कोल्हापूर जिल्ह्यातील ३ सहस्र ८५१ शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
कोल्हापूर : पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी सादर केलेल्या सूचीप्रमाणे आणि छाननी समितीच्या बैठकीत निर्णय झाल्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ३ सहस्र ८५१ शस्त्रे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.
शासनाकडील गठीत करण्यात आलेल्या छाननी समितीच्या बैठकीमध्ये जामिनावर सोडलेल्या व्यक्ती, दंग्यांमधील व्यक्ती, तसेच अन्य यांच्याकडून राजकीय हितसंबंधातून त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी सर्व शस्त्रे जमा करून घेणे अत्यावश्यक आहे. यात पेट्रोलपंप, कारखाने, अधिकोष, ‘ए.टी.एम्.’ या ठिकाणचे सुरक्षारक्षक यांच्याकडील शस्त्रे जमा करण्यापासून सवलत देण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंडविधान कलम १८८ मधील प्रावधानांनुसार कारवाईस पात्र राहील, असे अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी कळवले आहे.