भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी घोषित !
सातारा, १६ एप्रिल (वार्ता.) – राज्यात सर्वाधिक चर्चा झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी घोषित झाली आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रचाराला प्रारंभ केला होता. अपेक्षेप्रमाणे त्यांच्या नावाची घोषणा आज भाजपकडून करण्यात आली.
सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासमवेत होणार आहे. शिंदे हे शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. विद्यमान खासदार शरदचंद्र पवार गटाचे श्रीनिवास पाटील यांनी आरोग्याचे कारण देत निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातील पेच
महायुतीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होता; मात्र छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही जागा सोडण्यास सिद्ध असल्याचे बोलले जात होते; परंतु त्याऐवजी नाशिक लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याची सिद्धता भाजपने दाखवली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत. त्यामुळे या जागेविषयी मोठा पेच निर्माण झाला होता; मात्र आज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नावाची अधिकृत घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे.