प्राचीन भारतीय मंदिरांचा अलौकिक वारसा !

दक्षिण ध्रुवापर्यंतचा विनाअडथळा मार्ग दाखवणारे सोमनाथ मंदिर !

१२ ज्योतिर्लिंगांपैकी हे पहिले ज्योतिर्लिंग. गुजरातमधील काठियावाड येथील हे सोमनाथ मंदिर चंद्रदेव सोमराज यांनी ऋग्वेदानुसार बांधले होते. चुंबकीय प्रभावामुळे येथील शिवलिंग हवेत डोलत असे. वास्तुकलेचे ते एक अद्भूत उदाहरण आणि  सोन्या-चांदीचे अफाट भांडार होते. याच जागेवर प्राचीन मंदिरावर एक शिलालेख आहे, जो सूचित करतो की, येथून दक्षिण ध्रुवापर्यंत कोणत्याही अडथळ्याविना पोचता येते. महासागर शास्त्रज्ञांना नंतर हे अचूक असल्याचे आढळले. यावरून आपल्या ऋषीमुनींना संपूर्ण जगाचे भौगोलिक ज्ञान प्राप्त झाले होते, हे लक्षात आले !

आय.आय.टी. गांधीनगर, ४ अन्य संस्था आणि पुरातत्त्व शास्त्रज्ञ यांनी मंदिराच्या खाली ‘एल्’ या इंग्रजी अक्षराच्या आकाराची ३ मजली इमारत असल्याचे नुकतेच सांगितले आहे.

वर्ष १०२५ मध्ये लुटारू गझनीने ५ सहस्र सैनिकांसह आक्रमण केले. मंदिरावर संकट आल्याचे पाहून शहरातील सहस्रो नि:शस्त्र हिंदू मंदिराच्या रक्षणासाठी धावले. त्याने ५० सहस्र नागरिकांचा बळी घेऊन केवळ मंदिरच उद्ध्वस्त केले नाही, तर सहस्रो टन संपत्तीही लुटली ! १७ वेळा मुसलमान आक्रमकांनी हे ध्वस्त केले आणि अनेकदा राजांनी ते बांधले !


दैवी अस्तित्वाची साक्षात् अनुभूती !

६ मास दिवा तेवत रहाणारे उत्तराखंडमधील केदारनाथ !

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ! हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर आहे. महाभारताच्या युद्धानंतर पांडवांवर शिव रागवले होते. त्यांना न भेटण्यासाठी शिवाने बैलाचे रूप धारण केले होते. त्याच्या पाठीचा भाग येथे पडला. त्यामुळे येथील शिवलिंग हे बैलाच्या पाठीच्या आकाराचे आहे. त्याचीच पूजा केली जाते. एके काळी तब्बल ४०० वर्षे हे मंदिर बर्फात गाडले गेले होते. मंदिर एका दगडाच्या खाचेत दुसरा दगड बसवून (इंटरलॉकिंग सिस्टिम) बनवले गेले आहे. दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी मंदिराची द्वारे बंद केली जातात आणि ६ मास मंदिर बंद असते; तरीही मंदिराच्या आत लावलेला दिवा जळत असतो. त्या काळात या मंदिराच्या आसपासही कुणी फिरकत नाही; कारण या काळात प्रचंड बर्फवृष्टी होत असते !

केदारनाथाचे दर्शन घेतल्याशिवाय बद्रीनाथ यात्रा सफल होत नाही, असे म्हटले जाते. कैलास पर्वताप्रमाणेच याचे महत्त्व आहे.    वर्ष २०१३ मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या विध्वंसक पुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले आणि मंदिर परिसराचीही मोठी हानी झाली; परंतु केदारनाथ मंदिराला मात्र धक्का लागला नाही !


जगातील एक महान आश्चर्य !

थिरूवनंतपुरम् येथील गर्भश्रीमंत पद्मनाथस्वामी मंदिर !

केरळमधील तिरुवनंतपूरम् मधील पद्मनाभ मंदिर हे भारतातील सर्वांत श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते.

श्री पद्मनाभस्वामी मंदिर सौंदर्य आणि भव्यता यासाठीही प्रसिद्ध आहे. भगवान विष्णूला समर्पित, हे भारतातील १०८ पवित्र विष्णु मंदिरांपैकी एक किंवा ‘दिव्य देशम्’ आहे. त्रावणकोरचा महान राजा, मार्तंड वर्मा यांनी आज आपण पाहत असलेल्या मंदिराचे नूतनीकरणाचे काम केले, असे म्हटले जाते.

येथील ५ तळघरातून वर्ष २०११ मध्ये सोने, चांदी, हिरे, मोती, मौल्यवान रत्ने अशी अमाप संपत्ती प्राप्त झाली. त्या वेळी प्राप्त झालेल्या या संपत्तीची किंमत सुमारे १ लाख १९ सहस्र कोटी एवढी होती. ६ व्या तळघराचा दरवाजा कसा उघडायचा ? हे अजून कुणाला कळलेले नाही. जे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतात, ते आजारी पडतात किंवा त्यांचा मृत्यू होतो, असे लक्षात येते. या दरवाजावर नागांची २ शिल्प त्याचे रक्षण करतात. असे म्हटले जाते की, नागपाश किंवा नागमंत्र यांसारखे मंत्र म्हणून हा दरवाजा बंद केला आहे; खरा विष्णुभक्तच तो उघडू शकतो !


कालगणनेचे निर्माणस्थळ, वेळेचा केंद्रबिंदू आणि सृष्टीतील प्रथम स्थळ उज्जैनचे महाकाल मंदिर !

ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले मध्यप्रदेशमधील उज्जैनचे महाकाल मंदिर. प्राचीन काळी या मंदिराच्या ठिकाणाहून पूर्ण विश्वाचा काळ निर्धारित होत असे. वेळ मोजण्याचा तो विश्वाचा केंद्रबिंदु आहे. म्हणजे या ठिकाणाहून वेळ मोजणे चालू होते. (म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की, अमूक एका देशाची वेळ भारताच्या एवढ्या वेळ मागे किंवा पुढे आहे, तेव्हा कोण कुणाच्या मागे असणार त्याचा आरंभ कुठून करायचा ? यासाठी कुठेतरी ० ही वेळ पकडायला हवी. ती भारतातील मध्यप्रदेशातील उज्जैनमधून पकडावी लागते.) हे अलीकडच्या युगात विज्ञानाने सिद्ध झाले आहे; परंतु प्राचीन काळी आपल्या ऋषिमुनींनी हे आधीच शोधून ठेवले आहे. १ मार्च २०२४ या दिवशी येथे वैदिक घड्याळाची स्थापना करण्यात आली. वैदिक घड्याळाचे पुनर्निमाण येथे मोदी शासनाने केले आहे. सृष्टीचा आरंभ झाल्यावर सर्वप्रथम (उज्जैन) या भूभागाची स्थापना झाली. हे स्थान भूमध्य रेषेवर स्थिर आहे. महाकाल हे केवळ धार्मिक चिन्ह नाही, तर वैज्ञानिक कालगणनेचे महत्त्वाचे केंद्र आहे. महाकाल मंदिराच्या स्थानावरून नवग्रहांची गती, चाल, पृथ्वीवर पडणारा प्रभाव, तसेच त्याविषयीचा अन्य अभ्यास करता येतो. ‘काळा’ला अशाप्रकारे ईश्वरतुल्य भाव प्राप्त झाला आहे, ते स्थान आहे महाकालेश्वर ! या स्थानाला पृथ्वीचे मणिपूरचक्र किंवा नाभी म्हटले जाते. अनेक प्राचीन ऋषी आणि राजे यांनी येथे साधना केली.

येथे वर्ष १७८९ मध्ये तत्कालीन राजाने अशी दुर्बिण बसवली की, तिच्यातून खगोलीय वस्तूस्थितीचे विषुववृत्तावरील कुठल्याही कोनातून माप घेतले जाऊ शकते. येथील वेधशाळेचे संचालक, गणितज्ञ, ज्योतिषतज्ञ, कालगणना विश्वाला समजावून सांगणारे भास्कराचार्य हे होते; ज्यांनी अनेक गणितीय सिद्धांत विश्वाला प्रदान केले ! एक कुंभमेळा या पवित्र नगरीत होतो. महाकाल हे संपूर्ण विश्वाच्या चराचर जग, काळाची दृष्टी, काळाचे महत्त्व, शुभ मुहुर्त, अशुभ चेतावणी आदी देणारे आराध्य दैवत आहे !

एक ‘त्रुटि’ म्हणजे सेकंदाचा ३३ सहस्र ७५० वा भाग इथपासून ते १ दिवसापर्यंतची कालगणना, आठवड्याचे सात वार, युगांपासून ते वेळेचा सर्वांत मोठा भाग, म्हणजे ४३२ कोटी वर्षे म्हणजे एक कल्प इथपर्यंत आदी सार्‍या गोष्टी भास्कराचार्यांनी विश्वाला या स्थानातून प्रदान केल्या !

(संदर्भ – प्रवीण गुगनानी, विश्व संवाद केंद्र, झारखंड, आज तक आणि अन्य संकेतस्थळे)