अहिल्यानगरमधील सर्व पशूवधगृहे भुईसपाट करण्याची विविध हिंदु संघटनांची मागणी !
त्वरित कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याची चेतावणी !
अहिल्यानगर – येथील शहर आणि जिल्ह्यातील सर्व पशूवधगृहे त्वरित भुईसपाट करण्यात यावीत, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल, तसेच अखिल भारत कृषी गोसेवा संघाने केली आहे. महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही काही समाजकंटक त्या कायद्याची पायमल्ली करीत असल्याचा आरोप या संघटनांनी केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईला न जुमानता हे गोभक्षक सर्रास गोवंशियांची कत्तल करत असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे. नगर शहर आणि जिल्ह्यात जेथे पशूवधगृहे आहेत, ती त्वरित भुईसपाट करून आरोपींना गजाआड करावे, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन यांना देण्यात आल्याची माहिती मानद पशूकल्याण अधिकारी ऋषी भागवत यांनी दिली. त्वरित कार्यवाही न झाल्यास आंदोलनाची चेतावणी देण्यात आली आहे.
या वेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने बजरंग दल जिल्हा संयोजक कुणाल भंडारी, मानद पशू अधिकारी ऋषिकेश भागवत, साहिल पवार, सनी थोरात, शिवराज पवार, सचिन पवार आदी बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादकीय भूमिका :अशी मागणी का करावी लागते ? गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी पोलिसांनी स्वतःहून गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करून पशूवधगृहे बंद करावीत ! |