पिंपरी (पुणे) शहरातील विज्ञापन फलकांमुळे जीवित किंवा वित्त हानी झाल्यास फलक मालकाचे दायित्व !
महानगरपालिकेने दिली चेतावणी
पिंपरी (जिल्हा पुणे) – महापालिका हद्दीमध्ये असणार्या सर्व विज्ञापन फलकधारकांनी उभारण्यात आलेल्या फलकांचे बांधकाम भक्कम आहे कि नाही, याची निश्चिती करून घ्यावी. जर बांधकाम कमकुवत असेल, तर ते त्वरित हटवावे. येत्या काही दिवसांमध्ये वादळ, वारा किंवा जोरदार पावसाने फलक पडून जीवित किंवा वित्त हानी झाल्यास त्यास विज्ञापन फलकधारक उत्तरदायी असेल, अशी चेतावणी महापालिकेने दिली आहे.
वादळ वार्याने कुजलेले, गंजलेले, कमकुवत असे विज्ञापन फलक पडून जीवितहानी किंवा वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्या टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यासाठी महापालिका अधिकार्यांची बैठक झाली. या वेळी सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, उपायुक्त संदीप खोत आदी उपस्थित होते. महापालिका हद्दीतील काही विज्ञापन फलक हे महापालिकेच्या अनुमतीसाठी प्रलंबित आहेत, ही गोष्ट उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आली आहे. शहरातील सर्व विज्ञापन फलकांचे सादर केलेले बांधकाम अहवाल पुन्हा वर्ष २०२४-२५ एप्रिलपर्यंत पडताळणी करून घेण्याच्या सूचना सहआयुक्त इंदलकर यांनी दिल्या आहेत.