Coco Islands Row : नेहरूंनी म्यानमारला भेट दिलेले ‘कोको’ बेट चीन वापरत आहे !
अंदमान-निकोबर येथील भाजपचे उमेदवार विष्णुपद रे यांचा दावा
अंदमान-निकोबार – पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अंदमान-निकोबर येथील ‘कोको’ नावाचे बेट म्यानमारला भेट दिले आणि आता त्याचा वापर चीन त्याच्या सैन्यासाठी करत आहे, असा दावा भाजपचे अंदमान-निकोबार येथील लोकसभा निवडणुकीतील उमेदवार विष्णुपद रे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलतांना केला.
विष्णुपद रे पुढे म्हणाले की, नेहरूंनी उत्तर अंदमानचे कोको बेट म्यानमारला दिले. हे बेट आता थेट चीनच्या नियंत्रणात आहे. काँग्रेसने गेल्या ७० वर्षांत याकडे कधीच लक्ष दिले नाही. आज भारत सरकार चीनशी स्पर्धा करण्यासाठी कॅम्पबेल खाडीमध्ये एक शिपयार्ड आणि २ संरक्षण विमानतळ बांधत आहे.
काय आहे इतिहास ?
या बेटाविषयी वेगवेगळे दावे केले जातात. त्यातील काही दावे पुढील प्रमाणे आहेत.
१. ब्रिटीश राजवटीत अंदमान-निकोबार बेट ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने अंदमान-निकोबारही स्वतंत्र भारताचा भाग बनले. कोको बेट ब्रिटिशांनी म्यानमारच्या (तत्कालीन ब्रह्मदेशाच्या) स्वाधीन केले. तेव्हा ब्रह्मदेशही ब्रिटीश साम्राज्याचा भाग होता.
२. १९ व्या शतकात ब्रिटीश सरकारने भारतीय क्रांतीकारकांना शिक्षा देण्यासाठी अंदमान बेटांची निवड केली. येथे रहाणार्या बंदीवानांसाठी आणि इतर कर्मचार्यांसाठी कोको बेटावरून अन्न आणले जात होते. धान्य आणि भाजीपाला पिकवण्याचा त्रास टाळण्यासाठी ब्रिटिशांनी हे बेट एका प्रभावशाली बर्मी कुटुंबाला भाड्याने दिले. वर्ष १८८२ मध्ये ते अधिकृतपणे बर्मा, म्हणजेच म्यानमारचा एक भाग म्हणून स्वीकारले गेले.
३. देश स्वतंत्र होण्यापूर्वी, ब्रिटीश सरकारने कोको बेट भारतापासून जाणूनबुजून वेगळे केले, जेणेकरून ते सामरिकदृष्ट्या सशक्त होऊ नये.
(सौजन्य : Aaj News Live)
कसे आहे कोको बेट ?
कोको बेट अंदमान आणि निकोबार बेटापासून अनुमाने ५५ किलोमीटर अंतरावर आहे. अनुमाने २० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या बेटाच्या नावामागे एक कारण आहे. समुद्राला लागून असलेल्या सर्वच भागात नारळ मुबलक प्रमाणात मिळत असला, तरी कोकोमध्ये ते मुबलक प्रमाणात आढळते; म्हणूनच याला ‘कोको बेट’ असे म्हटले गेले. त्याचे ‘ ग्रेट कोको’ आणि ‘स्मॉल कोको आयलंड’ असे २ भाग आहेत.
हे बेट म्यानमारचा भाग झाल्यानंतर तेथील कमांडर जनरल ने विन याने वसाहत बनवली. येथे कैदी आणि बंडखोर यांना ठेवले जात होते; पण ७० च्या दशकात हे पालटले. चीनने ते म्यानमारकडून भाडेतत्त्वावर घेतले आणि त्याचा वापर स्वतःच्या सैन्यासाठी चालू केला.
म्यानमारने चीनला सूट का दिली ?
‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने म्यानमारला मोठे कर्ज दिले. यात सातत्याने वाढ होत आहे. अशा स्थितीत म्यानमार सरकारला चीनला म्यानमारमध्ये प्रवेश करण्याची अनुमती देणे जवळपास भाग पडले आहे. म्यानमारमध्ये क्यूकफ्यू बंदरासारखे इतर अनेक चिनी प्रकल्पही चालू आहेत. येथून चिनी नौदल भारतीय आण्विक पाणबुड्यांच्या हालचालींचा मागोवा घेऊ शकते. म्यानमारने कोको बेट चीनला भाड्याने दिल्याचे नाकारले असले, तरी ते लपलेले नाही.