‘हिल रायडर्स फाऊंडेशन’ आणि ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’ यांच्या वतीने जोतिबा मंदिर परिसरातील वास्तूंची स्वच्छता !
कोल्हापूर : जोतिबा देवाच्या होत असलेल्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘हिल रायडर्स फाऊंडेशन’ आणि ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’ यांच्या वतीने जोतिबा मंदिर परिसरातील वास्तूंची स्वच्छता करण्यात आली. हा उपक्रम गेली अनेक वर्षे चालू असून कार्यकर्त्यांनी जोतिबा डोंगर परिसरातील मुख्य द्वार, गाठी दरवाजा, दोन्ही बाजूंची तटबंदी यांसह परिसराची २ दिवस स्वच्छता केली.
यात भिकाजी शिंगे, दिग्विजय उपारे, इशिना उपारे, दुर्वा उपरे, श्रुती पुणे, लोक सांगळे, आराध्य सांगळे, सर्वज्ञ भोरे, ओंकार ठाकरे यांसह अन्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
या स्वच्छतेत अवघड ठिकाणी उगवलेली झाडे-झुडपे काढण्यासाठी गिर्यारोहणाच्या तंत्राचा वापर करण्यात आला. या स्वच्छतेत देवस्थान समिती, ग्रामपंचायत जोतिबा, जिल्हा प्रशासन, ‘समित ॲडव्हेंचर’ यांचे सहकार्य लाभले, तसेच ‘हिल रायडर्स फाऊंडेशन’चे अध्यक्ष श्री. प्रमोद पाटील, ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’च्या अध्यक्षा श्रीमती शीतल ढोली यांचे मार्गदर्शन लाभले.