रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. राधा गावडे (वय ५० वर्षे) आणि फोंडा (गोवा) येथील श्रीमती अंजली कुलकर्णी (वय ७४ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
रामनाथी, गोवा – गुरुंविषयीचा भाव, श्रद्धा, व्यष्टी साधनेचे प्रयत्न सातत्याने आणि मनापासून करून स्वत:मध्ये पालट करणे, साधनेच्या प्रयत्नांना भावाची जोड देऊन त्यातला आनंद अनुभवणे, असे गुण असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधिका सौ. राधा गावडे (वय ५० वर्षे) आणि ढवळी, फोंडा, गोवा येथील श्रीमती अंजली कुलकर्णी (वय ७४ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता एका सत्संगात घोषित करण्यात आली. १० एप्रिल २०२४ या दिवशी धान्य विभागातील साधकांच्या साधनेच्या संदर्भात घेतलेल्या एका सत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ही आनंदवार्ता सर्वांना दिली. गुढीपाडव्याच्या दुसर्याच दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी २ साधिकांच्या आध्यात्मिक प्रगतीची आनंदवार्ता दिल्यामुळे साधकांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. अन्नपूर्णा कक्षाचे दायित्व पहाणार्या सनातनच्या संत पू. रेखा काणकोणकर यांनी या दोघींना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी सौ. राधा गावडे यांचे पती श्री. घनश्याम गावडे आणि श्रीमती अंजली कुलकर्णी यांची कन्या अश्विनी कुलकर्णी, तसेच धान्य विभागात सेवा करणारे साधक उपस्थित होते.
आध्यात्मिक पातळी घोषित केल्यानंतर सौ. राधा गावडे यांनी व्यक्त केलेले मनोगत
‘मी काही प्रयत्न केले नाहीत. ३ मास स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवली. त्यातून मला साधनेची दिशा मिळाली. त्यानंतर पू. रेखाताई काणकोणकर यांनी घेतलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यांमुळे मला पुष्कळ साहाय्य झाले. मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणी पुष्कळ प्रार्थना करायचे की, ‘साधना करतांना माझ्याकडून चुका होतात. तुम्हीच माझ्याकडून साधनेचे प्रयत्न करून घ्या. मला केवळ तुमचे आणि प.पू. गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) चरण हवे आहेत.’
आज पहाटे ४ वाजता श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ माझ्या स्वप्नात आल्या होत्या. त्यांनी मला पुष्कळ प्रेमाने हाक मारली. त्या हाकेने माझे मन पुष्कळ स्थिर झाले. सर्वांबद्दल प्रेम वाटू लागले. त्यामुळे मी आज आनंदात आहे.’
अशी झाली आनंदवार्तेची घोषणा !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सत्संगात धान्य विभागातील साधकांच्या साधनेच्या प्रयत्नांविषयी जाणून घेतले. साधकांनी आढाव्यांविषयी सांगितलेल्या पालटांमध्ये सौ. राधा गावडे आणि श्रीमती अंजली कुलकर्णी यांनीही त्यांचे प्रयत्न सांगितले. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी पुढील काव्य म्हटले.
गुढीपाडव्याने झाला आरंभ शुभवार्तांना,
आता धान्यलक्ष्मी कृपा करून आनंद देई साधकांना ।
२ साधिका झाल्या आज जन्म-मरण चक्रांतून मुक्त,
झाल्या श्री गुरुचरणी रुजू त्या, होऊनी भगवंताच्या भक्त ।।
आता सर्व साधकांना उत्सुकता लागली असेल की, कोण आहेत त्या दोन साधिका ? त्या आहेत सौ. राधा गावडे आणि श्रीमती अंजली कुलकर्णी ! आज या दोघींनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.
श्री. घनश्याम गावडे (सौ. राधा गावडे यांचे पती) (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये
‘मध्यंतरी सौ. राधा हिला स्वप्नांमध्ये संतांचे दर्शन होत होते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ स्वप्नात येऊन तिला मार्गदर्शन करायच्या. ती त्याविषयी मला सकाळी उठल्यावर सांगायची. कधीकधी मी तिला विचारायचो की, ‘तुझी ६० टक्के आध्यात्मिक पातळी व्हावी, असे तुला वाटत नाही का ?’ तेव्हा ती सांगायची की, ‘देव मला त्याच्या जवळ घेईल तेव्हा घेईल.’ यावरून लक्षात आले की, ती पातळीमध्ये अडकली नाही किंवा ‘माझी ६० टक्के पातळी व्हायलाच पाहिजे’, अशी सौ. राधा हिची अपेक्षा नव्हती. देवाच्या चरणांजवळ आहे, तेच पुष्कळ आहे, असे तिला वाटते.’
आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यानंतर श्रीमती अंजली कुलकर्णी यांनी व्यक्त केलेले मनोगत
‘काही दिवसांपूर्वी मी कोल्हापूरहून गोव्याला येण्यासाठी गाडीत बसले. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘देव मला काहीतरी आनंद देणार आहे.’ पूर्वी कधी असा विचार माझ्या मनात आला नव्हता. हे सगळे अनपेक्षित आहे. अश्विनीनेही (श्रीमती अंजली कुलकर्णी यांची कन्या अश्विनी कुलकर्णी यांनी) मला विचारले, ‘‘आई, तुला आनंद का वाटला ?’’ तेव्हा मला काही सांगता आले नाही. माझी आई (सनातनच्या ७१ व्या संत पू. (कै.) आशा दर्भेआजी) मला नेहमी म्हणायची, ‘‘अगं, तू जे सोसलेस, ते गुरूंना दिसत नाही का ?’’ खरंच गुरुदेवांनी माझ्यासाठी पुष्कळ केले आहे.
आम्ही ‘अहंकारी, स्वतःच्या मनासारखे सगळे करणारे’, असे दगड होतो. ‘मी काय करत होते ?’, हे मलाच कळत नव्हते. मी काही केलेले नाही. गुरुदेवांविना हे पालट घडूच शकत नाहीत.’