क्रांतीकारक दामोदर चापेकर यांच्या पश्चात्त त्यांच्या पत्नीला ना मिळाले निवृत्तीवेतन ना ताम्रपट !
आज क्रांतीकारक दामोदर चापेकर बलीदानदिन !
वॉल्टर चार्ल्स रँड हा ‘आय.सी.एस्.’ (भारतीय नागरी सेवा) अधिकारी होता. इंग्लंडमधील लिव्हरपूलजवळ त्याचे आयुष्य गेले. २२ जून १८९७ या दिवशी त्याची हत्या होण्यापूर्वी १३-१४ वर्षे तो भारतातच – खास करून मुंबईच्या आसपास होता. रँडचे कागद अभ्यासत असतांना त्याच्या हस्ताक्षरातील २३ सप्टेंबर १८८३ या दिवशी लिहिलेले एक पत्र ब्रिटीश लायब्ररीत मिळाले. तो अवर सचिवांना (‘अंडर सेक्रेटरी’ला) लिहीतो, ‘त्याने मुंबईला जाण्यासाठी ‘व्हिक्टोरीया’ जहाजात जागा बुक केली आहे; पण त्याला अजून अधिकृत नौकानयन आदेश मिळालेला नाही. त्या डलविचला पाठवण्याची व्यवस्था व्हावी.’ पुढे त्याला २६ सप्टेंबरला आदेश पाठवला गेला. (या दिनांकाचे शिक्के त्या पत्रावर आहेत !)
रँड आणि लेफ्टनंट आयर्स्ट यांची हत्या झाल्यावर ३ मासांच्या आत या दोघांच्या पत्नींना विशेष निवृत्तीवेतन चालू झाले. श्रीमती रँड यांना वार्षिक २५० पौंड आणि त्यांच्या मुलांना प्रत्येकी वार्षिक २१ पौंड मिळत होते. श्रीमती आयर्स्ट यांना वार्षिक १५० पौंड आणि त्यांच्या मुलांना वार्षिक १५ पौंड मिळत असत. ते दोघेही कर्तव्यावर (ऑन ड्यूटी) मारले गेल्याने हे खास वाढीव दराने निवृत्तीवेतन होते. याविषयीची कागदपत्रे लंडनच्या ब्रिटीश लायब्ररीत उपलब्ध आहेत.
दामोदर चापेकर यांच्या पत्नीला मान-सन्मान नाही !
रँड आणि लेफ्टनंट आयर्स्ट यांना मारणार्या दामोदर चापेकर यांच्या पत्नी दुर्गाबाई या वर्ष १८९७ मध्ये फक्त १७ वर्षांच्या होत्या. या पुढे ६० वर्षे, म्हणजे वर्ष १९५६ पर्यंत जगल्या. वर्ष १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ९ वर्षे जगूनही ना त्यांना कोणते निवृत्तीवेतन मिळाले, ना त्यांचा पती स्वातंत्र्यसैनिक असल्याचे ताम्रपट ! (स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतरही काँग्रेसने कायमच क्रांतीकारकांचा द्वेष केला, हीच खरी शोकांतिका ! – संपादक)
– श्री. संकेत कुलकर्णी, लंडन (साभार : फेसबुक)