नाशिक येथील श्री. अनिल पाटील यांना चित्तशुद्धीच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे !
‘२.१.२०२४ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पू. अनंत आठवले यांनी लिहिलेला ‘ब्रह्मातील आनंदाचे स्वरूप’, या विषयावर लेख छापून आला होता. यामध्ये पू. अनंत आठवले यांना भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशावरून ‘कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नसलेले स्थायी समाधान ब्रह्माच्या आनंदाचे स्वरूप असल्यामुळे चित्तशुद्धीला अनन्यसाधारण महत्त्व आहे’, हे आकलन झाल्याचे म्हटले आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनातील ‘देह प्रारब्धावर सोडा, चित्त चैतन्याशी जोडा’, या उक्तीनुसार चित्तशुद्धी होण्यासाठी माझ्या लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.
१. प.पू. पांडे महाराजांनी सांगितलेली चित्तशुद्धीची पद्धत
१ अ. चित्तशुद्धीसाठी चित्तामध्ये विवेकयुक्त विचार असण्याचे महत्त्व ! : मन ‘संकल्प आणि विकल्प’ असे दोन्ही प्रकारचे विचार करते आणि निर्णय घेण्यासाठी ते बुद्धीकडे पाठवते. बुद्धीमध्ये विवेक नसेल, तर अयोग्य विचार चित्तात जातात आणि त्यामुळे चित्त अशुद्ध होते. चित्तामध्ये जेव्हा विवेकयुक्त विचार जातात, तेव्हा चित्त हळूहळू शुद्ध होते.
२. दम आणि शम यांवर नियंत्रण ठेवल्याने त्या त्या इंद्रियांच्या देवतांचा आदर करता येऊन चित्तशुद्धी होणे
पू. अनंत आठवले यांनी लेखात सांगितल्यानुसार ‘पंचतन्मात्रा व्यक्त होणार्या इंद्रियांतील चैतन्याच्या अंशालासुद्धा ‘देवता’ म्हणून संबोधतात.’ त्यामुळे दम (इंद्रिय निग्रह) आणि शम (मनोनिग्रह) या दोहोंवर नियंत्रण ठेवले, तर त्या त्या इंद्रियांच्या देवतांचा आदर करता येईल. त्यामुळे दम आणि शम दोन्ही साध्य करता आल्याने तो सहजस्वभाव बनेल. या विचारप्रक्रियेनेसुद्धा चित्तशुद्धी करता येऊ शकते.
३. सोऽहम् साधना (भावयुक्त नाम श्वासाला जोडण्याची प्रक्रिया) आणि चित्तशुद्धी !
३ अ. साधना भावात्मक स्तरावर आल्यावरच चित्तशुद्धीची प्रक्रिया चालू होणे : साधनेत ‘वृत्ती सत्त्वगुणी होणे’ महत्त्वाचे असते. वृत्ती मूलतः वायुरूप असते आणि भावही वायुरूप आहे. दोन्हीही श्वासांतर्गत प्राणवायूतूनच उत्सर्जित होतात. साधकाने ‘सोऽहम्’ असा भावयुक्त श्वास घेताच साधकाच्या स्फुरणालाच ईश्वराची दिव्य झळाळी प्राप्त होते. साधना अधिक प्रवाही करण्याकरता वृत्तीतच जिरावी लागते आणि त्यासाठी ती भावात्मक श्वासाच्या स्तरावर यावी लागते. त्या वेळीच खर्या अर्थाने चित्तशुद्धीची प्रक्रिया चालू होते.
३ आ. चित्त शुद्ध झाल्यावर ‘स्थायी समाधान’ प्राप्त होऊन ब्रह्माच्या आनंदाचे स्वरूप लक्षात येणे : कुलदेवतेच्या नामजपामुळे चित्तशुद्धीची प्रक्रिया साधली जाते. कुलदेवतेच्या नामजपातील ब्रह्मा, विष्णु आणि महेश या तीन तत्त्वांनी ‘दत्ततत्त्व’ मिळते. त्याचप्रमाणे प्रजापती (उच्च वैश्विक चैतन्य लहरी) आणि मीनाक्षी (पृथ्वी देवतेच्या प्राकृतिक चैतन्य लहरी) या लहरी एकमेकांना जिथे मिळतात, तो ‘हिरण्यगर्भ’ (टीप) असतो. ते सर्वमती प्रकाशू, म्हणजे सर्वांच्या मन आणि बुद्धी यांवर प्रकाश टाकणार्या श्री गणेशाचे स्थान आहे. आपले चित्त आत्मा आणि मन-बुद्धी यांच्या मध्ये आहे. आत्मा स्वयंप्रकाशी आहे आणि श्री गणेश मतीवर प्रकाश टाकतो. त्यामुळे चित्तावर दोन्हींकडून प्रकाश टाकला जातो आणि चित्त शुद्ध होते. अशा प्रकारे चित्त शुद्ध झाल्यावर ‘स्थायी समाधान’ (शाश्वत समाधान) प्राप्त होऊन ब्रह्माच्या आनंदाचे स्वरूप लक्षात येते.
टीप : सर्वाेच्च प्रकाश, सोनेरी प्रकाशगर्भ, अत्यंत प्रकाशमय
गुरुमाऊलींनी वरील सूत्रे सुचवली आणि लिहून घेतली, त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’
श्री. अनिल विष्णु पाटील (वय ७७ वर्षे) (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), नाशिक (१५.१.२०२४)