घालीन लोटांगण, वंदीन चरण।
वेगवेगळ्या कवींनी रचलेली आणि वेगवेगळ्या भाषांचे मिश्रण असलेली अत्यंत श्रवणीय अशी आरतीनंतर म्हणावयाची प्रार्थना !
‘आरत्या म्हणून झाल्यावर एका लयीत आणि धावत्या चालीत ‘घालीन लोटांगण…’, ही प्रार्थना म्हटली जाते. ती अतिशय श्रवणीय आणि नादमधुर असल्याने पुष्कळ लोकप्रिय आहे. ती सर्वत्र म्हटली जाते आणि भक्त त्यात तल्लीन होऊन जातात. ही प्रार्थना ४ कडव्यांची आहे आणि ५ वे कडवे, म्हणजे एक मंत्र आहे.
१. वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
अ. ‘घालीन लोटांगण…’ या प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचनाकार (रचयिता) वेगवेगळे आहेत.
आ. चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडांत लिहिली गेली आहेत.
इ. पहिले कडवे मराठीत असून उर्वरित कडवी संस्कृत भाषेत आहेत.
ई. अनेकांना ‘ही गणपतीची प्रार्थना आहे’, असे वाटते; पण यांतील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही.
उ. ही प्रार्थना देवांच्या आरत्या म्हणून झाल्यावर म्हटली जाते.
२. प्रार्थनेतील कडव्यांचा अर्थ
२ अ. पहिले कडवे
घालीन लोटांगण वंदीन चरण। डोळ्यांनी पाहीन रूप तुझें।
प्रेमे आलिंगीन आनंदे पूजीन। भावें ओवाळीन म्हणे नामा।। – संत नामदेव महाराज
वरील कडवे संत नामदेव यांनी १३ व्या शतकात लिहिलेले आहे. यात विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात, ‘मी तुला लोटांगण घालीन आणि तुझ्या चरणांना वंदन करीन. तुझे रूप माझ्या डोळ्यांनी पाहीन आणि मी तुला प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे ओवाळीन.’
२ आ. दुसरे कडवे
त्वमेव माता च पिता त्वमेव। त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव। त्वमेव सर्वं मम देव देव।। – गुरुस्तोत्र, श्लोक १४
अर्थ : तूच माझी माता आणि पिता आहेस. माझा बंधू आणि सखाही तूच आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस.
हे कडवे आद्यशंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात संस्कृतमध्ये आठव्या शतकात लिहिले आहे.
२ इ. तिसरे कडवे
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा। बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात्।
करोमि यद्यत् सकलं परस्मै। नारायणायेति समर्पयामि।। – श्रीमद्भागवत, स्कन्ध ११, अध्याय २, श्लोक ३६
अर्थ : हे नारायणा, शरीर, वाणी, मन, (अन्य) इंद्रिये, बुद्धी आणि आत्मा यांनी अथवा प्रकृतीस्वभावानुसार जे जे मी करतो, ते ते तुला अर्पण करत आहे.
हे कडवे श्रीमद्भागवतमहापुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिले आहे.
२ ई. चौथे कडवे
अच्युतं केशवं रामनारायणं। कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं। जानकीनायकं रामचन्द्रं भजे।। – अच्युताष्टकम्, श्लोक १
अर्थ : अच्युत, केशव, राम, नारायण, कृष्ण, दामोदर, वासुदेव, हरि, श्रीधर, माधव, गोपिकावल्लभ, जानकीनायक ही नावे असलेल्या प्रभु श्रीरामचंद्राला मी हृदयपूर्वक भजत आहे.
वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या ‘अच्युताष्टकम्’मधील आहे, म्हणजेच आठव्या शतकातील आहे.
२ उ. पाचवे कडवे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।। – कलीसन्तरण उपनिषद्, श्लोक १
हा १६ अक्षरी मंत्र ‘कलीसंतरणं’ या उपनिषदातील आहे. (हे ख्रिस्तपूर्व काळातील असावे.) ‘हरिनामसंकीर्तन’ हा कलियुगाचा धर्म आहे. याविना कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे.
अशी ही वेगवेगळ्या कवींनी रचलेली आणि वेगवेगळ्या भाषांचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य आणि चाल अलौकिक आहे. रचना कुणाचीही असो, ही गातांना भक्त तल्लीन होतात आणि त्यांचा भाव देवापर्यंत पोचतो.’
संग्राहक : श्री. प्रकाश करंदीकर (वय ६५ वर्षे), फोंडा, गोवा.
(सौजन्य : सोशल मिडिया)