Goa Unseasonal Rains : उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या गोमंतकियांना पावसामुळे दिलासा
आणखी पाऊस पडण्याची चेतावणी !
पणजी : २० एप्रिलला राज्यात अवेळी पडलेल्या पावसामुळे गेले काही दिवस उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या गोमंतकियांना दिलासा मिळाला आहे. २० एप्रिलला पहाटे गोव्यात पावसाच्या मोठ्या सरी पडायला प्रारंभ झाला. दिवसभरही ढगांनी आकाशात दाटी केली होती. सकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता. मध्ये काही घंटे विश्रांती घेतल्यावर सकाळी १० वाजता पुन्हा पाऊस कोसळला.
या पावसामुळे काही ठिकाणी झाडे कोसळणे, गटारे तुंबणे, माती वाहून जाणे, छप्पर उडून जाणे, असे प्रकार घडले. यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबले होते.
पणजीतील ‘स्मार्ट सिटी’च्या कामांवर विपरीत परिणाम
भाजप कार्यालयाजवळील आत्माराम बोरकर रस्त्यावरील एक पदपथ अवघ्या काही घंट्यांच्या पावसाने खचला. हा पदपथ निरुपयोगी होण्यासह मलनिस्सारण वाहिनीच्या चेंबरची मोठ्या प्रमाणात हानी झाली, तसेच जवळची जलवाहिनीही फुटली. काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी या ठिकाणाची पहाणी करून ‘स्मार्ट सिटी’च्या कामातील भ्रष्टाचार आणि नियोजनशून्यता यांमुळे ही स्थिती ओढवल्याची टीका केली आहे. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या काही भागांतही सकाळी पाणी साचले होते. रुग्णांना पाण्यातूनच नियोजित वॉर्डमध्ये जावे लागत होते.
काही ठिकाणी वादळ होण्याची शक्यता !
हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ (मध्यम पाऊस) घोषित केला आहे. गोव्यात २१ एप्रिलला काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून या ठिकाणी ३० ते ४० किलोमीटर प्रतिघंटा वेगाने वारे वहाण्याची शक्यता आहे. ही स्थिती लक्षात घेऊन मासेमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.