श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात येण्यापूर्वी साधिकेला झालेले त्रास आणि त्यांचे चैतन्यमय अस्तित्व अनुभवतांना आलेल्या अनुभूती
‘३०.१.२०२३ ते ४.२.२०२३ या कालावधीत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास होत्या. त्या आश्रमात येण्यापूर्वी मला झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आश्रमात येण्यापूर्वी झालेले त्रास
१ अ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आश्रमात येणार आहेत’, याची कल्पना नसतांना त्या येण्यापूर्वीच साधिकेच्या आध्यात्मिक त्रासात वाढ होऊन तिला अनावर ग्लानी येणे : ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आश्रमात येणार आहेत’, याची मला कोणतीही कल्पना नव्हती; पण त्या येण्याच्या एक दिवस आधीपासून मला ‘अस्वस्थ वाटणे, थकवा येणे, तसेच अनावर ग्लानी येणे’, अशा स्वरूपाचे त्रास होऊ लागले. ‘त्यांच्या चैतन्याने मला त्रास देणार्या अनिष्ट शक्तींची शक्ती न्यून होणार’; म्हणून अनिष्ट शक्ती मला आधीपासून त्रास देऊन झोपवून ठेवत होत्या. या त्रासामुळे माझा एक दिवस पूर्ण झोपण्यात गेला.
१ आ. आश्रमात सेवेला गेल्यावर त्रास होणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ येणार होत्या, त्या दिवशी देवानेच मला बळ दिले आणि मी आश्रमात सेवेला जाऊ शकले. आश्रमात गेल्यावर मला उलटीसारखे होणे, गरगरणे आणि तोल जाणे, असे त्रास होत होते.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे आश्रमात आगमन
२ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे आश्रमात दर्शन होऊन त्रास न्यून होणे : मला होत असलेले त्रास न्यून व्हावेत, यासाठी मी नामजपादी आध्यात्मिक उपाय करण्यासाठी जाऊ लागले. त्याच वेळी मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे दर्शन झाले आणि माझा ५० टक्के त्रास न्यून झाला.
२ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यामुळे आश्रमातील चैतन्यात पुष्कळ वाढ झाल्याचे जाणवून ‘आश्रम एका वेगळ्याच लोकात आहे’, असे वाटणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आश्रमात आल्यावर ‘आश्रमात प्रत्यक्ष देवीचेच आगमन झाले आहे’, असे जाणवत होते. त्यांचे मोहक हास्य वातावरणात चैतन्याचे प्रक्षेपण करत होते. त्यामुळे ‘आश्रमातील चैतन्यात पुष्कळ वाढ झाली आहे’, असे जाणवत होते. आश्रम भूलोकात नसून ‘एका वेगळ्या लोकात आहे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आश्रमातील प्रत्येक साधकाला वेगळ्या लोकात घेऊन गेल्या आहेत’, असे जाणवत होते.
२ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आपल्या प्रेमळ शब्दांतून साधकांना चैतन्य आणि शक्ती प्रदान करणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ संपर्कात येणार्या प्रत्येक साधकावर प्रीतीची उधळण करत होत्या. आपल्या प्रेमळ शब्दांतून साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी चैतन्य आणि शक्ती देत होत्या. त्यांच्या प्रेमाने साधक भारावून जात होते.
२ ई. आश्रमात सर्व संत एकत्र आले असतांना ‘श्रीसत्शक्ति सिंगबाळ पुष्कळ विशाल रूपात दिसून ‘सर्व संत त्यांचे बालक आहेत’, असे दिसणे अन् ‘सोनेरी दैवी कणांचा वर्षाव होत असून आकाशात चैतन्याचे प्रक्षेपण होत आहे’, असे जाणवणे : एकदा सायंकाळी आश्रमात सर्व संत, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर हे सर्वजण एकत्र आले होते. त्या वेळी मला श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ पुष्कळ विशाल रूपात आणि सर्व संत त्यांचे बालक असल्याप्रमाणे दिसत होते. तेथे ‘जणू सोनेरी दैवी कणांचा वर्षाव होत असून आकाशात मोठ्या प्रमाणावर चैतन्याचे प्रक्षेपण होत आहे’, असे जाणवत होते. त्या क्षणी माझी पुष्कळ भावजागृती होत होती. ‘मला या दैवी क्षणांचे प्रत्यक्ष साक्षीदार व्हायला मिळाले’, याविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. त्या वेळी एक साधिका म्हणाली, ‘‘सर्वार्थांनी आदर्श असलेले आणि कठोर परिश्रम घेऊन संतपदाला पोचलेले आपले सर्व संत आपल्या समोर आहेत.’’ तेव्हा ‘परात्पर गुरुदेव आपल्या आयुष्यात आले, त्यांनी साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्व संत दिले आणि साधनेला बळ देण्यासाठी प्रत्यक्ष देवीमातेलाही पाठवले’, असे वाटून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
– सौ. राधा रवींद्र साळोखे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.३.२०२३)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |