नावापुरत्या संशोधनाने काहीही साध्य होत नाही ! – डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ
‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळा’च्या वतीने आयोजित पुणे येथील ‘प्रा. राम ताकवले स्मृती व्याख्यान’ !
पुणे – उपलब्ध ज्ञानात नवी भर घालणे, मानवाचे जीवन अधिक सुकर करणारे नवे तंत्रज्ञान विकसित करणे, ही गोष्ट तंत्रज्ञानाची नवी दिशा ठरवतांना प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. या दोन्ही गोष्टी साध्य न करणार्या नावापुरत्या संशोधनाने काहीही साध्य होत नाही. भारताचे संशोधन या दिशेने चालले आहे. या संदर्भात पालट होणे आवश्यक आहे, असे परखड मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी मांडले. संशोधनाधिष्ठित उद्योगच आजच्या काळात अर्थकारणाचे प्रमुख स्तंभ होत आहेत; मात्र या क्षेत्रातही भारताचे स्थान नगण्य असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळा’च्या वतीने ‘प्रा. राम ताकवले स्मृती व्याख्याना’च्या वेळी डॉ. काकोडकर बोलत होते.
काकोडकर पुढे म्हणाले की, विकसित भारताचे स्वप्न पहात असतांना शहर आणि ग्रामीण अशी दरी निर्माण झाली आहे. जागतिक स्पर्धेला तोंड देतांना ही दरी बुजवली पाहिजे. अंगणवाड्यांमध्ये बालविकासावर भर देण्याची आवश्यकता आहे. तसेच उपजीविकेसाठी कौशल्य शिक्षण आवश्यक आहे. व्यावसायिक शिक्षणाच्या संधी मुबलक असल्या, तरी चांगल्या दर्जाचे शिक्षण देणार्या संस्थांची संख्या तोकडी आहे. त्यामुळे प्रवेशासाठी जीवघेणी स्पर्धा निर्माण होऊन ‘कोचिंग क्लास’ (खासगी शिकवणीवर्ग) नावाची विकृती शिक्षणक्षेत्रात आली आहे.