प्राचीन मंदिरांतील मूर्तींची वैशिष्ट्ये !
१. भारतातील प्राचीन मंदिरे ही अंगभूत वैज्ञानिक उन्नतीचे प्रदर्शक आहेत. असे एकही प्राचीन मंदिर नाही की, ज्यात प्राचीन काळातील वैज्ञानिक प्रगती प्रतीत करणारे उदाहरण नाही !
२. प्राचीन मंदिरांतील मूर्ती केवळ ठोकळ्यासारख्या नाहीत, तर त्या काही ना काही कृती करत आहेत. अनेकदा अनेक मूर्तींचा समूह मिळून काहीतरी कृती करत आहे, उदा. मिरवणूक, युद्ध, स्त्रियांचा नट्टापट्टा, बाजारात जाणे, खेळणे, पोहणे, उपचार करणे इ. मानवी जीवनातील अनेकविध विषय यात हाताळले गेले आहेत. या सामूहिक कलाकृतींमध्ये एकप्रकारची गतीमानता आहे.
३. या सामूहिक कलाकृतींत बरेचदा एक तर काहीतरी छोटी कहाणी किंवा पौराणिक प्रसंग किंवा काहीतरी अत्यंत बोधप्रद संदेश आहे. काही वेळा आपल्याला पटकन हसू येईल, असेही संदेश या कलाकृतींमध्ये आहेत.
४. मूर्तींच्या चेहर्यावर विलक्षण हावभाव आहेत. त्यात दुःख, निराशा, हास्य, सुख, कामुकता, राग, द्वेष, शांतता, निर्विचार , एकाग्रता अशा अनेक मानवी भावभावना अतिशय स्पष्टपणे लक्षात येतील, अशा त्या घडवलेल्या आहेत.
५. विविध प्रकारची शस्त्रे, आधुनिक यंत्राप्रमाणे असणारी कित्येक उपकरणे या मूर्तींच्या समवेत आढळतात, उदा. स्तनाचा कर्करोग किंवा पोट तपासण्याच्या आधुनिक यंत्राप्रमाणे दिसणारे उपकरण , कोरीव कामाची आधुनिक यंत्रे, भ्रमणभाषसारख्या आकृत्या, दुर्बिणी, सायकल, बॅटरीसारखे ऊर्जा देणारे उपकरण, बॅग, सौंदर्यप्रसाधने आदी गोष्टी या मूर्तींच्या हातात आहेत.
६. मंदिरांतील मूर्तीतून, तिच्या डोळ्यांतून, शरिराच्या ठेवणीतून आणि तिच्या स्पंदनांतून ती बोलकी वाटते, काही नाही ना काही सांगत आहे, सुचवत आहे, असे वाटते. अगदी सध्याच्या काळात ती मूर्ती भंग झालेली, झिजलेली असली, तरीही असे जाणवते. यावरून मूर्तीकारांचा भाव त्यात उतरला आहे, हे लक्षात येते.
७. काही मूर्तींचे चेहरे भारतीय सभ्यता, उच्चतम आध्यात्मिक आणि नैतिक संस्कृती, प्रगल्भता, निर्माेहिता प्रतीत करतात.
८. मंदिरात शृंगारिक मूर्ती करण्यामागील ऐतिहासिक कारण प्रामुख्याने हे सांगितले जाते की, त्या काळात युद्धात मोठ्या प्रमाणात पुरुष मारले जायचे. त्यानंतर बहुतांश जण संन्यास स्वीकारायचे. बहुतांश जण हे निर्माेही किंवा आध्यात्मिक जीवन जगणारे होते. त्यामुळे पुढील लोकसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने काही मंदिरांवर कामक्रीडा करणार्या मूर्ती कोरण्याची योजना करण्यात आली. यात खजुराहोपासून कोणार्कपर्यंत अनेक मंदिरांचा समावेश होतो.
९. आपल्या पूर्वजांनी मंदिरांच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान, त्यांचे सर्व क्षेत्रांतील ज्ञान दगडात कोरून सांगून ठेवले, म्हणून निदान आज आपल्याला त्याविषयी कल्पना येऊ शकते.
१०. प्राचीन मंदिराचे स्थापत्य आणि त्यांतील वैज्ञानिक प्रयोगांचे पुरावे यांवर सखोल संशोधन होण्याची नितांत आवश्यकता आहे. हे संशोधन ना केवळ वैज्ञानिक ज्ञान प्रदान करेल, त्याचसमवेत आपल्यात प्रखर धर्माभिमान आणि भक्तीही निर्माण करेल !
– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.४.२०२४)