आर्य चाणक्य, विद्यारण्य स्वामी आणि समर्थ रामदासस्वामी
आज समर्थ रामदासस्वामी यांची जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
१. समर्थ रामदासस्वामींना स्फुरलेला राष्ट्रवादाचा विचार धर्मस्थापनेसाठी आणि न्यायनीती पुनर्स्थापित करण्यासाठीच !
चाणक्य-चंद्रगुप्त, विद्यारण्य-हरिहर बुक्क यांसारखीच समर्थ-शिवराय अशी जोडी असल्याची मांडणी अनेक जण करतात; पण या दोन जोड्या आणि समर्थ-शिवराय या नात्यात महत्त्वाचा भेद आहे. तिन्ही जोड्या गुरु-शिष्यांच्या आहेत हे खरे; पण आर्य चाणक्य, विद्यारण्य आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या व्यक्तीमत्त्वात महत्त्वाचा भेद आहे.
२. आर्य चाणक्य
आर्य चाणक्य राज्यशास्त्रवेत्ता, अध्यापक होते. त्यांच्या संपूर्ण विचारांत आणि आचारात राजकारण, सत्ताकारण, राज्यव्यवस्था हेच विषय प्रमुख होते. स्वत:च्या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी त्यांचा शिष्य चंद्रगुप्ताचे अमात्यपद स्वीकारले.
३. विद्यारण्यस्वामी
विद्यारण्य स्वामी हे जागरूक संन्यस्त ! मुसलमान झालेल्या हरिहर बुक्कांना त्यांनी पुन्हा स्वधर्मात आणून त्यांच्याकडून विजयनगरचे साम्राज्य स्थापन करवले आणि त्यांचे मंत्रीपद स्वीकारले.
४. समर्थ रामदासस्वामी
४ अ. छत्रपती शिवरायांनी झोळीत टाकलेले राज्य परत करणारे निरहंकारी समर्थ रामदासस्वामी ! : समर्थांना या सत्ताकारणाचा स्पर्शही झाला नव्हता. त्यांना स्फुरलेला राष्ट्रवादाचा विचार धर्मस्थापनेसाठी आणि न्यायनीती पुनर्स्थापित करण्यासाठी होता. सत्ताकारणात त्यांना रस असता, तर तेही छत्रपती शिवरायांचे अमात्य झाले असते. छत्रपती शिवरायांनी झोळीत टाकलेले राज्य स्वीकारून सिंहासनाधिष्ठित होऊ शकले असते; मात्र समर्थांनी राज्य तर परत केलेच; पण शिवराज्याभिषेकास अनुपस्थित राहून राजपुरोहित, राजगुरु होण्याचेही नाकारले. अनासक्त, निरहंकारी वृत्तीच फक्त हा चमत्कार घडवू शकते. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे समर्थ हे आर्य चाणक्य आणि विद्यारण्य यांच्यापेक्षा वेगळे अन् मोठे ठरतात. त्यांची तुलना केवळ राष्ट्र-धर्मपूर्तीसाठी अखंड धडपडणार्या योगेश्वर श्रीकृष्णाशीच होऊ शकते.’
– दादूमिया
(साभार : मासिक ‘धर्मभास्कर’, मार्च २००९)