गोवा : बांधकामाचे ठिकाण रहाण्यास अयोग्य असल्यावरून गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून कारवाई
वास्को येथे ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे प्रकरण
वास्को, १९ एप्रिल (वार्ता.) : न्यू वाडे वास्को येथे एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी एका ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणानंतर यावर उपाययोजना करण्याविषयी गोवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने पावले उचलली आहेत. या प्रकरणानंतर या बांधकामाच्या ठिकाणी गोवा राज्य बाल हक्क आयोगाने पहाणी केल्यानंतर संबंधित जागा बांधकाम करणारे कामगार आणि त्यांची मुले रहाण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी मुख्य कामगार आयुक्त आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकाचा व्यवस्थापकीय संचालक यांना २ मे २०२४ या दिवशी सुनावणीस उपस्थित रहाण्याविषयी समन्स पाठवले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याविषयी आणि या संदर्भात सर्वसमावेशक उपाययोजना त्वरित लागू करावी, या विषयीची जाणीव करून देण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.
या बांधकामाच्या पहाणीच्या वेळी आढळून आलेल्या त्रुटींविषयी गोवा राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष पीटर बोर्जीस यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
आयोगाने बांधकामाची पहाणी केल्यानंतर नियमभंगाविषयी पुढील सूत्रे सांगितली –
१. बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी रहाणारी मुले आणि त्यांचे कुटुंबीय यांना मूलभूत सुविधा नाहीत, तसेच त्यांच्या आजूबाजूला अपायकारक वस्तू आहेत.
२. बांधकाम करणार्या कामगारांच्या मुलांसाठी तिथे सार्वजनिक संगोपन केंद्र नाही.
३. या बांधकामाच्या ठिकाणी कुणी घायाळ झाल्यास एकंदर सुरक्षिततेच्या दृष्टीने तडजोड करण्यात आली आहे.
गोवा बाल हक्क आयोगासमोर होणार्या सुनावणीमध्ये या प्रश्नांवर चर्चा होईल. या वाईट परिस्थितीला कारणीभूत असणार्या उत्तरदायी लोकांना परिस्थिती कशी सुधारता येईल ? याविषयीचा अहवाल सादर करावा लागेल. असे न झाल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी आयोगाने दिली आहे.
मेरशी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार : महंमद सुहेल याला अटक
पणजी : मेरशी येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पर्वरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी महंमद सुहेल या व्यक्तीला अटक केली आहे. महंमद सुहेल हा मूळ उत्तरप्रदेश येथील रहिवासी असून सध्या मेरशी येथे रहात होता.
संपादकीय भूमिका
|