छत्रपती शिवाजी महाराज यांचा उपमर्द !
‘‘जागतिक तरुणांसाठी आश्वासक चेहरा शरद पवार आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात अडचण आली होती. जेव्हा जेव्हा देशासमोर अडचण आली, तेव्हा महाराष्ट्र उभा राहिला आहे. आजचे शिवाजी शरद पवार आहेत. आपण मावळे होऊन देहली कह्यात घेऊ’’, असे विधान मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘अस्वस्थ तरुण आणि आश्वासक साहेब’, या कार्यक्रमात बोलतांना केले. अवघ्या महाराष्ट्राचे नव्हे, हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि जागतिक स्तरावरील पूज्य व्यक्तीमत्त्व छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख ‘शिवाजी’ या एकेरी नावाने केला आणि ‘साहेब’ म्हणून ज्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली गेली, ते कोण तर ‘शरद पवार !’ परकीय मुसलमान आक्रांतांना पराजित करून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि अवघ्या राजकीय कारकीर्दीत उन्मादात वावरणारे अन् जनतेकडून अनेक अतीगंभीर आरोप होणारे शरद पवार यांची यत्किंचितही तुलना होऊ शकत नाही. छत्रपतींचा अशा प्रकारे अपमान करणार्या खेडेकर यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच.
काही वर्षांपूर्वी खेडेकर म्हणाले होते, ‘‘संभाजी ब्रिगेडचे राज्य येईल, तेव्हा आम्ही शरद पवारांना ‘भारतरत्न’ देऊ. त्यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी संभाजी ब्रिगेड पाठिंबा देईल.’’ खेडेकरांना पवारांविषयी जे काही वाटते, ते त्याचे वैयक्तिक मत असू शकते; मात्र ‘पवारां’ची महती वर्णन करण्यासाठी छत्रपतींचा एकेरी उल्लेख कशासाठी ? ज्या छत्रपतींच्या नावाने एक संघटना उभारून खेडेकर नावारूपास आले, त्याच छत्रपती संभाजी महाराजांच्या पूज्य पित्याचा असा उपमर्द, म्हणजे ‘जिस थाली में खाया उसीमें छेद किया’ (ज्या ताटात जेवलो, त्याला धोका दिला) असे झाले. यासाठी त्यांचा जितका निषेध करावा तेवढा थोडाच आहे. स्वतःचे विकृत विचार समाजावर लादण्याचा प्रयत्न खेडेकर यांनी कायमच केला आहे. आश्चर्य या गोष्टीचे वाटते की, शिवजयंतीला अनेक मोठमोठ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात अग्रेसर असलेले ‘शिवभक्त’ तरुण या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक, तसेच श्रोतावर्ग, तिथे उपस्थित पत्रकार बंधू आणि सर्वत्रची सामाजिक माध्यमे यांना कुणालाही अपवाद वगळता यावर तात्काळ आक्षेप घ्यावा, असे का जाणवले नाही ? येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान ते कसा सहन करू शकले ? याचे आत्मपरीक्षण प्रत्येकानेच करणे क्रमप्राप्त आहे. ही पराकोटीची असंवेदनशीलता आहे. कुणीही उठावे देवीदेवता, संत, इतिहासातील शूर लढवय्ये, महापुरुष यांवर चिखलफेक करावी, वाटेल तसे बरळावे, याला आळा घालण्यासाठी जनतेलाच एकत्रितपणे अन् संघटितपणे लढा द्यावा लागणार आहे !
– श्रीमती धनश्री देशपांडे, रामनाथी, गोवा.