‘वाईटातूनही चांगले घडवणे’, हा भगवंताचा स्थायीभाव आहे’, या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाक्याची प्रचीती घेणारे श्री. अरुण डोंगरे !
‘२८.१२.२०२३ या दिवशी ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये ‘भगवंत प्रत्येक घटनेतून चांगलेच घडवत असतो. ‘वाईटातूनही चांगले घडवणे’, हा भगवंताचा स्थायीभाव आहे !’ – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ’, अशी आकाशओळ छापून आली होती. ती वाचून माझे डोळे पाणावले आणि मला त्या संदर्भातील माझ्या जीवनात घडलेला प्रसंग आठवला.
१. पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाऊ न शकल्याचे दुःख अनेक वर्षे मनात रहाणे
वर्ष १९७५ मध्ये माझा ‘आय.आय.टी., कानपूर’ येथून ५ वर्षांचा ‘बी.टेक.’चा (B.Tech.चा) अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर मला अमेरिकेच्या ‘कोलंबिया युनिव्हर्सिटी’मध्ये प्रवेश मिळाला होता; पण काही कारणांमुळे मी पुढील शिक्षणासाठी तेथे जाऊ शकलो नाही. त्याचे मला पुष्कळ दुःख झाले. नंतर मी नवी देहली येथे एका ‘फाउंड्री’मध्ये काम स्वीकारले; पण प्रत्येक क्षणी मला वाटायचे, ‘असे काम करण्याऐवजी मी उच्च शिक्षण घ्यायला हवे होते.’
२. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार पूर्णवेळ साधना करू लागल्यावर मनातील दुःखाचे विचार न्यून होणे
वर्ष १९९८ मध्ये माझा ‘सनातन संस्थे’शी संपर्क झाला आणि काही दिवसांनी मी पूर्णवेळ साधना करू लागलो. भौतिकतेची मर्यादा लक्षात आल्यामुळे माझ्या मनातील सर्व विचार न्यून झाले. आता माझ्या मनात विचार येतो, ‘मी विदेशात गेलो असतो, तर माझे आजचे जीवन फार वेगळे झाले असते. मी भौतिक जीवनात गुरफटून गेलो असतो आणि माझ्याकडून साधनेचा विचारही झाला नसता.’
३. ‘वाईटातूनही चांगले घडवणे’, हा भगवंताचा स्थायीभाव आहे’, या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या वाक्याचा प्रत्यय येणे
वयाची ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत ‘मला अमेरिकेला शिकायला जाता आले नाही’, याचे पुष्कळ दुःख वाटत होते. तेव्हा मला ‘अमेरिकेला जाता न आल्याचे दुःख झाले असले, तरी ते माझ्या भल्यासाठीच होते’, असे आता प्रकर्षाने जाणवते. ‘वाईटातूनही चांगले घडवणे’, हा भगवंताचा स्थायीभाव आहे’, या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या वाक्याचा मला पूर्णपणे प्रत्यय आला.’
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती सतत शरणागतीच्या भावात राहिल्याने शांती जाणवणे
‘विधात्याला शरण गेल्याविना आत्मशांती लाभत नाही’, या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या दुसर्या वाक्याचीही अलीकडे मला वरचेवर प्रचीती येते. मागील काही दिवसांपासून माझ्या लक्षात येत आहे, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती सतत शरणागतभावात राहिल्याने मनाला शांती जाणवते.’
‘साधना चालू केल्यानंतर इतक्या वर्षांनी गेल्या काही मासांत सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव मला जी शांतीची अनुभूती देत आहेत’, त्यासाठी त्यांच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. अरुण डोंगरे (वय ७१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.१.२०२४)