शवपिशव्या खरेदी घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन संमत !
मुंबई – कोरोनाच्या काळातील शवपिशव्या खरेदी घोटाळ्याच्या प्रकरणात १८ एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा अटकपूर्व जामीन संमत केला आहे. न्यायमूर्ती नितीन जमादार यांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला.
सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाच्या विरोधात किशोरी पेडणेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. कोरोनाच्या काळात १६ मे ते ७ जून २०२० या कालावधीत पेडणेकर महापौर असतांना मुंबई महानगरपालिकेद्वारे प्रत्येकी ६ सहस्र ७१९ रुपयांना १ सहस्र २०० शवपिशव्या खरेदी केल्या. चढ्या दराने शवपिशव्या खरेदी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांसह शवपिशव्यांचा पुरवठा करणार्या आस्थापनाचे संचालक आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांनाही आरोपी करण्यात आले आहे.