जोतिबा भक्तांच्या वतीने ‘सहजसेवा ट्रस्ट’च्या वतीने २१ ते २४ एप्रिल या कालावधीत विनामूल्य अन्नछत्र !
कोल्हापूर, १८ एप्रिल (वार्ता.) – चैत्र महिन्यातील जोतिबा देवाच्या यात्रेत जोतिबा डोंगर येथे जोतिबा भक्तांच्या वतीने ‘सहजसेवा ट्रस्ट’च्या वतीने २१ ते २४ एप्रिल या कालावधीत विनामूल्य अन्नछत्र चालवण्यात येणार आहे. हे अन्नछत्र २१ एप्रिलला सायंकाळी ७ पासून २४ एप्रिलपर्यंत दिवसरात्र अखंडपणे चालू रहाणार आहे. या यात्रेत दीड ते दोन लाख भाविक या अन्नछत्राचा लाभ घेतील, अशी माहिती ‘सहजसेवा ट्रस्ट’चे विश्वस्त श्री. सन्मति मिरजे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी संकेत पाटील, रोहित गायकवाड, मनीष पटेल, चिंतन शहा उपस्थित होते.
१. या यात्रेसाठी भाविक त्यांच्या भागातून सासनकाठ्या घेऊन शेकडो किलोमीटर पायी चालत ‘चांगभल’चा गजर करत भक्त जोतिबा डोंगरावर येतात. या भाविकांच्या सेवेसाठी आम्ही गेली २३ वर्षे अन्नछत्र चालवत आहोत.
२. यात्रा काळात प्रशासन, आरोग्यसेवा, होमगार्ड, पोलीस, वनविभाग यांसह प्रत्येक स्वयंसेवकाला आम्ही प्रसाद देतो. अन्नछत्रासाठी १५ सहस्र चौरस फुटांचा भव्य मंडप घालण्यात आला आहे. त्याचसमवेत चहा आणि मठ्ठा यांसाठीही स्वंतत्र मंडप घालण्यात आला आहे. आमचे ४०० स्वयंसेवक त्यासाठी अहोरात्र सेवा देणार आहेत.
३. अन्नछत्र परिसरात निसर्गाचे रक्षण होण्यासाठी, अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून ‘स्टील’ची ताटे, तसेच चहा आणि मठ्ठा यांसाठी स्टीलचे पेले ठेवण्यात येणार आहेत. गायमुख परिसरात यात्रेकरूंना योग्य ते वैद्यकीय साहाय्य मिळण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने सिद्ध ठेवण्यात येणार आहे.
४. प्रतिवर्षी अन्नछत्राची व्याप्ती वाढत असून ज्यांना ‘सहजसेवा ट्रस्ट’ला साहाय्य करायचे आहे त्यांनी ९८९०९४४३४३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘ट्रस्ट’च्या वतीने करण्यात आले आहे.