पुणे येथे निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थित रहाणार्या कर्मचार्यांवर कारवाई करणार ! – डॉ. सुहास दिवसे, जिल्हा निवडणूक अधिकारी
अंदाजे १० टक्के कर्मचारी अनुपस्थित
पुणे – जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ अशा ४ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक कामकाजासाठी ७१ सहस्र कर्मचार्यांची आवश्यकता आहे. या कर्मचार्यांचे पहिले प्रशिक्षण १५ एप्रिल या दिवशी पार पडले. या प्रशिक्षणाला ५ सहस्र कर्मचारी अनुपस्थित होते. त्यामुळे अनुपस्थित राहिलेल्या कर्मचार्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. ते निवडणूक कामकाजाच्या आढाव्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, “राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे आकाराने मोठा आहे. ४ लोकसभा मतदारसंघ आणि ८ सहस्र ३८२ मतदान केंद्रे आहेत. परिणामी निवडणुकीसाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागत आहे. पहिल्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित राहिलेल्या कर्मचार्यांना २ आदेश मिळाले असण्याची शक्यता आहे. त्याची पडताळणी करून उर्वरित कर्मचार्यांना नोटीस देण्यात येणार आहे.”