प्राचीन भारतीय मंदिरे : मानवी जीवनाचा केंद्रबिंदू !
‘देवस्य देवानां वा आलयः ।’ याचा अर्थ देवालय म्हणजे देऊळ अथवा मंदिर हे भगवंताचे निवासस्थान नव्हे, तर त्याचे शरीरच आहे. ‘साक्षात् श्रीहरिचे त्या देवालयात अस्तित्वात आहे’, असे समजले पाहिजे. देवळांची धर्मशास्त्रदृष्ट्या केली गेलेली रचना अभ्यासल्यास तेथील स्पंदनांचा भाविकांवर पुष्कळ परिणाम होत असल्याचे जाणवते. देवाच्या दर्शनासाठी देवळात गेल्यास तेथील चैतन्याचा लाभ घेता येतो. वैदिक मंदिरे आणि त्यात केलेल्या मूर्तीची स्थापना यांतही आध्यात्मिकदृष्ट्या बरेच गूढ दडलेले आहे. देवालयातील सर्वांत महत्त्वाचा भाग असलेल्या गर्भगृहातून भाविकांवर चांगल्या शक्तीचा वर्षाव केला जातो. देवळात दिले जाणारे तीर्थ म्हणजे एकप्रकारे पावित्र्य ग्रहण करण्याची संधीच असते. देवळात जाणे हे मनुष्यासाठी आरोग्यदृष्ट्या, तसेच मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्याही आवश्यक असते.
द्वापरयुगात ज्या वेळी मूर्तीपूजेला आरंभ झाला, त्या वेळी देवालय स्थापनेला आरंभ झाला; परंतु वेदकाळापासूनच वास्तूशास्त्र विकसित झाल्याचा पुरावा म्हणून भारतातील देवालयांकडे पहाता येईल.
या देवालयांचा इतिहास अभ्यासपूर्ण पडताळला, तर असे आढळून येईल की, या देवालयांच्या निर्मितीमध्ये वेदांत, योगशास्त्र यांखेरीज भूगोल, भौतिक, गणित, भूमिती आदी शास्त्रांचा, तसेच गुरुत्वाकर्षणादी नियमांचा वापर केलेला आहे. वैज्ञानिक तत्त्वांचा कलापूर्ण वापर करणारी ही देवालये ब्रह्मज्ञानप्राप्तीसह समाजधारणाही करत होती; किंबहुना ‘देवालये’ ही त्या काळी समाजजीवनाच्या केंद्रस्थानी होती !
अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय साधणार्या या देवालयांनी वेदकाळापासूनच मानवाला ब्रह्मज्ञान प्राप्त करून देण्यासमवेतच सामाजिक बांधिलकीही जोपासली.
दासबोधातील भक्तीच्या दशकात समर्थ रामदासस्वामींनी देवालयांना कोणकोणती दाने द्यावीत, हे स्पष्ट केले आहे. त्यावरून देवालयात तो तो विभाग असायला हवा, हे उघड आहे. श्रवण-भक्तीचे विवेचन करतांना इतिहास, भूगोल, रसायन, वनस्पतीशास्त्र, संगीत, ताल-ज्ञान अशा अनेक विषयांचा समावेश त्यांनी भक्तीत केला आहे. देवालयांना गायी, हरणे, वानर, हत्ती असे पशूदान करावे. मोर, चक्रवाक, पोपट, हंस इत्यादी पक्षी दान करावेत. भूमीदान करावे. याचाच अर्थ देवालयांत पशू-पक्षी यांची संग्रहालये असायला हवीत. फुलझाडे, फळझाडे आणि औषधी वनस्पती असाव्यात. यावरून असे लक्षात येते की, देवालयांमध्ये स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, धर्म, विवेचन (कीर्तनकला, प्रवचन), धर्म-सभा (न्याय), औषधी वनस्पती, गोशाळा, पशू-पक्षी संग्रह, धर्मकार्ये (मंगलकार्ये, यज्ञ, उत्सव इत्यादी), ग्रंथालय, पाठशाला (गुरुकुल), ध्यानमंदिर, अतिथीगृह, अनाथ बालसंगोपन, युद्धकला प्रशिक्षण, पाकशाळा असे विविध प्रकारचे विभाग कार्य करीत असत. काही देवालयात मौल्यवान खजिना असे, काहींमध्ये गुप्त मार्ग असत.
संत तुलसीदासांना बालपणीच मारुतीच्या पायावर वाहिले होते, संत जनाबाईंना देवाच्या पायरीवर आणून ठेवले होते; कारण देवालये बालसंगोपन करीत असत. आजारी मुलांना देवाच्या पायी आणीत; कारण देवालये औषधोपचार करीत असत. भारतात कुठेही कुणीही गेला, तरी त्याच्या निवास आणि भोजन यांची व्यवस्था देवालये करीत असत. यामुळे भारतीय एकात्मतेचा अनुभव सहजच येई. ब्राह्मणांच्या पाठशाळा देवालयांच्या आश्रयानेच चालत. आजही तिरुपतीचे देवालय अनेक विद्यालये, महाविद्यालये चालवत आहे.
कित्येक सहस्र वर्षे हिंदु संस्कृतीचे जतन करण्यात मोलाचा वाटा उचलणार्या, तसेच विज्ञान, अध्यात्म आणि सामाजिक स्वास्थ्य जोपासणार्या देवालयांच्या वास्तूशास्त्राचा सूक्ष्म अभ्यास करून त्याचे सामाजिक जीवनात अवतरण करणे, हेच आजच्या युगातील शास्त्रज्ञांना आव्हान आहे !
– श्री. संजय मुळ्ये, रत्नागिरी
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी…!
परिपूर्ण परिष्कृत मंदिर म्हटले की, मला खजुराहोची मंदिरे आठवतात. या मंदिरांचा ओटा २० ते २६ फूट उंचीचा असतो. त्याला जगती म्हणतात. त्यावर संसारातील सर्व गोष्टी कोरलेल्या असतात. लक्ष्मण मंदिरात स्वयंपाक करत असलेल्या स्त्रिया, नृत्य शिकवत असलेल्या नर्तकी आणि मजुरांनी वाहून आणलेले दगड घडवत बसलेला शिल्पी, इथपासून ते मानवाच्या रात्रीच्या अंधारात घडणार्या सर्व क्रियांपर्यंत. कामशिल्पे आहेत, शिक्षण देणार्या सुरसुंदरी आहेत आणि हे सर्व जग पायर्यांवर सोडून तुम्ही देवाच्या समीप जाता. ज्ञानेश्वरांचा हरिपाठ आहे, ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या.’ मग या चार मुक्ती कोणत्या ? सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्य. तुम्ही अर्धमंडपात आलात की, तुम्हाला गणपति, कार्तिकेय, गंधर्व अशा अनेक उपदेवता दिसतात. तुम्ही संसार सोडून वेगळ्या लोकात आलात. सलोकता. आणखी पुढे गेलात, मध्यात देव दिसतो. ही समीपता. आता पुढे गाभार्याच्या प्रवेशद्वारात तुम्ही उभे आहात, तुम्ही अचंबित होता ! माझेच हे रूप, हात, पाय, कान, डोळे ही आता सरूपता साध्य झाली. इथे जाणवते, ‘सोहं ! सः अहं.’ ‘मीच ते आहे.’ ते म्हणजे काय ? ‘तत्वमसि.’ म्हणजे काय, तर ब्रह्म. म्हणूनच ‘अहं ब्रह्मास्मि.’ हे ज्ञान मला झाले. पुढे मी गाभार्यात प्रवेश करतो. ‘जीवो ब्रह्मएव नापरा…’ म्हणजे ‘जीव ब्रह्मच आहे’, दुसरे तिसरे काहीही नाही. ही भावना म्हणजे सायुज्जता. आता सर्वच देवळे अशी असत नाहीत, लहान असतात, केवळ श्रद्धेने कशीही बांधलेली असतात. पण ‘अहं ब्रह्मस्मि ।’ ही संकल्पना एकदा तुमच्या मनात जन्माला आली की, आपण सर्वच मंदिरे या पद्धतीने पाहू शकतो. तेच बिम्बब्रह्म. अशा मंदिरांना मी ‘वास्तूब्रह्म’ म्हणतो बरं का !
– डॉ. गो.बं. देगलूरकर, पुरातत्त्वशास्त्र आणि मूर्तीशास्त्र अभ्यासक
पूर्वीच्या राजांनी एवढी मोठी देवळे बांधण्याचे कारण !
प्राचीन देवळांना त्याच्या चारही दिशांच्या प्रवेशद्वारांना जोडणार्या तटबंदीसारख्या दगडाच्या मोठमोठ्या भिंती बांधलेल्या आहेत. त्या वेळच्या चोल आणि पंड्या या राजघराण्यांनी ही भव्य देवळे बांधली आहेत. काही देवळांचा परिसर १० ते २० एकर, तर काही देवळांचा परिसर १०० एकर एवढा मोठाही आहे. देवळांमध्ये रहाण्याच्या, पाण्याच्या सर्व सोयी आहेत. देवळांना तटबंदी असण्याचे कारण म्हणजे ‘समजा एखाद्या शत्रूचे आक्रमण झाले, तर गावातील लोकांना देवळाच्या आत बोलावून त्यांचे रक्षण करता येईल’, असा विचार त्या वेळच्या राजांचा असायचा. त्या वेळच्या राजांना आपल्या प्रजेची केवढी काळजी असायची !’ – सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१२.२०२१)
प्राचीन देवालये ईश्वरेच्छेने बांधली गेली !
१. पूर्वीच्या काळी देवालये ही सर्वस्वी ईश्वरेच्छेनेच बांधली जाणे : ‘पूर्वी देवालय बांधणीत देवता साक्षात्कार रूपात भक्तांना दर्शन देऊन मग देवालय कसे बांधायचे ? याचेही मार्गदर्शन करत आणि देवतेचे आसनपीठ कुठे असणार ?, त्याविषयीही माहिती देत. त्यामुळे देवालये ही सर्वस्वी ईश्वरेच्छेनेच बांधली जात.
२. देवालयाच्या जडणघडणीचे वैशिष्ट्य : ईश्वरेच्छेने देवालये बांधली गेल्याने या देवालयांची जडणघडण स्थळदर्शक भानातून सर्वस्वी काळचक्राला योग्य प्रमाणात आवश्यकतेप्रमाणे कार्याच्या अनुषंगाने जोडलेली असे.
३. श्री महालक्ष्मी देवालय हे सृष्टीतील प्रत्येक कार्यकारी कालचक्रवाचक घडामोडींचे साक्षीदार असणे : कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी देवालय हेही असेच काळचक्राला अनुसरून योग्य स्थळदर्शक आकृतीबंधातून साकार झालेले असल्याने ते सृष्टीतील प्रत्येक कार्यकारी कालचक्रवाचक घडामोडींचे साक्षीदार बनलेले आहे.
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
देवळे आणि पंचमहाभूते
‘७ व्या ते ११ व्या शतकांपर्यंत भारतात मंदिरे बांधली जात असतांना पंचमहाभूतांचा विचार व्हायचा. तमिळनाडूतील काही मंदिरांमध्ये विशिष्ट महाभूत न्यून झाल्यावर होणार्या व्याधींवर उपचार म्हणून विशिष्ट मंदिरातील तीर्थ वापरण्याची पद्धत आजही प्रचलित आहे.’
– एक धर्माभिमानी (२२.६.२०१४)
गावाचे केंद्रस्थान – मंदिर !
मंदिर हे गावाचे केंद्रस्थान असायचे. मंदिराला मी एक सामाजिक संस्था म्हणतो. काही मंदिरात एक गोल दगड असतो. त्याचे नाव रंगशीला. तिथे तुम्ही देवाला नर्तन, कीर्तन, भजन अर्पण करता. नृत्य शिकून झाल्यावर ‘अरंगेत्रम्’ (सर्वांसमोर सादरीकरण) केले जाते, ते दक्षिणेत मंदिरात करण्याची पद्धत आहे. हे कुठून येते ? अजूनही काही मंदिरात जाऊन मुले नृत्य शिकतात. मंदिराभोवती बाजार भरत असे. आजूबाजूच्या खेड्यातील लोक यायचे. तिथे वास्तुविनिमयासमवेत विचारविनिमय होत असे. मंदिराला पाथरवट लागतो, गवळी लागतो, देवाचे कपडे शिवायला शिंपी लागतो, फुले-माळा आणायला माळी लागतो. मंदिराच्या वाटणीत शेती आलेली असे. ती सांभाळायला शेतकरी लावून दिलेला असे. सर्व प्रकारचे समाजघटक मंदिराच्या व्यवस्थापनात उपयोगी पडतात. त्यातून त्यांना चरितार्थाचे साधन मिळायचे. ‘मी खरे सांगतो’, अशी शपथ घ्यायला लोक मंदिरात येत. त्या काळी शहरातल्या, खेड्यातल्या माणसांचे सगळे आयुष्यच मंदिरांभोवती गुरफटलेले असे. एवढे त्या मंदिरांचे महत्त्व होते.
– डॉ. गो.बं. देगलूरकर, पुरातत्त्वशास्त्र आणि मूर्तीशास्त्र अभ्यासक
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)