जीवघेणा खेळ !
सध्या भारतात ‘आय.पी.एल्.’ ही क्रिकेट स्पर्धा चालू आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘मुंबई इंडियन्स’ विरुद्ध ‘सनराईझर्स हैद्राबाद’ या दोन संघांच्या सामन्यात हैद्राबाद संघाने धावांचा डोंगर उभा केला. या खेळात मुंबई संघातील महत्त्वाचा खेळाडू रोहित शर्मा बाद होताच चेन्नई संघाच्या एका चाहत्याने ‘रोहित शर्मा बाद झाल्याने मुंबई कशी जिंकणार ?’, असे म्हणून आनंद व्यक्त केला. तेव्हा मुंबई संघाला पाठिंबा देणार्या दोघांना राग अनावर होऊन त्यांनी संबंधित व्यक्तीचे डोके फोडले. परिणामी ती व्यक्ती गंभीर घायाळ होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना हणमंतवाडी (कोल्हापूर) येथे घडली. क्रिकेट हा इंग्रजांचा खेळ आहे; पण तरीही तो भारतात मोठ्या प्रमाणात खेळला जातो. भारतातील अनेक प्रसिद्ध क्रिकेटप्रेमींमुळे खेळाडूंचे चाहतेही मोठ्या प्रमाणात आहेत. २ मास चालणार्या आय.पी.एल्. स्पर्धेत एकूण १० संघांत सामने होतात. प्रत्येक संघात भारताच्या राष्ट्रीय संघातील वेगवेगळे क्रिकेटपटू असल्याने खेळाडूनुसार त्या-त्या संघाला पाठिंबा देणारे प्रेक्षक असतात; परंतु सध्याची स्थिती पहाता ही क्रिकेट स्पर्धा एकमेकांविषयी द्वेषभावना प्रकट करण्याचे माध्यम झाली आहे.
भारतात क्रिकेट लोकप्रिय असल्याने प्रसिद्ध क्रिकेटपटूंना लोक अक्षरशः ‘देवा’प्रमाणे आदर्श मानतात. एखाद्या खेळाडूचे काही चुकले किंवा आवडत्या खेळाडूविषयी कुणी काही बोलले की त्याला विरोध करतात. यामुळे मनात ईर्ष्या, द्वेष, मत्सर निर्माण होतो. हणमंतवाडी येथील घटनेतून तर हा खेळ आता नुसता खेळ म्हणून न रहाता तो जीवघेणा होत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले. आय.पी.एल्. ही जगभरातील सर्वाधिक आर्थिक उलाढाल होणारी मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. स्पर्धेआधी होणार्या लिलावात क्रिकेटपटूंवर मोठ्या रकमेची बोली लावून त्यांना संघाकडून विकत घेतले जाते. ही रक्कम कोटींमध्ये असते. स्पर्धेआधी आणि स्पर्धेच्या वेळी त्याची विज्ञापने, ‘ड्रीम इलेव्हन टीम’ बनवणे इत्यादींमुळे ही स्पर्धा पैसा कमवण्याचे माध्यम झाले आहे. हा पैसा योग्य मार्गाने नाही, तर जुगार, सट्टा इत्यादी माध्यमांतून कमावला जातो. हे वास्तव ठाऊक असूनही मोठमोठे क्रिकेटपटू, अभिनेते, खेळाडू यांच्याकडून स्पर्धेची विज्ञापने करून लोकांना त्यासाठी उद्युक्त केले जाते. स्पर्धेचे विज्ञापन करतांना ‘या खेळाची तुम्हाला सवय लागू शकते अन् ते आर्थिक जोखमीचे आहे’, असे शेवटी सांगितले आहे; परंतु कुणीही त्याला विरोध करत नाही. अयोग्य मार्गाने येणारा पैसा अन् वेळ यांचा अपव्यय यामुळे लोकांच्या जीवनातील अमूल्य वेळ मात्र वाया जात आहे, जे विकसनशील भारताच्या दृष्टीने अन् विशेषकरून युवा वर्गासाठी घातक आहे. चुकीचे आदर्श अन् तीव्र द्वेषापोटी लोक एकमेकांचे आयुष्यही उद्ध्वस्त करण्यास पुढे-मागे पहात नाहीत. त्यामुळे जीवन सार्थकी लागण्यासाठी योग्य आदर्श ठेवणे अन् आचरण असणे किती आवश्यक आहे, हेच यातून लक्षात येते !
– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.