पुणे येथे होर्डिंग कोसळल्याच्या प्रकरणी होर्डिंग मालकाला नोटीस !
हानी झालेल्या कार मालकाची पोलिसांत तक्रार !
पुणे – वाघोलीतील साई सत्यम पार्क परिसरात १७ एप्रिलला सायंकाळी झालेल्या पाऊस आणि वादळी वारा यांमुळे पुणे-नगर महामार्गावर होर्डिंग कोसळून ३ ते ४ चारचाकींची हानी झाली. यामुळे काही घंटे महामार्गावर चक्का जाम झाला होता. या प्रकरणी नगररोड क्षेत्रीय कार्यालयाने होर्डिंग मालकाकडून नोटीसीद्वारे केवळ खुलासा मागवला आहे, तर हानी झालेल्या चारचाकीच्या मालकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी प्रशासनाला मात्र गांभीर्य नाही. यापूर्वीही शहरात अशा प्रकारच्या २ दुर्घटना घडून बळी गेले आहेत. (प्रशासन याविषयी काय उपाययोजना करणार आहे ? – संपादक)
होर्डिंग कोसळल्याचा प्रकार गंभीर आहे. वाघोलीत अनेक होर्डिंग आहेत. त्यांचे त्वरित ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. अन्यथा अशा दुर्घटना पुन्हा घडू शकतात. सध्या जो पाऊस पडतो आहे, तो अवेळी आहे. त्यातच अशा घटना घडत आहेत, तर पावसाळ्यात काय स्थिती निर्माण होईल ? असा प्रश्न नागरिक करत आहेत. होर्डिंग मालकाला नोटीस बजावून खुलासा मागवला आहे. त्यांचा खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे नगररोड क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ बनकर यांनी सांगितले. ‘कार चालकांची तक्रार आली आहे. त्यानुसार चौकशी करून पुढील कारवाई होईल’, असे लोणीकंदचे उपनिरीक्षक राहुल कोळपे यांनी सांगितले.