प्रभु श्रीराम अन् रामायण यांचा अवमान सातत्याने का ?
पुद्दुचेरी येथील महाविद्यालयात सादर करण्यात आलेल्या नाटकातून सीतामातेचा अवमान करण्यात आला. नाटकामध्ये तिला रावणासमवेत नाचतांना दाखवले, सीताहरणापूर्वी सीतामाता रावणाला गोमांस खाण्याविषयी विचारते, ‘विवाहित असूनही मित्र होऊ शकतो’, असे सांगते, असे अनेक संवाद आणि दृश्य यांच्या माध्यमातून खिल्ली उडवण्यात आली. पुणे विद्यापिठातही श्रीराम, सीतामाता यांचा अश्लाघ्य अवमान करण्यात आला. आजवरच्या अशा घटना अथवा बातम्या पाहिल्या की, लक्षात येते सातत्याने अवमान, विडंबन, विकृतीकरण, थट्टा-मस्करी श्रीराम आणि रामायणातील अन्य सर्व यांच्याच वाट्यालाच अधिक प्रमाणात का येत आहे ? तसे महाराष्ट्रासह भारतात कुणावर टीका करावी ? कुणावर करू नये ? याचा काही धरबंध सर्वांना आहेच, असेही नाही. लेखक, व्याख्याते, प्राध्यापक, नाटककार, कथालेखक, चित्रपट निर्माते, अधिवक्ते, विचारवंत, समाजसेवक, राजकीय नेते, कार्यकर्ते, पुरो(अधो)गामी, साम्यवादी असे समाजात मानले जाणारे घटक रामायणावर बेलगाम टीका करतात. त्यातील प्रसंगांचा स्वत:ला हवा तसा अर्थ काढतात. काही नसलेले प्रसंग निर्माण करतात, काही प्रसंग विकृतपणे मांडतात, असे किती प्रकारे श्रीरामाची निर्भत्सना करतात. त्यातून काही जण प्रसिद्धी, पैसा मिळवतात, तर काही जण ‘आधुनिक’ म्हणून नावारूपाला येतात.
१. प्रभु श्रीरामावर टीका करून टीकाकारांची नाचक्की
अगदी साधा-सोपा सरळ विचार केल्यास श्रीरामामध्ये असे काय नाही, ज्यामुळे त्याचे गुणवर्णन करू नये. श्रीराम हा आदर्श राजा, राजकुमार, पती, पुत्र, बंधू, मित्र, शिष्य, शत्रूही असा सर्वार्थाने आदर्श वर्तन असलेले हिंदूंचे आराध्य आहे. अशा आदर्श व्यक्तीमत्त्वाचा खरे तर दिवसरात्र गौरव झाला पाहिजे, त्याचे गोडवे गायले पाहिजेत. काही जण म्हणतात, ‘श्रीरामाचे गोडवे किती दिवस गाणार ?’ श्रीरामाचे गोडवे गाणार नाही, तर कुणाचे गाणार ? सृष्टी निर्मात्याने स्वत: सगुण साकार होऊन आणि सर्वार्थाने आदर्श वर्तन करून आचरण कसे असले पाहिजे ? याचा पायंडा मानवाला घालून दिला आहे, तर त्याचे गुणगान का करायला नको ? येथे स्वत:तील गुण सोडाच; पण अवगुणांचे प्रदर्शन करून श्रीराम आणि रामायणातील दैवी जिवांविषयी अवमानकारक भाषा वापरली जाते. यातून श्रीरामाचे गुण अन् त्याचे महत्त्व न्यून होणार नसून टीकाकारांची नाचक्की मात्र होत आहे.
२. प्रभु श्रीरामासारखे आचरण कुणी करून दाखवू शकेल का ?
श्रीरामासारखे आचरण, म्हणजेच त्यागमय जीवन जगून पाहिल्यास लक्षात येईल की, प्रत्येक पावला पावलाला विनम्र होऊन इतरांसाठी त्याग करणे, इतरांनाही त्याग करायला लावणे, सर्व सुख चरणांशी असून स्वत:चे काहीच नसल्याप्रमाणे रहाणे किती कठीण आहे ? विनम्रता, संयम, विनयशीलता, मर्यादांचे सदैव भान, समाधानी वृत्ती, निरपेक्षता, राजा असल्याने प्रजाजनांचा अखंड पुत्रवत् सांभाळ करणे, प्रसंगी स्वत:च्या सर्वांत आवडीच्या व्यक्ती, गोष्टी यांचा त्याग करून केवळ कर्तव्यालाच प्राधान्य देणे, हे एकाच वेळी कधी तरी कुणाला शक्य आहे का ? असे जगणे हेच ज्याचे जीवन झाले आहे तोच प्रभु श्रीराम आहे !
३. रामायणाचा द्वेष करणार्यांनी भान ठेवणेच उत्तम !
सर्व भारतीय म्हणजे याच रामरायाची प्रजा आहे. श्रीराम भारतीय जीवन, संस्कृती, मूल्ये, मन, हिंदुत्व यांना व्यापून असणारे आदर्श व्यक्तीमत्त्व आहे. हिंदूंसाठी तर तो अवतारच आहे. अशा श्रीरामावर शिंतोडे उडवले, म्हणजे एकतर बक्कळ प्रसिद्धी मिळते किंवा उपद्रव मूल्य वाढते. ‘राम राम’ म्हणून दिवसाचा प्रारंभ होणार्या भारतात, व्यक्तीचा शेवटही ‘राम नाम सत्य है ।’ म्हणजेच श्रीरामाच्या जयघोषानेच होतो. टीकाकारांचा शेवटही याच श्रीरामाच्या जयघोषाने होणार आहे. असा भारतीय समाजपुरुष ज्या मर्यादापुरुषाने व्यापला आहे, त्याच मर्यादेत राहून हिंदु समाज अशा टीकाटिपणी यांना विरोध करतो. हिंदु समाजाने मर्यादा ओलांडली की, कालपुरुषही थरथर कापतो, निसर्गही रौद्ररूप धारण करतो. मग पुढे अनेक लंकांचे दहन होऊन शेवटी रामराज्य स्थापन होतेच होते. रामायणाचा द्वेष करणार्यांनी याचे भान ठेवणे, हेच उत्तम !
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (१५.४.२०२४)