मालदीवचे राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांचे हात भ्रष्टाचारात गुंतल्याचा अहवाल !

संसदीय निवडणुका तोंडावर आल्यामुळे खळबळ !

महंमद मुइज्जू

माले (मालदीव) – मालदीवमध्ये संसदेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असतांना एक अहवाल फुटला आहे. या अहवालात राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. यामुळे विरोधी पक्षांनी मुइज्जू यांच्यावर टीकेची झोड उठवली असून त्यांच्या त्यागपत्राची मागणी केली आहे.

मुइज्जू यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मुइज्जू यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

सौजन्य : WION

संसदेच्या निवडणुका येत्या रविवारी, म्हणजे २१ एप्रिलला होत आहेत. विरोधकांच्या ‘मालदीव डेमोक्रॅटिक पार्टी’ आणि मुइज्जू यांच्या ‘पीपल्स नॅशनल काँग्रेस’ यांच्यात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. फुटलेल्या अहवालातून मालदीवच्या ‘फायनॅन्शिअल इंटेलिजन्स युनिट’ आणि मालदीव पोलीस सेवा विभाग यांची काही कागदपत्रे समोर आली आहेत. यांवरून मुइज्जू यांचे हात भ्रष्टाचारात गुंतल्याचे स्पष्ट होत आहे.

काय आहे अहवालात ?

वर्ष २०१८ चा हा अहवाल आहे. यात मुइज्जू यांच्या बँक खात्यांसंदर्भात पैसे देवाण-घेवाणीत अनियमितता आढळून आली आहे. निधीचा स्रोत लपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे यात सांगण्यात आले आहे. याखेरीज काही भ्रष्ट लोकांशी त्यांचे संबंध दिसून आले आहेत.