न्यायाधीश हा उच्च सचोटी, प्रामाणिकपणा आणि नैतिक सामर्थ्य असलेला असावा !
‘पतंजलि’ प्रकरण आणि न्यायमूर्ती अमानुल्ला यांच्या शब्दाची पातळी…
‘अती झाले अन् हसू आले’, ही म्हण सर्वोच्च न्यायालयाच्या ‘पतंजलि’ प्रकरणाला चपखल बसते. खरे तर न्यायालयाच्या आणि त्यातही सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या संबंधी काही व्यक्त होतांना न्यायालयाचा अवमान तर होणार नाही ना, याची काळजी सर्वच स्तरातून घेतली जाते. कधी कधी न्यायालये हास्यास्पद वागली, तरी सामान्य माणूस तसे म्हणणे टाळतो. पतंजलि प्रकरणातही असेच झाले. न्यायमूर्ती अहसाउद्दीन अमानुल्ला यांचे बोलणे, खडसावणे याच्या बातम्या पुढे आल्या, तेव्हा शंकेची पाल चुकचुकलीच. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आणि काही न्यायमूर्ती यांनी त्यांना ‘त्यांचे स्थान काय ? आणि ते बोलतात काय ?’, यावर आरसा दाखवला, हे बरे झाले.
पूर्वग्रह बाळगून न्यायदान करता येत नाही; परंतु पतंजलि प्रकारणातील न्यायमूर्ती अमानुल्ला आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांची भूमिका खटकणारी आहे. या पदावरील व्यक्तींनी पदाची प्रतिष्ठा न्यून करणारे वर्तन केले; म्हणून माजी सरन्यायाधिशांना पुढे यावे लागले. आताचे सरन्यायाधीश यावर कडक भूमिका घेतील आणि सर्वोच्च न्यायालयाचे नैतिक सामर्थ्य समाजात टिकून राहील, अशी आशा करण्याचा एक नागरिक म्हणून आपल्याला अधिकार आहेच. ‘तुम्हाला फाडून टाकू’, यांसारखे शब्द सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या तोंडी शोभून दिसत नाहीत. यासाठी संबंधित न्यायमूर्तींनी कृष्णा स्वामी प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचे सांगणे लक्षात घेतले पाहिजे, तसेच रवींद्रन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते, ‘न्यायालयीन कार्यालय हा सार्वजनिक न्यास आहे. त्यामुळे न्यायाधीश हा उच्च सचोटी, प्रामाणिकपणा आणि नैतिक सामर्थ्य असलेला असावा’, अशी अपेक्षा करण्याचा समाजाला अधिकार आहे.
– श्री. सिद्धराम पाटील, सोलापूर. (१५.४.२०२४)