विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करून आदर्श पिढी निर्माण करणारे वेंगरुळ (तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर) येथील ‘सव्यसाचि गुरुकुलम्’ !
मागील भागात ‘सव्यसाचि’ गुरुकुलात दिले जाणारे शिक्षण’ आणि ‘विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करणारे शिक्षण’, हा भाग वाचला. आज त्याचा पुढील भाग पहाणार आहोत.
(भाग ३)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/784555.html
९. गुरुकुलाची इतर वैशिष्ट्ये !
९ अ. झाडाखाली शिकवणे : गुरुकुलात शिकवायला कक्ष नसून आचार्य विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात झाडाखाली बसून शिकवतात. हे पाहून प्राचीन काळातील गुरु-शिष्य परंपरेची आठवण झाली.
९ आ. केवळ कुंकू लावता येण्यापुरता अगदी छोटा आरसा ठेवल्यामुळे देहबुद्धी अल्प होणे : गुरुकुलात हस्तप्रक्षालन पात्राजवळ (बेसीनजवळ) किंवा मुलींच्या निवासस्थानीही आरसा नव्हता. त्यामुळे अनावश्यक आरशात पहाणे होत नाही. केवळ ‘कुंकू लावणे आणि केस विंचरणे’, यासाठी स्वतःजवळचा एक छोटा ‘फोल्डिंग’चा आरसा वापरायचा. ‘यामुळे देहबुद्धी आपोआपच अल्प होते’, असे शिकता आले.
आम्हाला हात-तोंड धुतांना किंवा वैयक्तिक आवरतांना अनेक वेळा आरशात बघण्याची सवय झाली असल्याने थोडे चुकल्यासारखे झाले; पण ‘नेहमी तिकडे रहाणार्या कुणालाही आरसा नसल्याची न्यूनताच जाणवत नव्हती’, याचे आम्हाला फार कौतुक वाटले.
९ इ. भ्रमणभाष जवळ ठेवण्याची अनुमती नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ कुठेही वाया जात नसणे : येथील विद्यार्थ्यांना स्वत:कडे भ्रमणभाष ठेवण्याची अनुमती नाही. यामुळे आपोआपच भ्रमणभाषमुळे होणारे दुष्परिणाम टळतात; याउलट समाजातील त्यांच्या वयाची मुले भ्रमणभाषवर वेळ वाया घालवतात आणि पालकही त्यावर नियंत्रण ठेवत नाहीत.
९ ई. विद्यार्थ्यांना बाहेरचे ‘फास्ट फूड’ किंवा ‘जंक फूड’ यांविषयी आकर्षण नसणे, केवळ पौष्टिक पदार्थच खाणे : येथील विद्यार्थ्यांना बाहेरच्या अन्नाचे आकर्षण नाही. कुणाच्याही बोलण्यात कधी ‘काही बाहेरचे पदार्थ खावेसे वाटतात’, असे ऐकले नाही किंवा अशा प्रकारच्या विषयांवर विद्यार्थी बोलतही नाहीत. मधल्या वेळेत विद्यार्थी काही खाऊ खातात; पण ते अहितकारक किंवा पाकीटबंद पदार्थ खात नाहीत. ‘गुळ, शेंगदाणे, खजूर किंवा घरून करून आणलेले लाडू, वडी’, असे पौष्टिक पदार्थच मुले खातात.
९ उ. शारीरिक श्रमाची कामे आनंदाने आणि मनापासून करणे : सर्व जण कष्टाची कामे उत्साहाने करतात. ते शारीरिक श्रमाच्या कामांचा कंटाळा करत नाहीत. व्यायामापूर्वी मैदानावर पडलेला पालापाचोळा झाडूने एकत्र करणे, तो गोणीत भरणे, मैदानावर पाणी शिंपडणे, तबेला आणि गोठा यांची स्वच्छता करणे, गायी आणि घोडे यांना लागणारा चारा सिद्ध करून त्यांना घालणे, त्यांना पाणी पाजणे, खोलीतील भिंती अन् भूमी शेणाने सारवणे इत्यादी श्रमाची सेवा विद्यार्थी अत्यंत मनापासून करतात.
९ ऊ. आदल्या दिवशी पुष्कळ श्रम झाले असले, तरीही दिनक्रमात पालट न करणे : विद्यार्थ्यांना कितीही श्रम किंवा व्यायाम झाला किंवा वेदना होत असल्या, तरी सर्व विद्यार्थी पहाटे ४ वाजता नित्यनेमाने उठतात. त्यांच्यात ‘दिनक्रमात आळस करणे, मनानुसार वागणे, सवलत घेणे, शरीर जपणे’, असे स्वभावदोष नाहीतच.’
– भौतिकोपचारतज्ञ श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचारतज्ञ सौ. अक्षता रेडकर आणि कु. वैदेही शिंदे.
९ ए. पुष्कळ अंग दुखत असतांनाही ‘प्रतिदिनचा व्यायाम किंवा वैयक्तिक आवरणे’, यांमध्ये सवलत न घेणे : ‘येथील विद्यार्थी कुठल्याही कारणाने कशातही टाळाटाळ करत नाहीत’, असे लक्षात आले. एकदा एका मुलीचे व्यायामामुळे अंग अतिशय दुखत होते. तिची पाठ दाबली, तरी ते तिला सहन होत नव्हते; परंतु एवढे होऊनही तिने एकही दिवस व्यायाम करायचे चुकवले नाही. त्या स्थितीतही तिने स्वतःचे कपडे हाताने धुतले आणि खोलीतील केरही काढला.
९ ऐ. इतरांच्या चुकाही तत्त्वनिष्ठतेने, सहजतेने आणि प्रेमाने सांगणे : विद्यार्थी एकमेकांच्या जाणवलेल्या चुका भावनिक स्तरावर न हाताळता थेट तत्त्वनिष्ठ राहून सांगतातच; पण येथील विद्यार्थी आम्हालाही तितक्याच सहजतेने आणि प्रेमाने आमच्या चुका सांगत असत, उदा. जेवायला बसतांना मी शेजारी बसलेल्या मुलीपासून बरेच अंतर सोडून बसले होते. तेव्हा त्यांनी मला ‘जागा सोडून बसू नका’, असे सांगितले. जेवणापूर्वी आम्ही नेहमीप्रमाणे मनातच प्रार्थना करायचो; पण ते मोठ्याने श्लोक म्हणतात. त्यांनी आम्हालाही तसे मोठ्याने श्लोक म्हणण्यास सांगितले.’
– भौतिकोपचारतज्ञ सौ. अक्षता रेडकर
९ ओ. विद्यार्थ्यांच्या तोंडी भजने, भक्तीगीते किंवा छत्रपती शिवराय यांच्यावरील लोकगीते असणे : ‘अधूनमधून, खोलीत आल्यावर किंवा येता-जाता विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांवरील लोकगीते, वारकर्यांची भजने किंवा भक्तीगीते गुणगुणतात. ते एकमेकांना शिवकालीन प्रसंग किंवा इतिहासाचा समावेश असलेली कोडी घालतात अथवा तत्सम प्रश्न विचारतात. ते दिवसभर शिवरायांच्या किंवा त्या पूर्वीच्या विश्वातच रमतात. ‘त्यातूनच या सर्वांसाठी त्यांच्या मनाला उभारी मिळते’, हे लक्षात आले.
बहुतेक विद्यार्थी ६ – ७ मासांपूर्वीच गुरुकुलात आले आहेत. ६ – ७ मासांतच येथील लहान मुलांना अशा प्रकारे कृतीच्या स्तरावर शिस्त लागत असल्यामुळे पुढे ती मुले आदर्श नागरिक होतील. या लहान मुलांना पाहून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मावळ्यांची आठवण झाली.’
– भौतिकाेपचारतज्ञ श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचारतज्ञ सौ. अक्षता रेडकर आणि कु. वैदेही शिंदे.
१०. गुरुकुलातील विद्यार्थ्यांचे उदात्त समष्टी ध्येय !
१० अ. येथील विद्यार्थ्यांचे ‘भारतदेश पूर्वीसारखा घडवणे’, हे ध्येय असणे : ‘एकदा मी जेवतांना तेथील एका १२ वर्षांच्या विद्यार्थिनीला सहज विचारले, ‘‘तुम्ही इकडे कशासाठी आला आहात ? तुमचे ध्येय काय आहे ?’’ तिने मला फार सुंदर उत्तर दिले, ‘‘पूर्वीचा भारत जसा होता, तसा पुन्हा घडवायचा आहे !’’ तेथील विद्यार्थ्यांशी बोलतांना ‘त्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापेक्षा गुरुकुलातील शिक्षणपद्धत आवडते’, असे माझ्या लक्षात आले.’ – भौतिकोपचारतज्ञ सौ. अक्षता रेडकर
१० आ. व्यायाम करण्यामागील उद्देश ! : ‘व्यायाम करण्यामागील त्यांचा उद्देशच वेगळा आहे. तेथील कुणीही ‘आरोग्य चांगले ठेवणे, वजन न्यून करणे किंवा वाढवणे’, यांसाठी व्यायाम करत नाहीत. ते शस्त्रकला अवगत करण्यासाठी व्यायाम करून शरीर बळकट करतात. त्यामुळे ‘प्राचीन भारतातही बहुतेक जण स्वतःची व्यक्तीगत प्रगती किंवा स्वार्थ यांसाठी व्यायाम करत नसतील, तर राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी करत असतील’, हे आमच्या लक्षात आले. यातून ‘व्यायाम करण्याचा उद्देश किती व्यापक असू शकतो ?’, हेही आम्हाला शिकता आले.
१० इ. व्यायामाच्या आधी म्हणायचे स्फूर्तीदायक श्लोक !
विद्यार्थी व्यायामाच्या आधी आणि नंतर राष्ट्र अन् धर्म यांवर आधारित श्लोक म्हणतात. या श्लोकांतून मुलांवर राष्ट्र आणि धर्म यांचे संस्कार होतात. जेवणापूर्वीही श्लोक म्हटले जातात. त्या श्लोकातून ‘या अन्नातून मला राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी शक्ती मिळू दे’, अशी ते प्रार्थना करतात.
११. गुरुकुलातील विद्यार्थ्यांचा अनुभवलेला प्रेमभाव !
पहिल्यांदाच व्यायाम किंवा श्रमाची कामे केल्याने अंगदुखी होते; तसा आम्हालाही व्यायाम केल्यावर त्रास होत होता; पण त्या विद्यार्थ्यांकडे बघून सहनशक्ती वाढायची. येथील लहान मुलांकडून ‘शरिराला अनावश्यक जपू नये’, हे आम्हाला शिकता आले.
अ. तिथे व्यायाम करून आमचे हात-पाय दुखायचे. हे तेथील विद्यार्थिनींना समजायचे. त्या आम्हाला ‘हे दुखणे नैसर्गिक कसे आहे ?’, ‘तेल लावल्यावर न्यून होईल’, असे सांगायच्या. एकदा त्यांनी मला आणि वैदेही हिला तेल लावूनही दिले. – सौ. अक्षता रेडकर
आ. ‘आम्ही गुरुकुलात नवीन असल्याने ते आम्हाला सकाळचे शिल्लक अन्नही घेऊ देत नसत आणि आम्ही जेवतांना आम्हाला काय ‘हवे-नको’, याची विचारपूस करत असत.
(क्रमशः)
– भौतिकोपचारतज्ञ श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचारतज्ञा सौ. अक्षता रेडकर आणि कु. वैदेही शिंदे, फोंडा, गोवा. (१.३.२०२४)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/785170.html