हिंदूंच्या मंदिर स्थापत्यशास्त्रातील ध्वनीशास्त्र !
१. गर्भगृहाचे वैशिष्ट्य : देवळाला छत नसल्यास खुल्या आकाशात ‘ॐ’ चा ध्वनी (देवतेचे तत्त्व) नाहीसा होईल. देवळाला गोल घुमट असल्याने प्रतिध्वनी वर्तुळाकार घुमत रहातो. गर्भगृहाला खिडक्या नसतात आणि छोटेसे दार असते. त्यामुळे प्रतिध्वनी तेथेच फिरत रहातो. अशा ध्वनीच्या वातावरणात मनातील विचार बंद होतात.
२. वर्तुळाकार ध्वनीच्या वातावरणात विचार बंद होणे : खुल्या आकाशात ‘ॐ, राम’ इत्यादी ध्वनी नाहीसा होतो; पण मंदिरात गोल घुमट असल्यावर ‘ॐ’चे अनेक प्रतिध्वनी परत परत घुमत रहातात. मंदिराच्या बांधकामासाठी तबल्यासारखा आवाज देणारे दगड निवडत असत. विशिष्ट मंत्रांचा उच्चार वर्तुळाकार ध्वनी आणि प्रतिध्वनी यांच्या रूपाने मंत्रयुक्त वातावरण निर्माण करत असतो. घंटेचा नाद वर्तुळाकार फिरतो. अशा वर्तुळाकार ध्वनीच्या वातावरणात मनात विचार येणे बंद होते. पश्चिमी लोकांना मंदिर आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य वाटते; कारण आत जायचा मार्ग अरुंद असतो आणि त्याला एकच दरवाजा असतो. खिडकी नसते. त्यामुळे हवा खेळती नसते. येथे लक्षात घेण्यासारखे सूत्र म्हणजे दरवाजे, खिडक्या असतील, तर ध्वनीचे वर्तुळ निर्माण होणार नाही.
– (कै.) सद्गुरु (डॉ.) वसंत बाळाजी आठवले (वर्ष १९९०)