एकतर्फी प्रेमातून हत्या झालेल्या तरुणीचा खटला जलदगती न्यायालयात चालवा ! – राष्ट्रीय जंगम संघटना
कोल्हापूर – दोन दिवसांपूर्वी हुबळी येथे उच्च शिक्षण घेणारी नेहा हिरेमठ हिची संशयित फैय्याज याने एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या केली. या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस तात्काळ फाशी देण्यात यावी, या मागणीचे निवेदन ‘राष्ट्रीय जंगम संघटने’च्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी स्वीकारले. या प्रसंगी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नेहा ही जंगम समाजातील सुसंस्कारी, शांत, हुशार मुलगी म्हणून ओळखली जात होती. संशयित आरोपी फैय्याज हा तिच्या वर्गात शिकत होता. तो सतत तिच्या मागावर असायचा आणि अश्लील हावभाव करत असे. या संदर्भात तिने फैय्याजच्या घरच्यांकडे तक्रार केली होती; मात्र याचा काही लाभ झाला नाही. नेहा आपल्या मनाप्रमाणे वागत नाही, हे लक्षात आल्यावर फैय्याजने तिचा काटा काढण्याच्या उद्देशाने तिच्यावर चाकूने वार करून तिचे जीवन संपवले.
या प्रसंगी राष्ट्रीय जंगम संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. संतोष जंगम, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, पिंटू स्वामी, सर्वश्री महेश स्वामी, कुमार हिरेमठ, चंद्रकांत हिरेमठ, दीपक स्वामी, मयुरेश स्वामी, अजय जंगम, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, हिंदू एकता आंदोलनाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, धर्मप्रेमी श्री. नीलेश कुलकर्णी यांच्यासह कोल्हापूर जिल्हा जंगम पुरोहित सेवा संस्था, श्री पंचाक्षर माहेश्वर जंगम पौरोहित्य मंडळ, महाराष्ट्र अखिल भारतीय वीर सेवा लिंगायत मंडळ यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.