखवून झाल्यानंतर त्यांना श्रीरामाच्या चरित्राशी संबंधित प्रसंग शिकवत होतो. त्यामुळे ‘त्यांच्यावर चांगले संस्कार बिंबवले जातील’, असा माझा विचार होत असे. मुलांच्या अभ्यासाच्या विषयांची अध्यात्माशी सांगड घालून मी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत होतो. मी मुलांना पाठ्यपुस्तकातील भारताचा इतिहास शिकवतांना त्यांना ‘भारताचा खरा इतिहास काय आहे ?’, हे शिकवण्याचा प्रयत्न करत होतो. मी वर्ष २०२२ पर्यंत शिकवणीवर्ग घेत होतो.
५. ‘शिकलेल्या गोष्टींचा सेवेसाठी उपयोग व्हावा’, असे वाटणे
वर्ष २००५ मध्ये माझा ‘ॲनिमेशन’चा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर मी मुंबईत नोकरी करत होतो. वर्ष २००९ मध्ये माझ्या साधनेला आरंभ झाल्यावर माझ्या मनाला एक खंत वाटत होती की, ‘गुरुदेवांनी मला एवढे काही शिकवले आहे. त्याचा सेवेसाठी उपयोग केव्हा होणार ? मी शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग आश्रम आणि प्रसार यांसाठी केव्हा करू शकीन ?’
६. अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनानिमित्त आश्रमात राहून चलचित्रांचे संकलन करण्याची सेवा मिळणे
त्यानंतर वर्ष २०२१ मध्ये कोरोनाच्या कालावधीत गुरुदेवांच्या कृपेने मला चलचित्रांचे संकलन करणे (‘व्हिडियो एडिटिंग’) आणि ‘स्लाइड’ बनवणे, या सेवा करण्याची संधी लाभली. जून २०२२ मध्ये गुरुदेवांच्या कृपेने मला आश्रमात राहून अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनानिमित्त चलचित्रांचे संकलन करण्याची सेवा मिळाली. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘आपल्यामध्ये सेवेची तळमळ असेल, तर गुरुदेव कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्याकडून सेवा करून घेतात.’
७. कृतज्ञता
गुरुदेवांनीच माझ्या मनात येणार्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सुचवले आणि माझा साधनेचा मार्ग सुकर केला. ‘प्रत्येक श्वास घेतांना माझी साधना कशी होईल ? मी समष्टी साधना कशी करू शकतो ?’, हेही गुरुदेवांनीच मला सुचवले. कोटीशः कृतज्ञता गुरुदेव !’
– श्री. प्रमोद शर्मा (वय ४० वर्षे), लुधियाना, पंजाब. (१५.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |