समीर वानखेडे प्रकरणी चौकशीतून काय निष्पन्न झाले ? – मुंबई उच्च न्यायालयाची एन्.सी.बी.ला विचारणा

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – समीर वानखेडे यांनी अमली पदार्थांविषयी अन्वेषण केलेल्या २ प्रकरणांत कथित अनियमितता होत्या, या आरोपांखाली त्यांच्याविरोधात चालू केलेल्या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले ?, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने १८ एप्रिल या दिवशी अमली पदार्थविरोधी यंत्रणेला (‘एन्.सी.बी.’ला) केली. तसेच याचा तपशील २३ एप्रिलच्या पुढील सुनावणीत देण्याचे निर्देश दिले.

एन्.सी.बी.ने पाठवलेल्या नोटिसांना वानखेडे यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. याचिका प्रलंबित असल्याने कठोर कारवाई करणार नसल्याची एन्.सी.बी.ची हमी यापुढेही कायम रहाणार आहे.

‘अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यनला क्रूझवरील अमली पदार्थ प्रकरणात अटक केल्यानंतर माझ्याविरोधात अनेक प्रकरणे प्रविष्ट झाली. माजी मंत्री नवाब मलिक यांचाही माझ्यावर राग होता. कारण मी त्यांचा जावई समीर खानला एका अमली पदार्थ प्रकरणात अटक केली होती’, असा दावा वानखेडेंनी एन्.सी.बी.च्या उत्तरात केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला.

वानखेडेंनी त्यांच्यावरील नोटिसांविरोधात केंद्रीय प्रशासकीय लवादासमोरही (कॅट) अर्ज केला असल्याचे सरकारी अधिवक्त्यांनी लक्षात आणून दिले आणि एकाच विषयावर वेगवेगळ्या मंचांसमोर दाद मागता येणार नसल्याचे नमूद केले. त्यावर न्यायालयाने सर्व प्रकरणांचा तपशील देण्याचे निर्देश वानखेडे यांना दिले.