रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील श्री सिद्धिविनायक आणि श्री भवानीदेवी यांचे दर्शन घेतांना कु. सायली देशपांडे हिला आलेल्या अनुभूती अन् श्री मारुतिरायाने स्वभावदोष लक्षात आणून देऊन दास्यभावाचे शिकवलेले महत्त्व !
‘एका साधिकेने मला रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायक, श्री भवानीदेवी आणि श्री हनुमान या देवतांविषयी आलेल्या अनुभूती सांगितल्या. त्या ऐकून ‘आपणही या देवतांच्या दर्शनाला जाऊन देवाशी अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करूया’, असा विचार माझ्या मनात आला; पण काही सेवांमुळे तेव्हा मला जाणे शक्य झाले नव्हते.
१. मनाची स्थिती नकारात्मक होणे, त्यामुळे चुका वाढून मनाला निराशा आल्यावर श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जायचे ठरवणे : त्यानंतर काही दिवसांनी ‘माझ्यावरील त्रासदायक आवरण वाढले असून माझ्या मनाची स्थिती नकारात्मक झाली आहे’, असे माझ्या लक्षात आले. माझ्याकडून होणार्या चुकांचे प्रमाणही वाढल्यामुळे मला निराशा आली. तेव्हा ‘श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन त्याला आत्मनिवेदन करूया’, असे मला वाटले.
२. ‘श्री सिद्धिविनायकाच्या रूपात साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले समोर आहेत’, असे जाणवून आर्ततेने आत्मनिवेदन केले जाणे : मी श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले, तेव्हा माझ्या मनात ‘श्री सिद्धिविनायकाच्या रूपात साक्षात् परम पूज्यच माझ्यासमोर आहेत’, असा भाव निर्माण झाला. त्यामुळे माझी आर्ततेने प्रार्थना झाली. आत्मनिवेदन केल्यावर पुष्कळ हलके वाटून मला ‘माझे मन, बुद्धी आणि देह यांवरील आवरण नष्ट झाले’, अशी अनुभूती आली. त्यामुळे ‘मनाची स्थिती पूर्ववत् होईपर्यंत काही दिवस श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊया’, असे मी ठरवले.
३. गुरुकृपेने देवतादर्शन आणि व्यष्टी साधना एकाच वेळेत करायला सुचणे
३ अ. सेवा नसतांना आश्रम परिसरातील देवतांच्या दर्शनाला जायचे ठरवणे : मी सनातनच्या ५२ व्या संत पू. (सौ.) मालिनी देसाई (वय ७७ वर्षे) यांची सेवा करते. त्या साधकांसाठी ३० मिनिटे नामजपादी उपाय करायला जातात. त्या वयस्कर असल्यामुळे मी त्यांना उपायांच्या ठिकाणी जायला साहाय्य करते आणि उपाय संपल्यावर पुन्हा खोलीत घेऊन येण्यासाठी जाते. त्यामुळे मला मधली २० मिनिटे सेवा नसते. त्या वेळेत मी माझी व्यष्टी साधना करते. या वेळेत आश्रमपरिसरातील ‘देवतांचे दर्शन घेऊ या’, असे ठरवून मी प्रतिदिन आधी श्री सिद्धिविनायक, मग श्री भवानीदेवी आणि त्यानंतर श्री हनुमान अशा क्रमाने दर्शन घेऊ लागले. माझ्याकडे २० मिनिटेच वेळ असल्याने दर्शन घेऊन झाल्यावर सत्र करणे मला शक्य होत नव्हते.
३ आ. श्री सिद्धिविनायकाच्या समोर बसून प्रार्थना केल्यावर स्वयंसूचनांचे सत्र आणि देवतादर्शन यांची सांगड घालता येऊन आनंद होणे : श्री सिद्धिविनायकाच्या समोर बसून मी त्याला शरणागतभावाने प्रार्थना केली. त्याच्याच कृपेने मला सुचले, ‘प्रत्येक देवतेला ५ प्रदक्षिणा घालतांना ५ वेळा स्वयंसूचना घेऊन स्वयंसूचनेचे एक सत्र (टीप) करता येईल आणि अशा ३ देवतांना प्रदक्षिणा घालतांना ३ स्वयंसूचनांची सत्रे होतील. ‘प्रत्येक देव, म्हणजे मी सत्रात घेतलेल्या स्वभावदोषरूपी राक्षसाचा संहारक आहे. त्या देवतेभोवती ५ वेळा प्रदक्षिणा घालतांना मी ५ वेळा स्वयंसूचना घेतल्या, तर मी त्या देवतेला माझ्यातील स्वभावदोष नष्ट करण्यासाठी आळवत आहे’, असे हाईल.
(टीप – स्वतःमधील स्वभावदोष जाण्यासाठी ‘एका स्वभावदोषावर मनाला योग्य दृष्टकोनाच्या एका वेळी ५ वेळा सूचना द्यायच्या असतात, त्याला ‘स्वयंसूचना’, असे म्हणतात. अशा ‘एका वेळी ३ स्वभावदोषांवर स्वयंसूचना घेतल्या जातात. त्याला ‘सत्र करणे’, असे म्हणतात.)
३ इ. स्वभावदोष जाण्यासाठी देवाला आळवल्याप्रमाणे सत्र होत असल्यामुळे ते अधिक परिणामकारक होऊन आनंद अनुभवणे : तेव्हापासून मी सत्र आणि देवदर्शन एकत्र करू लागले. सत्र करतांना मी सत्रातील प्रत्येक शब्द देवाच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करते. परिणामस्वरूप सत्र परिणामकारक होऊन मला आनंदाची अनुभूती घेता येते. त्यासाठी मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
४. श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती
अ. श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीसमोर गेल्यावर माझ्या मनावरील ताण आपोआप हलका होतो.
आ. श्री सिद्धिविनायकाला शरण जाऊन आत्मनिवेदन करतांना मला पुष्कळ आर्तता अनुभवता येते. त्यामुळे माझी लगेच भावजागृती होते.
इ. श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतांना मला भगवंत भेटल्याचा आनंद होतो.
ई. श्री सिद्धिविनायकाला आत्मनिवेदन करतांना माझ्या मनात काही विकल्प आले, तर लगेच विचाररूपात त्याचे उत्तर माझ्या मनात येते.
उ. प्रतिदिन श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्याने माझ्यावरील आवरण न्यून होऊन मला आनंदाची अनुभूती येत आहे.
५. श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतांनाच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन होऊन अनुभवलेली भावस्थिती ! : श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतांना मला अनेक वेळा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ भ्रमणभाषवर बोलतांना दिसायच्या. त्यांचे दर्शन झाल्यावर माझा भाव लगेच जागृत व्हायचा आणि ‘मी अंतर्मनाने त्यांच्याशी सूक्ष्मातून संवाद साधत आहे’, असे मला जाणवायचे.
६. श्री भवानीमातेचे दर्शन घेतांना आलेल्या अनुभूती : श्री भवानीमातेच्या दर्शनाला गेल्यावर मला पुष्कळ भावाची स्पंदने जाणवतात. देवीचे दर्शन घेतांना ‘तिचे मारक रूप माझ्यावरील आवरण, स्वभावदोष आणि अहं नष्ट करत आहे, तर तिचे तारक रूप मला चैतन्य प्रदान करून गुणवृद्धीसाठी प्रेरित करत आहे’, मला असे वाटते.
७. श्री हनुमंताचे दर्शन घेतांना जाणवलेली सूत्रे
७ अ. श्री हनुमंताला दास्यभक्ती शिकवण्यासाठी शरणागतीने प्रार्थना होणे : श्री हनुमंताच्या मूर्तीचे दर्शन घ्यायला जातांना माझे मन आपोआप श्री हनुमंताला शरण जाते. माझ्याकडून प्रार्थना होते, ‘हे श्री हनुमंता, हे पवनपुत्रा, हे श्रीरामाच्या भक्ता, मी तुला संपूर्णपणे शरण आले आहे. हे भगवंता, त्रेतायुगात तुला श्रीरामरूपातील साक्षात् श्रीमन्नारायणाची सेवा करायची संधी मिळाली. या कलियुगात भगवंताच्या अपार कृपेमुळे मला श्री गुरुरूपातील श्रीमन्नारायणाची सेवा आणि भक्ती करण्याची संधी मिळाली आहे; पण यासाठी माझा भाव पुष्कळ अल्प पडतो. हे भगवंता, मला भावाचे दान दे. ज्याप्रमाणे तू श्रीरामचरणांची भक्ती केलीस, त्याचप्रमाणे मलाही प.पू. गुरुमाऊलींची भक्ती करता येऊ दे. हे मारुतिराया, माझ्यात ‘अहं’ आहे. देवा, तूच मला या ‘अहं’च्या जाळ्यातून मुक्त होण्याचा मार्ग दाखव. ‘दास्यभाव कसा असायला हवा ?’, हे तूच मला शिकव.’ ही प्रार्थना करतांना ‘मी पृथ्वीलोकातून दास्यलोकात पोचले आहे’, असे मला जाणवून माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि प्रतिदिन माझ्याकडून हीच प्रार्थना होऊ लागली.
७ आ. मनात दास्यभाव असेल, तरच समोरचा सांगत असलेली चूक स्वीकारता येऊ शकणे : एकदा मला माझ्याकडून होणार्या चुकांमुळे होत असलेल्या प्रसंगांचा ताण आला होता; म्हणून मी श्री हनुमंताला ‘माझा दास्यभाव वाढू दे’, अशी प्रार्थना करत होते. मी श्री हनुमंताच्या चरणांशी बसून त्याला सर्व प्रसंग सांगितले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘माझ्यात ‘मी दास आहे’ किंवा ‘मी गुरूंचा भक्त आहे’, ही जाणीव असेल, तर इतरांच्या कृतींकडे लक्ष न जाता, समोरचा सांगत असलेली चूक मला स्वीकारता येईल.’
७ इ. दासाच्या मनात प्रतिमा नसणे, केवळ देवाचा ध्यास असणे, त्यामुळे प्रसंगांचा मनावर परिणाम न होणे : ‘देवाच्या दासाला कुणी काही म्हणेल ?’, याची, म्हणजेच प्रतिमेची चिंता आणि चुकांची भीती नसते. त्याच्या मनात केवळ देवाचा ध्यास आणि भक्ती असते. ‘मी दास्यभावात राहिले, तर माझ्या समवेत होणार्या प्रसंगावर मी सहज मात करू शकते’, याची मनाला जाणीव झाली. माझ्याकडून श्री हनुमंताला नकळत प्रार्थना झाली, ‘हे भक्तश्रेष्ठ हनुमंता, माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे मी श्री गुरूंची भक्ती करायला अल्प पडत आहे. भगवंता, तूच मला शक्ती दे आणि श्री गुरूंची दास किंवा भक्त होण्यासाठी मला मार्गदर्शन कर.’ त्यानंतर माझ्या मनातील सर्व विचार थांबले.
७ ई. हनुमंताने चुका दाखवून अंतर्मुख करणे : नेहमीप्रमाणे मी प्रतिदिन श्री हनुमानाच्या मंदिरात दर्शनाला जात होते. एक दिवस माझ्या मनाची स्थिती बहिर्मुख झाली होती. मी श्री हनुमानाला प्रार्थना करून डोळे बंद केल्यानंतर मला पुढील दृश्य दिसले, ‘सर्वप्रथम मला पांढरा प्रकाश दिसला. तिथे हनुमान आला. त्याने माझा हात धरला आणि मला एका दारातून आत घेऊन गेला. हनुमान मला सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मी केलेल्या कृती आणि झालेला प्रत्येक प्रसंग दाखवत होता. त्यात ‘मी दास्यभावाने प्रयत्न करायला कुठे न्यून पडले ?’, हे दाखवत होता. तेव्हा ‘दिवसभरात माझ्याकडून पुष्कळ चुका झाल्या’, असे लक्षात येऊन माझी वृत्ती अंतर्मुख झाली.
८. दास्यभाव वाढवण्यासाठी हनुमंताने मनात विचार देऊन केलेले मार्गदर्शन !
८ अ. कृतज्ञताभाव वाढवणे : ‘भगवंताने दिलेली प्रत्येक गोष्ट आणि दिलेली परिस्थिती ही त्याची कृपाच आहे’, यांसाठी सतत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. जे नाही, त्याची आसक्ती नको. कृतज्ञताभावाने कर्तेपणा न्यून होतो आणि दास असल्याची जाणीव होते.
८ आ. श्री गुरुचरणी प्रार्थना करून सतत शरणागतभावात राहिल्यास ‘अहं’, न्यून होणे : ‘गुरुमाऊली तुम्हीच करून घ्या’, असे सतत सांगून अधिकाधिक प्रार्थना करायला हव्यात. प्रार्थना, म्हणजेच याचना करायला हवी. ‘मनात याचकभाव निर्माण झाल्यास शरणागतभाव वाढण्यास साहाय्य होऊन अहं न्यून होतो’, असे परम पूज्यांनीही सांगितले आहे. यासाठी श्री गुरूंनाच बळ मागायला हवे.
८ इ. ‘स्वतःची पंचेंद्रिये, मन आणि बुद्धी यांवर श्री गुरूंचेच नियंत्रण आहे’, याची जाणीव झाल्यावर कर्तेपणा जाऊन गुरुकृपा अनुभवता येणे : प्रत्येक क्षणी माझे स्वामी श्रीमन्नारायण माझ्या हृदयी विराजमान असून तेच या देहरूपी रथाचे सारथी आहेत. माझी पंचेंद्रिये, मन आणि बुद्धी त्यांच्याच नियंत्रणाखाली आहेत. ‘माझे काहीही अस्तित्व नसून केवळ तेच कार्यरत आहेत’, ही जाणीव मनाला झाल्यावर कसलाही कर्तेपणा न रहाता गुरुकृपा अनुभवता येईल.
८ ई. आज्ञापालनानेच आध्यात्मिक प्रगती होत असणे : प्रत्येक क्षणी ‘मी स्वामींचा दास आहे’, ही जाणीव मनात असू दे. ‘गुरु सांगतील, ती पूर्वदिशा’, या भावाने आज्ञापालन करण्याच्या स्थितीत रहा. श्री गुरूंनी उत्तरदायी साधकांच्या माध्यमातून कुठलेही सूत्र सांगितल्यावर त्याविषयी मनात विकल्प नको. तिथे आपली बुद्धी न वापरता आज्ञापालनच करायचे. आज्ञापालनानेच खरी प्रगती होते. ‘बुद्धीने ठरवून प्रयत्न केले, तर फलनिष्पत्ती अल्प होते’, हे नेहमी लक्षात ठेव.
८ उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी शरण जायला हवे; कारण कर्ते-करविते तेच असणे : हे सर्व प्रयत्न सांगणारेही गुरुदेवच आहेत आणि करून घेणारेही गुरुदेवच आहेत. मनामध्ये उच्चकोटीची भक्ती आणि पराकोटीची तळमळ असायला हवी. ‘ती तळमळ निर्माण करणे’, हे केवळ श्री गुरूंच्या हाती आहे. त्यामुळे त्यांनाच शरण जाऊन प्रार्थना करायला हवी.
९. अनुभूती
अ. ‘हनुमान माझ्या मनातील प्रश्नांची उत्तरे देत आहे’, अशी अनुभूती येऊन माझे मन निर्विचार होते.
आ. ‘मी हनुमानाशी वैखरीतून बोलल्यावर तो आवाज ब्रह्मांडात घुमत आहे’, असे मला जाणवते.
१०. कृतज्ञता आणि प्रार्थना : ‘साक्षात् श्रीरामानेच त्याच्या परमभक्ताच्या माध्यमातून मला भक्तीचे बोधामृत दिले’, त्यासाठी पुष्कळ कृतज्ञता ! ‘प.पू. गुरुमाऊलींच्या अपार कृपेमुळे मला देवतांची कृपा आणि अस्तित्व अनुभवता आले’, यासाठी मी गुरुचरणी कृतज्ञ आहे. ‘हे गुरुमाऊली, तुम्ही दाखवलेल्या मार्गावरून मला साधनेचे पाऊल पुढे टाकता येऊ दे’, अशी तुमच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’
– कु. सायली देशपांडे (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.५.२०२३)
|