अयोध्येतील श्रीराममंदिरात स्थापित करण्यात आलेल्या श्रीरामलल्लाच्या मूर्तीचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘अयोध्येत १६.१.२०२४ या दिवसापासून श्रीरामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा विधीस प्रारंभ झाला होता. १८.१.२०२४ या दिवशी श्रीरामलल्लाची मूर्ती श्रीराममंदिरातील गर्भगृहात स्थापित करण्यात आली. श्रीरामाच्या कृपेमुळे मला या मूर्तीचे सूक्ष्म परीक्षण करता आले. ते पुढे दिले आहे.
१. श्रीरामलल्लाची मूर्ती कमळाच्या आकाराच्या शिळेवर उभी आहे. तेथे मला सूक्ष्मातून एक मोठे दैवी कमळ दिसले आणि ‘त्यात प्रत्यक्ष श्रीराम उभा आहे’, असे मला जाणवले. त्या शिळेच्या भोवती भूमीतून उत्पन्न झालेली पोपटी रंगाची दैवी ऊर्जा दिसली. त्यामुळे मूर्तीचे पाताळातील वाईट शक्तींपासून रक्षण होत आहे.
२. श्रीरामलल्लाच्या चरणांकडे पाहिल्यावर माझे मन आपोआप एकाग्र होऊ लागले. ‘श्रीरामलल्लाच्या चरणांतून तारक शक्तीचे पुष्कळ प्रक्षेपण होत आहे’, असे मला जाणवले.
३. श्रीरामलल्लाच्या चरणांपासून वर कमरेपर्यंत पाहिल्यावर तेथे सूक्ष्मातून निळ्या रंगाची दैवी ऊर्जा दिसली. ती पाहून माझ्या मनाला आनंद जाणवत होता.
४. श्रीरामलल्लाच्या नाभीतून सूर्यकिरणाप्रमाणे तेजाचा एक किरण वातावरणात प्रक्षेपित होतांना दिसला.
५. श्रीरामलल्लाच्या छातीकडे पाहिल्यावर मला तिच्यात सूक्ष्मातून आकाश दिसले. तेव्हा ‘माझे मन आणखी व्यापक बनत आहे’, असे मला जाणवले. ‘श्रीरामलल्लाच्या छातीत सूक्ष्मातून काही दैवी शक्ती वास करत आहेत’, असे दृश्य मला दिसले. या दैवी शक्तींना श्रीरामाच्या ‘दैवी कला’, असेही म्हणतात. येथे ‘कला’ या शब्दाचा अर्थ ‘शक्ती’, असा आहे. मला श्रीरामलल्लाच्या छातीत सूक्ष्मातून लहान आकाराच्या अनेक पृथ्वी दिसल्या.
६. श्रीरामलल्लाच्या कंठाकडे पाहिल्यावर कंठाभोवती सूक्ष्मातून केशरी, निळा आणि पांढरा हे दैवी रंग दिसले. तिन्ही रंगांच्या भोवती सोनेरी रंगाची गोलाकारातील आभा (प्रभावळ) दिसली. केशरी दैवी रंगातून शक्ती, निळ्या रंगातून दैवी ऊर्जा आणि पांढर्या रंगातून शांतीच्या लहरी यांचे प्रक्षेपण श्रीरामाच्या भक्तांकडे होत होते.
७. श्रीरामलल्लाच्या चेहर्यावर स्मितहास्य आहे. त्याच्या ओठांतून सोनेरी आणि गुलाबी या रंगांच्या दैवी कणांचे वातावरणात प्रक्षेपण होत आहे. त्यामुळे वातावरण आनंदमयी आणि उत्साही होत होते.
‘श्रीरामलल्लाची मूर्ती मूर्तीकार अरुण योगिराज यांनी साकार केली आहे. ‘त्यांची साधना आणि श्रीरामाप्रतीचा भाव’, यांमुळे श्रीरामलल्लाच्या मूर्तीत पुष्कळ देवत्व आले आहे’, असे मला जाणवले.’ – श्री. राम होनप सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१.२०२४) |
८. श्रीरामलल्लाच्या चेहर्याकडे पाहून मनाला आनंद होत होता. श्रीरामलल्लाच्या चेहर्याच्या जागी कधी गुलाबी, तर कधी पांढर्या रंगाचा दैवी प्रकाश दिसला.
९. श्रीरामलल्लाच्या चरणांपासून चेहर्याकडे पहातांना माझ्या आनंदात आणखी वाढ होऊन माझ्या मनाला हलकेपणा जाणवला.
१०. श्रीरामलल्लाच्या उजव्या हातातील धनुष्य आणि डाव्या हातातील बाण सूक्ष्मातून दैवी पांढर्या रंगाचे दिसले.
११. श्रीरामलल्लाच्या संपूर्ण मूर्तीच्या भोवती पांढर्या रंगाचे संरक्षककवच दिसले.
१२. मला श्रीरामलल्लाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला एकेक देव दिसला. या दोन्ही देवांच्या हातात एक एक भाला आहे. हे देव त्या मूर्तीचे रक्षक आहेत.
१३. श्रीरामलल्लाची मूर्ती पहातांना मला मूर्तीच्या आजूबाजूला सोनेरी घंटा हलत असलेल्या दिसल्या. त्यांचा नाद मला ऐकू आला.
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१.२०२४)
|