इस्रायलवर आक्रमण करणारे ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ म्हणजे इस्लामचे सैनिक !
इराणने इस्रायलवर केलेल्या आक्रमणामुळे जग नव्या युद्धात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. मध्य पूर्वेतील देश पुन्हा एकदा अशांततेत आहेत. इस्रायलसारख्या शक्तीशाली देशावर इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (आय.आर्.जी.सी.) नावाच्या एका विशेष दलाने आक्रमण केले. युरोपियन युनियन, अमेरिका आणि कॅनडा यांनी ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ला ‘आतंकवादी’ म्हणून घोषित केले आहे. आतंकवादी संघटना असलेली इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स नेमकी आहे काय ?
१. इस्लामला असलेला विरोध संपवण्यासाठीच ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ची स्थापना
‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ची स्थापना इस्लामिक क्रांतीनंतर लगेचच झाली होती. त्या वेळी त्याचे नाव ‘सिपाह-ए-पासदरन’ असे होते. त्यानंतर ते एक सैन्य होते. या सैन्यात ज्यांना देशात इस्लामी क्रांती आणायची होती, त्यांचा समावेश करण्यात आला आहे. इराण हा पूर्वी पुढारलेला देश होता. त्यामुळे इराणमध्ये इस्लामी कायद्यांना पुष्कळ विरोध झाला. ‘इस्लामला असलेला विरोध संपवणे’, हा ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’चा उद्देश होता. या गटाला नंतर इराणी कायद्यानुसार वैध म्हणून मान्यता देण्यात आली. राजकीय आणि आर्थिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचे पुरेसे अधिकारही त्यांना देण्यात आले होते.
२. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या दृष्टीने विशेष सैन्य दल म्हणजे ‘इस्लामचे सैनिक’ !
‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ हे दल देशाच्या पारंपरिक सैन्यासारखे नसून ‘स्पेशल अल्टरनेटिव्ह फोर्सेस’सारखे (विशेष पर्यायी दलासारखे) आहे. लष्करप्रमुखांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे १ लाख ९० सहस्र सक्रीय सैनिक आहेत की, जे भूमी, समुद्र आणि हवाई या तिन्ही आघाड्यांवर काम करतात. ते थेट इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंतर्गत येतात. खामेनी त्यांना ‘इस्लामचे सैनिक’ म्हणतात. ते इराणचे आंतरखंडिय (बॅलिस्टिक) क्षेपणास्त्र आणि आण्विक कार्यक्रमही चालवतात. यावरूनच या दलाच्या सामर्थ्याचे अनुमान लावता येते.
‘इस्लामिक गार्ड्स कॉर्प्स’च्या झेंड्याखाली अनेक लहान लष्करी गटही कार्यरत आहेत. यातील ‘बसजी’ या गटाचे नाव अनेकदा समोर आले. हे एक निमलष्करी दल आहे. त्याचे काम देशातील सर्वोच्च नेत्याविरुद्धचे कोणतेही आंदोलन चिरडणे, हे त्यांचे ध्येय आहे.
३. पाकिस्तानच्या सैन्याइतके अधिकार असलेले ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ !
परदेशात स्वतःची शक्ती वाढवण्यासाठी ‘आय.आर्.जी.सी.’ने ‘क्वड्स फोर्स’ नावाचे एक वेगळे दल सिद्ध केले आहे. त्याचे काम लॅबेनॉनपासून इराक आणि सीरिया इथपर्यंत पसरलेले आहे. एका छोट्या लष्करी गटापासून प्रारंभ करून ही संस्था आता देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा हस्तक्षेप करत आहे. ‘क्वड्स फोर्स’ हे एका व्यावसायिक (कॉर्पोरेट) लष्कराप्रमाणे काम करते. त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये पैसे गुंतवले आहेत. यामध्ये संरक्षण आणि बांधकाम क्षेत्र यांचा समावेश आहे. ‘बीबीसी’ वृत्तवाहिनीच्या अहवालानुसार इराणच्या अर्थव्यवस्थेत ‘क्वड्स फोर्स’चा वाटा एक तृतीयांश आहे. एकंदरित असे गृहित धरले जाऊ शकते की, इराणमधील ‘आय.आर्.जी.सी.’कडे पाकिस्तानच्या सैन्याला त्यांच्या देशात जितके अधिकार आहेत, तितकेच किंवा त्याहून अधिक अधिकार आहेत.
४. अनेक देशांतील जिहादी कारवायांत ‘आय.आर्.जी.सी.’ सामील
अमेरिकेने इराणच्या विशेष दलांना वर्ष २०१९ मध्ये ‘आतंकवादी गट’ म्हणून घोषित केले होते; कारण ते हिजबुल्लासह मध्यपूर्वेत अनेक जिहादी संघटना निर्माण करण्यास उत्तरदायी होते. इराणसह युरोपियन युनियनने ‘आय.आर्.जी.सी.’वर सौदी अरेबियात ड्रोनद्वारे आक्रमण केल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे तेल साठ्यांची लक्षणीय हानी झाली आहे. इराकमध्ये ६ हून अधिक अमेरिकन सैनिकांच्या हत्येसाठी उत्तरदायी ठरवत वर्ष २०१९ मध्ये या गटाला ‘आतंकवादी संघटना’ म्हणून घोषित करण्यात आले. कॅनडामध्ये या गटाला ‘आतंकवादी’ मानून त्यांच्या झेंड्याखाली काम करणार्या लहान गटांवरही बंदी घालण्यात आली आहे.
एखादा देश एखाद्या विदेशातील एखाद्या गटाला परदेशी ‘आतंकवादी संघटना’ तेव्हाच मानतो, जेव्हा तो सतत आतंकवाद निर्माण करत असतो. अशा संघटनांच्या कारवायांमुळे संबंधित देशाचे किंवा तेथील नागरिकांचे अथवा अन्य देशाच्या सीमेची हानी झाली असेल, तरच इतर देशांतील संघटनेला ‘आतंकवादी संघटना’, असे म्हटले जाते.
(साभार : विविध संकेतस्थळे)