‘मशिदीच्या’ चाव्या सरकारकडेच रहाणार ! – सर्वोच्च न्यायालय

जळगाव येथील पांडववाड्याचे प्रकरण

जळगाव, २० एप्रिल (वार्ता.) – सर्वोच्च न्यायालयाने १९ एप्रिल या दिवशी जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील ‘मशिदी’च्या चाव्या नगरपरिषदेकडेच रहातील, असा निकाल दिला आहे. वास्तविक ही कथित मशीद म्हणजे हिंदूंचा पांडववाडा आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देतांना ‘स्थानिक नगरपरिषद सकाळचा नमाज चालू होण्याच्या काही वेळ आधी प्रवेशद्वार उघडण्यासाठी एका अधिकार्‍याची नियुक्ती करील. हा अधिकारी नमाज अदा होईपर्यंत ते उघडे ठेवेल. यासमवेतच मंदिरे किंवा स्मारक येथून प्रवेश किंवा बाहेर पडण्यासाठी कोणतेही निर्बंध नसतील आणि सर्व धर्मांच्या लोकांना कोणत्याही त्रासाविना भेट देण्याची अनुमती असेल’, असे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि के.व्ही. विश्‍वनाथन् यांनी म्हटले आहे. ‘मशिदीच्या जागेच्या संदर्भात यथास्थिती कायम राहील आणि पुढील आदेश येईपर्यंत ती वक्फ बोर्ड किंवा याचिकाकर्ता सोसायटीच्या नियंत्रणाखाली राहील’, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या वेळी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि के.व्ही. विश्‍वनाथन् यांच्या खंडपिठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जुम्मा मशीद ट्रस्ट समितीने प्रविष्ट केलेली याचिका फेटाळून लावली आहे.

पांडववाड्याचे प्रकरण काय आहे ?

१. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल परिसरात असलेल्या पांडववाड्याविषयी असे सांगितले जाते की, पांडवांनी वनवासाची काही वर्षे एरंडोल परिसरात घालवली होती. येथे बांधलेल्या हिंदु आणि जैन मंदिरांसारख्या वास्तू ८०० ते १ सहस्र वर्षे जुन्या आहेत.

२. हिंदूंच्या गंभीर उदासीनतेमुळे १२५ वर्षांपूर्वी मुसलमानांनी हळूहळू येथे अतिक्रमण करण्यास प्रारंभ केला आणि ती ‘वक्फ’ मालमत्ता म्हणून घोषित करून तेथे मशीद बांधली.

३. हिंदु जनजागृती समिती आणि पांडववाडा संघर्ष समिती यांसारखे हिंदु गट ‘वक्फ मंडळा’च्या घुसखोरीतून पांडववाड्याला मुक्त करण्यासाठी धडपडत होते.

४. वादग्रस्त मशिदीच्या अस्तित्वाच्या नोंदी किमान १०० वर्षांपूर्वीच्या आहेत. हिंदूंचे मंदिर पाडून मशीद बांधण्यात आल्याचे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे म्हणणे आहे. हिंदु धर्मग्रंथातही या मंदिराचा उल्लेख आहे.

५. स्थानिक लोककथा आणि ग्रंथ यांमध्ये वर्णन केल्यानुसार वक्फ समिती ही पांडववाड्याची हिंदु संस्कृती नष्ट करण्यासाठी विवादित मशीद बांधण्याचे काम करत होती.

जिल्हाधिकार्‍यांकडून ११ जुलै २०२३ या दिवशी नमाज अदा करण्यास बंदी !

१. १६ जुलै २०२३ या दिवशी वादग्रस्त मशिदीला प्रशासनाने तात्पुरती टाळे ठोकले होते.

२. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ अन्वये आदेश लागू करून राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित जागेत नमाजपठण करण्यास तात्काळ बंदी घातली आहे.

३. जिल्हाधिकार्‍यांनी या भागात पोलीस तैनात करण्याचे निर्देश दिले होते आणि स्थानिक प्रशासनाला ‘वादग्रस्त मशिदी’चा ताबा घेण्यास सांगितले होते. यानंतर वादग्रस्त मशिदीची रचना पहाणार्‍या जुम्मा मशीद ट्रस्ट समितीने नमाज अदा करण्यासाठी आवारात प्रवेश करण्यास बंदी घालण्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती.

४. ‘जुम्मा मस्जिद ट्रस्ट कमिटी’चे अध्यक्ष अल्ताफ खान यांनी याचिकेत दावा केला होता की, जिल्हाधिकार्‍यांनी ११ जुलै २०२३ या दिवशी मनमानी आणि बेकायदेशीर आदेश पारित केला आणि ट्रस्टला वादग्रस्त ‘मशिदीच्या’ चाव्या एरंडोल येथील मुख्य अधिकार्‍याकडे सोपवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या सूचनेवर उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिला होता.

पांडववाडा येथील भूमी प्रशासनाने कह्यात घ्यावी ! – प्रसाद दंडवते, तक्रारदार

‘पांडववाडा संघर्ष समिती’चे तक्रारदार श्री. प्रसाद मधुसूदन दंडवते यांनी ‘ऑप इंडिया’ला याविषयी माहिती दिली होती. दंडवते म्हणाले, ‘‘तिथे प्रतिदिन अनुमाने ४-५ मुसलमान नमाज अदा करतात. आता त्यांना अनुमती देण्यात आली आहे; परंतु हिंदु समुदायाचे सदस्य पांडववाड्याच्या जागेलाही भेट देऊ शकतात, ज्याला मशीद ट्रस्टने अनधिकृतपणे कह्यात घेतले आहे.’’ यापूर्वी ‘एरंडोल भागातील पांडववाड्याचे मशिदीत रूपांतर कसे झाले’, याविषयीचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर दंडवते यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली की, हिंदु धर्मस्थळावर अनधिकृतपणे मशीद बांधली गेली असून ती अधिकार्‍यांनी कह्यात घ्यावी.

मशीद ट्रस्टने पांडववाडा जागेवर अनधिकृत बांधकाम केले !

‘पांडववाडा संघर्ष समिती’च्या तक्रारीनुसार….

१. मशीद ट्रस्टने या जागेचा अनधिकृतपणे ताबा घेऊन ८०० ते १ सहस्र वर्षे जुन्या पांडववाड्यात अनेक पालट केले होते, जो आज राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित आहे.

२. ट्रस्टने पांडववाड्यात वीज, पंखे, सिमेंटचे दरवाजे आणि पाण्याची जोडणी लावली. मुसलमानांना नमाजपठण करण्यापूर्वी हात धुण्यासाठी वजुखाना अनधिकृतपणे बांधला आहे. त्यांना ही अनुमती कुणी दिली ?

३. जुम्मा मशीद ट्रस्टने पांडववाड्याच्या आजूबाजूची हिंदूंची चिन्हे आणि वास्तू नष्ट केल्या आहेत. या ट्रस्टने येथे अनधिकृतपणे अतिक्रमण करून येथे मशीद बांधली आहे.

४. या बांधकामाविरोधात संघर्ष समितीने जिल्हा प्रशासन आणि न्यायालय यांच्याकडे तक्रार करून पांडववाड्यातील सर्व अनधिकृत बांधकामे अन् अतिरिक्त बांधकामे हटवण्याची मागणी केली होती.

५. समितीने मालमत्ता प्राधिकरणाकडून कह्यात घेण्याची आणि तिचे वय निश्‍चित करण्यासाठी वैज्ञानिक मूल्यांकनाची मागणी केली आहे.

जेथे नमाजाची ठिकाणे पाडली गेली, तेथे तेथे हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती सापडल्या ! – राजूमामा भोळे, आमदार, भाजप

मुंबई येथील विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीत १९ जुलै २०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपचे आमदार श्री. राजूमामा भोळे पांडववाड्याच्या मुक्तीसंदर्भात म्हणाले होते की, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील ऐतिहासिक पांडववाड्यातील अनधिकृत मदरसा आणि तेथील नमाजपठणावर बंदी घातल्याचा अंतरिम आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिला आहे. मागच्या ५ सहस्र वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला, तर जेथे जेथे नमाजाची ठिकाणे पाडली गेली, तेथे तेथे हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत. ‘पांडववाडा’ या नावावरूनच आपल्याला हा हिंदूंचा प्राचीन ऐतिहासिक वारसा आहे, हे लक्षात येते. जो जुना इतिहास आहे, तो कुणालाही पुसता येणार नाही. म्हणूनच पांडववाड्यातील अनधिकृत मदरसा आणि तेथील नमाजपठण यांवर बंदी घातल्याचा अंतरिम आदेश योग्यच आहे.